Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक आयोग आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत निवडणुकांना प्रोत्साहन देत आहे. आयोगाने निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांना, मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान मंडळाने ई-पुस्तकं आणि ई-दस्तऐवजांच्या वापरावर भर दिला आहे. मतदानादरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले. आयोगाने निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांना, एकेरी वापराचे प्लास्टिक पूर्णपणे टाळण्याचं आवाहन केलं आहे. राजकीय पक्षांना प्रचार कार्यक्रमांसाठी अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
यावर्षी जानेवारी महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे सुमारे आठ लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली. यामध्ये १८ ते २५ वर्ष वयोगटातल्या सदस्यांची संख्या लक्षणीय असून, महिला सदस्यांची संख्या दोन लाखाहून अधिक आहे.
****
रंगांची उधळण करणारा धुळवडीचा सण आज सर्वत्र हर्षोल्हासात साजरा होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा इथं बंजारा समाजाच्या पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे होळी सण साजरा करण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं पाच हजार १०० शेणपोळ्यांनी होळी सजवण्यात आली आणि त्यावर शुद्ध शेणापासून बनवलेल्या आकर्षक सजावटीसह होलिकेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. काल रात्री हा होलिका दहन सोहळा पार पडला.
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी काठी संस्थानाचा रजवाडी होळी उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. आदिवासी बांधवांनी बुध्या, बावा आणि मोरख्याचा खास पारंपारीक वेश परिधान करुन आदिवासी नृत्य सादर केलं.
****
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या लस बनवणाऱ्या कंपनीने भारतात प्रौढांवर क्षयरोग प्रतिबंधक लसीच्या म्हणजे एम टी बी व्हँकच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. बायोफॅब्री या स्पॅनिश बायो फार्मास्युटिकल कंपनीने मानवी स्त्रोताकडून मिळवलेली, ही क्षयरोग प्रतिबंधावरील पहिली लस आहे. या चाचण्या बायोफॅब्रिच्या सहकार्याने केल्या असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. एचआयव्ही संक्रमित नसणाऱ्या प्रौढांमध्ये या लसीची मात्रा यापूर्वीच दिली असून, एम टी बी व्हँक ही लस सुरक्षित आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी आता एचआयव्ही बाधित प्रौढांना ही लस देऊन त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास सुरू करण्यात आला असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
****
चंद्रयान-तीन चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं त्याला 'शिवशक्ती' हे नाव देण्याला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा नजिक असलेल्या नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव शिवारात संत्रा घेऊन जात असलेल्या ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात परभणी मार्गावर असलेल्या हळद पावडर कारखान्यास आज पहाटे शॉट सर्किटमुळे लागलेल्या आगीत हळद आणि मशनरी जळून मोठं नुकसान झालं. आग आटोक्यात आणण्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली इथल्या अग्निशमक दलास पाचारण करण्यात आलं होतं. या आगीत जवळपास १२ कोटीच्या वर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
****
होळी सणाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने धुळे तालुक्यातल्या आर्णी आणि धनगरवाडी इथल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापेमारी करून एकूण १४ हातभट्टी निर्मिती केंद्र उध्वस्त केले. याप्रकरणी एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले असून, १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण पाच लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
जागतिक कबड्डी दिनानिमित्त काल भारतानं एका सामन्यात सर्वाधिक खेळाडूंच्या सहभागाची विक्रमी नोंद केली. वर्ल्ड कबड्डी आणि होलिस्टीक इंटरनॅशनल प्रवासी स्पोर्टस असोसिएशन अर्थात हिपसा या संस्थांनी हा सामना हरियाणात पंचकुला इथं आयोजित केला होता. तीन तास चाललेल्या या सामन्यात १२८ खेळाडूंनी भाग घेतला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस च्या पथकाकडून हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी या विक्रमाच्या नोंदीचं प्रमाणपत्र स्वीकारलं.
****
लेबनानमधे झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिनं महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीच्या सामन्यात श्रीजा हिनं लक्झेम्बर्गच्या सारा नटे हिचा सहा-११, १२-१०, ११- पाच, ११-नऊ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत भारताच्या पोयमन्ती वैश्य आणि आकाश पाल या जोडीनं, तर पुरुष दुहेरीत मानुष शहा आणि मानव ठक्कर या जोडीनं अजिंक्यपद पटकावलं.
****
No comments:
Post a Comment