Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातून ९७ उमेदवार निवडणूक रिंगणात
· नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी दोन तर हिंगोली इथं एक अर्ज दाखल
· मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार
· रंगपंचमीचा सण काल विविध ठिकाणी हर्षोल्हासात साजरा
· मराठवाड्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस;बीड इथं वीज कोसळून महिला ठार
आणि
· मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डेन जोडी अजिंक्य
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातल्या सर्व पाच लोकसभा मतदारसंघातून ९७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर तसंच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. रामटेक लोकसभा मतदारसंघातून ३५ पैकी सात, भंडारा-गोंदियातून २२ पैकी चार, गडचिरोली-चिमूर १२ पैकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नागपूर लोकसभा मतदारसंघातून २६, रामटेक २८, भंडारा-गोंदिया १८, गडचिरोली-चिमूर १२, तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत काल नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीकडून अकबर अख्तर खान यांनी तर अपक्ष उमेदवार साहेबराव भिवा गजभारे यांनी काल अर्ज दाखल केले.
हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार हेमंत श्रीराम पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं पक्षात स्वागत करतांना, पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मराठवाड्यात आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची काल घोषणा केली. या पाच उमेदवारांमधे बारामती तसंच शिरूर इथून विद्यमान खासदार अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं जाहीर झाली असून, अहमदनगर इथून निलेश लंके, वर्धा इथून अमर काळे, तर दिंडोरीहून भास्कर भगरे हे उमेदवार असणार आहेत.
दरम्यान, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. दोन्हीही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांमधे इतर पक्षांच्या नेत्यांचा समावेश करतांना त्यांच्या पदाचा उल्लेख केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बारामती मतदार संघातून सुनेत्रा पवार यांना तर परभणी मतदार संघातून महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. जानकर हे महायुतीचे उमेदवार, आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जानकर यांनी उद्या सोमवारी आपण अर्ज भरणार असल्याचं सांगितलं आहे.
****
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री आणि महायुतीमध्ये अडचण होत असल्यानं आपण माघार घेतल्याचं शिवतारे यांनी काल पुण्यात सासवड इथं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं त्यांनी ही घोषणा केली. आपण स्वतः निवडणुकीपासून दूर राहणार असून एकही उमेदवार देणार नाही, असं स्पष्ट करत, निवडणुकीबाबतचा निर्णय समाजानं घ्यावा असं जरांगे यांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट निवडणूक आयोगानं ठेवलं आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर काल या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला, दुसरा भाग आज सायंकाळी सव्वा सात वाजता वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकता येईल.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल चार मान्यवरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर प्रदान केला. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी व्ही नरसिंहराव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. नरसिंहराव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, स्वामीनाथन यांच्या कन्या नित्या राव, चरणसिंग यांचे नातू जयंतसिंग, कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी हा सन्मान स्वीकारला. दरम्यान, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
****
रंगपंचमीचा सण काल विविध ठिकाणी हर्षोल्हासात साजरा झाला. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं श्रीतुळजाभवानी मातेस पंचामृत अभिषेक झाल्यानंतर देवीच्या मूर्तीवर रंगाची उधळण करण्यात आली. तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक सोमनाथ माळी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्यासह सेवेकरी पुजारी या सोहळ्यात सहभागी झाले. तुळजाभवानी मातेस रंग लावल्यानंतर शहरात रंगपंचमी खेळण्यास आरंभ झाला, सांयकाळपर्यंत हा जल्लोष सुरू होता.
लातूर शहरात रंगपंचमीचा मोठा उत्साह दिसून आला. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोरडे रंग खेळण्याचे आवाहन प्रशासनानं तसंच अनेक सामाजिक संघटनांनी केलं होतं. त्यानुसार अनेकांनी कोरडे रंग खेळण्याला पसंती दिली.
दरम्यान लातूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे ६५ आजी-आजोबांसोबत कोरडे रंग खेळून रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र मढी इथं कानिफनाथांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त काल असंख्य भाविकांनी कानिफनाथांचं दर्शन घेतलं. रेवड्याची उधळण, पारंपारिक ढोल ताशा, शंख , डफाच्या तालबद्ध आवाजाने संपूर्ण मढी परिसर दुमदुमून गेला होता.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्यावतीने काल रंगोत्सव कवितेचा हे कवी संमेलन घेण्यात आलं. कवी पी. डी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात अनेक कवींनी आपल्या रचना सादर केल्या, रसिकांची या रचनांना दिलखुलास दाद मिळाली.
****
पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार इंदूर इथले साहित्यिक डॉ अनिल गजभिये यांना प्रदान करण्यात आला. काल छत्रपती संभाजीनगर इथं ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गजभिये यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्रं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
मराठवाड्याच्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड शहरासह जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात काल दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. आष्टी तालुक्यातल्या हनुमंतगावात वीज अंगावर कोसळल्याने ७० वर्षीय वृद्ध महिला ठार झाली.
नांदेड शहरासह जिल्ह्यात अर्धापूर तसंच हदगाव तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यात बहुतांश ठिकाणी काल सायंकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात पीरबावडा इथं काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला आहे.
दरम्यान या पावसामुळे विभागात काढणीला आलेल्या ज्वारी, हरबरा, हळद पिकांसह आंबा, केळी आणि संत्रा फळबागांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात रोहन मॅथ्यू जोडीने अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॉजिसेक आणि क्रोएशियाच्या इवान डोडिग या जोडीचा ६-७, ६-३, १०-६ असा पराभव केला. रोहन बोपण्णाचं हे दुहेरीतलं २६ वं विजेतेपद आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी उत्सव आज साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक दिंड्या आणि शेकडो वारकरी पैठण शहरात दाखल झाले आहेत. या सोहळ्यात आज दुपारी मानाच्या दिंड्यांची मिरवणूक निघणार आहे. यावेळी नाथमंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरम्यान, एकनाथ महाराजांच्या वाड्यातला पाण्याचा रांजण काल भरला. तुकाराम बीजेपासून हा रांजण भरण्याला प्रारंभ होतो, काल नेहा मकरंद पैठणकर यांच्या हस्ते हा रांजण भरल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****
नांदेडमध्ये विमान सेवेला आजपासून प्रारंभ होत आहे. नांदेड - बंगळुरू, नांदेड - दिल्ली - जालंधर ही विमानसेवा दररोज तर नांदेड - हैदराबाद आणि नांदेड -अहमदाबाद ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथूनही आजपासून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होत असून, हैदराबाद तसंच मुंबईसाठी एक वाढीव विमान सुरू होणार आहे.
****
No comments:
Post a Comment