Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· पर्यावरणपूरक निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वं जारी
· रंगांची उधळण करणारा धुलिवंदनाचा सण सर्वत्र जल्लोषात साजरा
· जालन्यात हत्तीरिसाला, विड्यात जावयाची गर्दभस्वारी तर नांदेड इथं आज होला महल्ला
· तुळजापूर नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचं पालकांना मतदान करण्याबाबत भावनिक पत्र
आणि
· ७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रेल्वे संघाला नमवत हरियाणाला
सविस्तर बातम्या
पर्यावरणपूरक निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत.
आयोगाने मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान मंडळाने ई-पुस्तकं आणि ई-दस्तऐवजांच्या वापरावर अधिक भर दिला आहे. मतदानादरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे निर्देश जारी करण्यात आले. एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचं आवाहन आयोगानं केलं आहे. राजकीय पक्षांना प्रचार कार्यक्रमांसाठी अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रकारच्या कचऱ्यासाठी विल्हेवाटीची योग्य व्यवस्था असावी, वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करावा, एकाच वाहनांतून अनेकांनी प्रवास करावा, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन द्यावं, राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार कार्यक्रमांमधे अक्षय ऊर्जेचा वापर करावा, आदी सूचनाही आयोगानं केल्या आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची सहावी यादी काल जाहीर केली. यामध्ये राजस्थानातल्या चार आणि तामिळनाडूतल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत १९२ उमेदवारांची नावं जाहीर केली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या शैक्षणिक सत्रात राज्यात पहिली ते आठवीच्या, ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशांचं वाटप करण्यात येणार आहे. यात एक नियमित गणवेश तर दुसरा स्काउट गाईडचा गणवेश असेल. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून याबाबतचा ‘कार्यारंभ’ आदेश देण्यात आला असून, बचत गटातल्या महिलांकडून हे गणवेश शिवून घेण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशासाठी लागणारं ठराविक माप महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदवलं जाईल. एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना ११० रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.
****
धुलिवंदनाचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात साजरा करण्यात आला. अयोध्येत राममंदिर उभारणीनंतर प्रथमच धुलिवंदन साजरं होत असल्यानं, भाविकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. परंपरेनुसार काल मंदिरात रामाला अबीर गुलाल अर्पण करून रंग खेळण्याची परवानगी मागण्यात आली, आणि त्यानंतर संपूर्ण अयोध्यावासीय रंगोत्सवात तल्लीन झाले. मथुरा आणि वृंदावनातही काल रंगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला.
महाराष्ट्रात सर्वत्र धुलिवंदनाचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय नेत्यांनी ठाण्यात टेंभी नाक्यावर मोठया जल्लोषात धुलिवंदन साजरं केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजानं पारंपरिक गाण्यांच्या ठेक्यावर लेंगी नृत्य करत होळी साजरी केली. वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं जगदंबा देवी संस्थानावर होळी सण मोठ्या उत्साहात पार पडला. काल पहाटे चार वाजता वाजतगाजत होलिका दहन करण्यात आलं, त्यानंतर दिवसभर बंजारा बोली भाषेतल्या गाण्यांवर, डफाच्या तालावर नृत्य करत बंजारा महिला पुरुषांनी रंगोत्सव साजरा केला. नंदुरबारमध्ये आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव पार पडला.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा इथं बंजारा समाजाच्या पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे होळी सण साजरा करण्यात आला.
जालना इथं धुलिवंदन हा सण १३५ वर्षांच्या अनोख्या परंपरेनुसार साजरा करण्यात आला. या परंपरेनुसार रिसाला समितीच्या वतीने प्रतिकात्मक हत्तीवरून राजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या वेगवेगळ्या भागातून जाणाऱ्या या हत्तीवर फुलांची उधळण केली जाते. त्यानंतर हत्तीवर बसलेला प्रतिकात्मक राजा नागरिकांना प्रसाद म्हणून रेवड्यांचं वाटप करतो. ही मिरवणूक शहरभरातून मार्गक्रमण करते, आपल्या भागातून मिरवणूक गेल्यावर नागरिक रंग खेळणं थांबवतात, कालही ही प्रथा पाळण्यात आली.
बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या विडा गावात धुळवडीच्या दिवशी सुमारे शंभर वर्षाच्या परंपरेनुसार जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्यात येते. शिंदी गावचे संतोष नवनाथ जाधव यांना काल हा मान मिळाला. मिरवणूक झाल्यानंतर गावातल्या नागरिकांनी जावयाला कपडेलत्ते आणि सोन्याची अंगठी देऊन त्यांचा मानसन्मान केला.
छत्रपती संभाजीनगरातही धुलिवंदनाचा सण सर्वत्र जल्लोषात साजरा झाला.
नांदेड जिल्ह्यात होळीपाठोपाठ धुलिवंदनाचा सण उत्साहात पार पडलं. रंगोत्सवात आबालवृद्ध जल्लोषात सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिडको भागात पोलिसांनी काल केलं. सर्वांनी शांतता ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
नांदेड इथल्या श्री सचखंड गुरुद्वारा इथं होळीनिमित्त आज होला महल्ला मिरवणूक निघणार आहे. या निमित्त शहरातील वाहतुक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. देश विदेशातून हजारो भाविक नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. होळीनिमित्त विविध रागी जत्थे आपली सेवा सादर करत आहेत.
****
मध्यप्रदेशात उज्जैन इथल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्यात काल सकाळी आग लागली. भस्मारती दरम्यान ही घटना घडली. या घटनेत पुजाऱ्यांसह १४ जण जखमी झाले. सर्व जखमींना इंदूर आणि उज्जैन इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी असून जखमी झालेले सर्व भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक दोन च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना, लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत भावनिक साद घालणारं पत्र लिहिलं आहे. लोकशाहीचं महत्त्व, मतदानाचं महत्त्व, आपलं कर्तव्य याविषयी माहिती देऊन, आई-वडिलांनी वेळात वेळ काढून मतदान करावं, असं आवाहन विद्यार्थ्यांनी या पत्रातून केलं आहे. या पत्रलेखनासाठी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, यांच्यासह सुरजमल शेटे, सुज्ञानी गिराम, केरण लोहारे, महेंद्र कावरे या शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ४५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होतं.
****
७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघानं रेल्वे संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या वाडिया पार्क क्रीडा संकुलावर काल हा अंतिम सामना झाला. यावेळी हरियाणाच्या आशू मलिकने रेल्वे संघाचे शेवटचे दोन गडी टिपत ३५-३० अशा विजय मिळवत, चांदीचा चषक उंचावला. हॉकीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले यांच्या हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं.
****
युनायटेड वेस्टर्न बँकेतर्फे त्यांचे संस्थापक वा. ग. चिरमुले यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांना जाहीर झाला आहे. जलसंधारण, पर्यावरण आणि सामाजिक कार्यक्षेत्रातल्या योगदानाबद्दल राजेंद्रसिंह यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या ३१ तारखेला साताऱ्यात राजेंद्रसिंह यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं काल हळद कारखान्याला पहाटे आग लागून हळद आणि यंत्रसामुग्रीचं मोठं नुकसान झालं. आग आटोक्यात आणण्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली इथल्या अग्निशमक दलास पाचारण करण्यात आलं होतं.
****
अहमदनगर जिल्ह्यात एका इसमाने संशयाच्या कारणास्तव आपल्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव लांडगा इथं काल सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. पत्नी लिलाबाई लांडगे आणि दोन मुली घरात असताना दारूच्या नशेत पती सुनील लांडगे यांनी तिघींच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळले. या प्रकरणी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या दहा तालुक्यात आजपासून हत्तीरोग एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य खात्यातले आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा स्वयंसेविका आणि इतर स्वयंसेवक घरोघरी जावून पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डीईसी आणि अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा देणार आहेत.नागरिकांनी आरोग्य कर्मचारी देतील त्या सूचनाप्रमाणे गोळ्यांचे सेवन करावं, आणि हत्तीरोगापासून दूर रहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी महिलेला कोकेन तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली. नैरोबीहून मुंबई विमानतळावर आलेल्या या महिलेच्या सामानाची झडती घेतली असता, त्यातून जवळपास १९ कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं. सदर महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
****
नाशिक इथं पोलिसांनी काल एका अंमलीपदार्थ विक्रेत्याकडून ३२ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे एक लाख ६ हजार रुपये असल्याचं वृत्त आहे. सागर शिंदे असं या इसमाचं नाव असून, न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १७६ धावा केल्या. बंगळुरुच्या संघानं हे लक्ष्य शेवटच्या शटकात चार चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं. या स्पर्धेत आज चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना होणार आहे.
****
No comments:
Post a Comment