Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशात सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २७ तारखेला संपत असून, २८ तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, आणि गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून, इथल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं केली आहे. या जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्याआधी संविधान चौकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसंच नागपूर जिल्हा काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. तर भाजपाकडून ज्येष्ठ नेते नितीन गडकरी उद्या अर्ज दाखल करतील.
****
पंजाबमध्ये भाजपने कोणत्याही पक्षासोबत युती केली नसून, स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनिल जाखड यांनी आज ही घोषणा केली.
उत्तर प्रदेशात या निवडणुकीत राष्ट्रीय लोक दल भाजपसोबत आहे, तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. बहुजन समाज पार्टीनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये, गया, नवादा, औरंगाबाद आणि जमुई लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेला वेग आला आहे.
****
भाजप उमेदवार कंगना राणावत यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात, राष्ट्रीय महिला आयोगानं निवडणूक आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. असभ्य आणि अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सुप्रिया श्रीनेत आणि एच एस अहिर यांच्या वर्तनाची दखल घेऊन, त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.
दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांच्या आक्षेपार्ह मजकूरावर भाजपकडून तीव्र टीका करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कठोर कारवाई करावी, असं भाजपच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला, यांनीही ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांनी संबंधित वक्तव्य काढून टाकलं आहे. आपलं अकाऊंट हॅक झालं असून, यासंदर्भात तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आज जिल्ह्यातल्या सर्व दोन हजार सहाशे नव्याण्णव मतदान केंद्रावर ‘चुनाव की पाठशाला’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रेच्या तयारीला सुरूवात झाली आहे. त्यासाठी यात्रेकरूंना आवश्यक परवानगी देणाऱ्या आरोग्य प्रमाणपत्रांची व्यवस्था जम्मू विभागातल्या दहा जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. या क्षेत्रातल्या ११२ डॉक्टरांना, आरोग्य केंद्रांमधून आरोग्य प्रमाणपत्रं देण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसात यात्रेकरुंच्या नोंदणीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात येत्या चार एप्रिलला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या काल कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा महामार्ग शेतकरी, शेती, पर्यावरण आणि समाज उध्वस्त करणारा असल्याचा आरोप या समितीनं केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष हिरालाल परदेशी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं, बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं.
****
मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. फ्लोरिडा मध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात या जोडीनं ह्यूगो निस आणि जॅन झीलिन्स्की या पोलिश जोडीचा सात - पाच, सात - सहा असा पराभव केला. बोपण्णा - एब्डेन जोडीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज सेम व्हर्बीक आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या डच-ऑस्ट्रेलियन जोडीशी होणार आहे.
****
कन्याकुमारी इथं झालेल्या २०व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला. मुंबईच्या विद्यानिधी मराठी माध्यमिक शाळेनं या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.
****
No comments:
Post a Comment