Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान केला. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी व्ही नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी हे पुरस्कार स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहंमत्री अमित शहा, यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी १०२ जागांकरिता मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि रामटेक या पाच मतदारसंघांचा समावेश आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगानं एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर कल जाहीर करण्याबाबत मर्यादा घालून दिल्या आहेत. या निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झालं तरी, मतदानोत्तर कल घोषित करण्यावर आयोगानं एक जूनपर्यंत बंदी घातली आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुठल्याही ठिकाणचे एक्झिट पोल जाहीर करता येणार नाहीत.
****
१५०० पेक्षा जास्त मतदारांचं मतदान असलेल्या केंद्राच्या ठिकाणी नवीन सहाय्यकारी मतदान केंद्र तयार करण्यास निवडणूक आयोगानं नाशिकच्या जिल्हा प्रशासनाला मान्यता दिली आहे. त्यामुळं आता नव्यानं ६१ मतदान केंद्र वाढणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनेक मुद्यांवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर दोन भागात आज आणि उद्या संध्याकाळी सव्वा ७ वाजता वृत्तविशेष या कार्यक्रमात ही मुलाखत ऐकता येईल.
****
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व लोकसभा मतदार संघातली परिस्थिती आणि एकूण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी, ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम देखील आकाशवाणी घेऊन येत आहे. येत्या सोमवारी एक एप्रिलपासून संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेदरम्यान हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी, भाजपमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. दरम्यान, खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर मानहाणीचा दावा करणार असल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे.
****
समुद्री चाच्यांच्या तावडीत सापडलेल्या इराणच्या जहाजाला भारतीय नौदलानं काल मुक्त केलं. १२ तासांच्या कारवाईनंतर जहाजावरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आल्याची माहिती नौदलानं दिली आहे.
****
राज्यातल्या १२० साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे, मात्र ८७ साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू आहे. या कारखाना क्षेत्रातला ऊस संपेपर्यंत हे कारखाने सुरू ठेवले जाणार असल्याचं, साखर आयुक्तालयातून सांगण्यात आलं. राज्यात १०६ सहकारी आणि १०५ खासगी, असे एकूण २११ साखर कारखाने आहेत. यंदा त्यापैकी १०३ सहकारी आणि १०४ खासगी अशा एकूण २०७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केलं, तर चार कारखाने गाळप सुरू करू शकले नाहीत.
****
पुण्यातल्या कात्रज तलावात आणि देहूमध्ये इंद्रायणीच्या तीरावर प्रदूषणामुळं हजारो माशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्लीतील मुख्य खंडपीठानं स्वतःहून दखल घेतली आहे. आगामी महिनाभरात त्यासंबंधीचं लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश लवादानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
****
अकोला इथं गडंकी प्रशिक्षण केंद्रात काल दुपारनंतर जवळपास १५ प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांना दूषित पाणी आणि कडक उन्हामुळं त्रास झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
माद्रीद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत काल त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीवर २१-१४, ११-२१, १७-२१ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत भारताच्या तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पोन्नप्पा या जोडीला उपांत्या पूर्व फेरीत परभव पत्करावा लागला.
****
मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांचा पुरुष दुहेरीतील अंतिम सामना आज अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॉजिसेक आणि क्रोएशियाच्या इवान डोडिग या जोडीशी होणार आहे. बोपन्नाचा हा १४वा एटीपी मास्टर्स अंतिम सामना असून, त्यानं आतापर्यंत २५ वेळा दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.
****
No comments:
Post a Comment