Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 March
2024
Time 18.10 to
18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
· लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनाकडून
विविध उपक्रमांचं आयोजन;निवडणूक संदर्भात प्रशिक्षणं तसंच इतर अनुषंगिक कामांना वेग
· अमरावती इथून प्रहार पक्षाची दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर;रामटेकहून
आता श्यामकुमार बर्वे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
· शेकापच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं
निधन
आणि
· धाराशिव जिल्ह्यात ४५ हजारावर शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसान
भरपाई वाटपास प्रारंभ
****
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी
प्रशासकीय यंत्रणेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नाशिक लोकसभा निवडणूकीसाठी स्वीप
कार्यक्रमांतर्गत आज मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व
शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. प्रत्येक
शाळेत निवडणूक साक्षरता कक्ष स्थापन करण्यात यावा, या कक्षाच्या माध्यमातून
निवडणुकीविषयी जनजागृती करण्यात यावी, या कक्षाचं सर्व कामकाज करण्यासाठी
विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी, अशा सूचना मित्तल यांनी दिल्या
आहेत.
****
लातूर इथं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार स्वीप कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ३०७
शाळांमध्ये पालक मेळावे घेण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत
पालकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली. यावेळी पालकांना मतदान करण्याबाबतचं संकल्पपत्र
देवून मतदानाचं महत्त्व सांगण्यात आलं तसंच पालकांना ७ मे रोजी न चुकता मतदान करण्याचं
आवाहन करण्यात आलं.
****
धाराशिव तालुक्यातल्या गोवर्धनवाडीच्या जिल्हा
परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना पत्र लिहून मतदान करण्याचं
आवाहन केलं आहे. मतदान जनजागृती उपक्रमात या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
मतदानाची टक्केवारी वाढवण्या साठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग
म्हणून विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम घेतल्याचं मुख्याध्यापक
तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सचिन हुलसूरकर यांनी सांगितलं.
****
निवडणुकी संदर्भात प्रशासकीय कामकाजालाही
वेग आला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूकीच्या अनुषंगानं आज परभणी, गंगाखेड, पाथरी
आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र अध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी यांना
आज दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणास उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
मतदान यंत्र,
व्ही व्ही पॅट तसंच इतर साहित्याबाबतची सविस्तर माहिती तसंच
हॅन्डऑन ट्रेनिंग द्वारे प्रशिक्षण देण्यात आलं. जिल्हाधिकारी तथा
निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
हिंगोली इथं निवडणूक निरीक्षक अनवर अली यांनी
आज जिल्हा संपर्क कार्यालयातल्या तक्रार निवारण कक्षाची पाहणी केली, माध्यम
प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाला भेट दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नंदुरबार इथं आज लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी शेखर पाटील यांनी स्ट्रॉग रुमची पाहणी केली. यावेळी शेखर पाटील यांनी सुरक्षेच्या
दृष्टीनं आवश्यक त्या सूचना उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
****
बुलडाणा जिल्ह्यात उमेदवारांची अर्ज भरण्याची
लगबग सुरु झाली आहे. यात महाविकास आघाडी कडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, महायुतीकडून
विद्यमान बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव, वंचित
बहुजन आघाडीचे वसंतराव मगर यांचा समावेश आहे. शेतकरी चळवळीतील नेते रविकांत तुपकर हे
देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
अमरावती लोकसभा मतदारसंघात आज बच्चू कडू
यांच्या प्रहार पक्षानं अमरावतीचे माजी नगरसेवक दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली
आहे. या मतदारसंघात आतापर्यंत महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार नवनीत राणा, महाविकास
आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे तर वंचित बहुजन आघाडीच्या
वतीनं कुमारी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
****
रामटेक लोकसभा मतदारसंघात जात प्रमाणपत्र
अवैध ठरलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या ऐवजी त्यांचे पती श्यामकुमार दौलत
बर्वे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. या मतदार संघात उमेदवारी अर्ज
दाखल करण्याची मुदत २७ मार्च रोजी संपली, मात्र श्यामकुमार बर्वे यांनी
या मुदतीत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रश्मी बर्वे यांनी काल
रात्री उशीरा पत्रकार परिषद घेत, विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप
केला.
****
'ऑल इंडिया जमियतूल कुरैश' या
कुरैश समाजातील सामाजिक संघटनेनं नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन
गडकरी यांना समर्थन जाहीर केलं आहे. १२ एप्रिलला गरीब नवाज नगर मैदानावर संघटनेचे अध्यक्ष
अब्दूल गनी कुरेशी यांच्या नेतृत्वात गडकरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात
आलं आहे. नागपुरातील तेलगू भाषिक महासंघांतर्गत येणाऱ्या १२ संघटनांनी एका पत्राच्या
माध्यमातून नितीन गडकरी यांना विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
****
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून
अर्थसहाय्य मिळवणं आणि रुग्णालय अंगीकृत या दोन्हीही प्रक्रिया पूर्णतः निःशुल्क असल्याचं
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं आहे.
सन २०२२ पासून या कक्षातून मिळणाऱ्या अर्थसाहाय्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून
अवघ्या १ वर्ष ८ महिन्यांच्या कार्यकाळात तब्बल २१३ कोटी रुपयांहून अधिकचं अर्थसाहाय्य
गरजू रुग्णांना वितरीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या काही भागात या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेतून
गरजूंना आर्थिक मदतीचा लाभ देण्यासाठी काही दुष्टप्रवृत्ती आर्थिक अपहार करत असल्याची
माहिती प्रसारमाध्यमांतून कक्षाला प्राप्त होत आहे. या माहितीमध्ये सत्य आढळल्यास नियमानुसार
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं चिवटे यांनी सांगितलं.
****
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी
मंत्री मीनाक्षी पाटील यांचं आज पहाटे निधन झालं. त्या ७६ वर्षांच्या होत्या. मीनाक्षी
पाटील या अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या तीन वेळा आमदार होत्या. १९९९ मध्ये विलासराव
देशमुख यांच्या सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पार्थिव
देहावर आज रायगड जिल्ह्यातल्या पेझारी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार
आहेत.
****
प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस
गुड फ्रायडे आज पाळला जात आहे. यानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं
स्मरण केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२२ मधील नुकसानीपोटी
सहा महसूल मंडळातील ४५ हजार १० शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी ६२ लाख रुपये जमा करण्याची
प्रक्रिया सुरू झाली आहे. यात कळंब तालुक्यातील मोहा, धाराशिव
तालुक्यातील पाडोळी,
तुळजापूर तालुक्यातील सलगरा आणि सावरगाव तर परंडा तालुक्यातील
अनाळा आणि सोनारी या महसूल मंडळांचा समावेश आहे.
****
प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता
परीक्षा अर्थात 'सेट' ही येत्या ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत उमेदवारांची प्रवेशपत्र सेट
विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहेत. राज्यातल्या १७ शहरांत ही परीक्षा
होणार आहे. आचारसंहितेमुळे या परीक्षेबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या; पण
आता अधिकृतपणे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानं सेटबाबत संभ्रम दूर झाला आहे.
****
गव्हाची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी
केंद्र सरकारनं सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना गव्हाचा साठा जाहीर करण्याचे आदेश
दिले आहेत. सध्या तांदळाच्या साठ्याची नोंदणी करणं बंधनकारक आहे. किरकोळ आणि घाऊक विक्रेते, मॉल, आणि
प्रक्रिया करणाऱ्यांना आपल्याकडचे साठे १ एप्रिलपासून सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर
करावे लागतील. त्यानंतर पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी गहू तसंच तांदळाच्या साठ्यांची
माहिती अद्ययावत करावी लागणार आहे. नोंदणी न केलेल्या व्यावसायिकांनी नोंदणी करून साठ्याची
माहिती द्यावी,
असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दूरसंचार विभागानं खोट्या कॉंल संदर्भात
एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार
अशा कॉलद्वारे वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असून दूरसंचार विभागाकडून असे
कॉल केले जात नसल्याचं या मार्गदर्शक सूचनेत म्हटलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता
नाईट रायडर्सशी होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.
****
No comments:
Post a Comment