Friday, 29 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:29.03.2024रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 March 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी;परभणी, हिंगोली आणि नांदेडसह राज्यातल्या आठ मतदार संघांत २६ एप्रिलला मतदान 

·      नांदेड इथं काल एक उमेदवारी अर्ज दाखल;परभणीत २६ तर हिंगोलीत ११९ अर्जांचं वितरण

·      रामटेक इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द

·      शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर-हिंगोली इथून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी

आणि

·      मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्‍‍मय पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी झाली. या टप्प्यात १२ राज्यांमधल्या ८९ मतदार संघांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली आणि नांदेडसह, राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम आणि वर्धा या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या सर्व मतदार संघात चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

नांदेड इथं काल पहिल्याच दिवशी एक नामनिर्देशनपत्र दाखल झालं आहे. अपक्ष उमेदवार जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी उमेदवादी अर्ज भरल्याची माहिती, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

परभणी इथं काल एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालं नाही. मात्र २१ जणांना २६ अर्जांचं वितरण करण्यात आलं. तर हिंगोली इथं ४१ जणांनी ११९ अर्ज नेले आहेत.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल उमेदवारी अर्ज भरला, त्यासोबत त्यांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातले विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात असून, पक्षानं त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गायकवाड यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या पाच मतदार संघातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. नागपूर मतदारसंघात २६, भंडारा-गोंदिया- २२, गडचिरोली-चिमूर- १२, चंद्रपूर- १५ आणि रामटेक लोकसभा मतदार संघात ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या ३० मार्च पर्यंत असून, १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

****

रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी समितीनं रद्द केलं आहे. सुनील साळवे नामक व्यक्तीनं याबाबतची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीनं दिला आहे.

****

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं काल उमेदवारांची पहिली यादी जारी केली. हिंगोली इथून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूर - संजय मंडलिक, शिर्डी - सदाशिव लोखंडे, बुलडाणा - प्रतापराव जाधव, मावळ - श्रीरंग बारणे, रामटेक राजू पारवे, तर हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

दरम्यान, सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांचं पक्षात स्वागत केलं.

****

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठांनी पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फक्त नेट परीक्षेचे गुण ग्राह्य धरावेत, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग , युजीसीनं दिले आहेत. त्यानुसार पीएचडी अभ्यासक्रमासाठी विविध विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांच्या प्रवेश परीक्षांऐवजी फक्त नेट परीक्षेचा निकाल ग्राह्य धरला जाणार आहे.

****

 प्रभू येशू ख्रिस्तांचा बलिदानाचा दिवस गुड फ्रायडे आज पाळला जात आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनेसह मानवतेचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

फ्रान्स इथल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी शशी खंदारे दिग्दर्शित जिप्सी, श्रीकांत भिडे दिग्दर्शित भेरा आणि मनोज शिंदे दिग्दर्शित वल्ली या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. कान इथं येत्या १४ ते २२ मे दरम्यान हा महोत्सव होणार आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिले जाणारे विशेष वाङ्‍‍मय पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबई इथले राजीव नाईक यांना, नटवर्य लोटू पाटील विशेष वाङ्‍‍मय नाट्य पुरस्कार, तर पुणे इथले माधव गाडगीळ यांना यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्‍‍मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मसापच्या डॉ. ना गो नांदापुरकर सभागृहात सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

****

दिवंगत शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाथ नेरळकर शिष्य परिवारातर्फे आज नाथस्वर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज सायंकाळी सहा वाजता तापडिया नाट्य मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात गायक कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचं सादरीकरण होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका क्षेत्रातल्या महिला बचत गटांचा मतदार जाणीव जागृती कार्यक्रम काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलं. बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी आणि मतदानात महिलांचा सहभाग वाढवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बालकांसाठी मतदान केंद्र इमारतीत पाळणा घर सुविधा उपलब्ध करुन द्यायची असून, हे पाळणाघर संचालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी अन्य एका बैठकीत दिले. 

****

लातूर इथल्या पोलीस कवायत मैदानावर सुरु असलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी मूकबधीर विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली.

****

लोकसभा निवडणूक काळात आपल्या व्हाट्सॲप समूहावरून राजकीय प्रचार केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक यू. एस. धोटे यांना निलंबित करण्यात आलं आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही कारवाई केली.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या खडकी तांडा इथं उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हातभट्टी रसायन आणि हातभट्टी दारू विक्री दुकानावर छापा मारुन पाच लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

मध्य प्रदेशात जबलपूर इथं नुकत्याच झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय आंतर विद्युत क्रीडा स्पर्धेत, छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण संघानं शरीरसौष्ठव आणि भारोत्तोलन खेळात लक्षणीय यश मिळवलं आहे. शरीरसौष्ठव प्रकारात राहुल कांबळे आणि विशाल मोहाळे यांनी रौप्यपदक, तसंच सूरज कोंगे आणि अमित पाटील यांनी कांस्यपदक जिंकलं. वाळूज एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता रवी मिरगणे यांनी भारोत्तोलन खेळात कांस्यपदक पटकवलं आहे. याच प्रकारात महवितरणनं सांघिक तृतीय पारितोषिकही पटकावलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नागरिकांना थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरण्यासाठी आज, उद्या आणि परवा ३१ मार्च रोजी सुट्टीच्या दिवशीही सर्व वॉर्ड, प्रशासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत. नागरिकांना सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कर भरता येणार आहे. ज्यांची मालमत्ता कराच्या कक्षेत नाही अशा नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत आपल्या मालमत्तेला कर लावून घ्यावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.

बीड जिल्ह्यातही ३१ मार्च रोजी कोषागार कार्यालय तसंच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा सुरुर राहणार आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या येरमाळ्याचे मंडळ अधिकारी देवानंद मरगू कांबळे यांना चार हजार रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं. चोराखळी इथल्या देवस्थान जमिनीतल्या मुरमाची रॉयल्टी न भरता वाहतुकीस परवानगी देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं जिल्हा ग्रंथोत्सवाचं काल कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. चांगलं जीवन जगायचं असेल, तर साहित्य वाचलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या ग्रंथोत्सवाचा आज समारोप होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पाणी पातळीत घट होत आहे. सेलू तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पात केवळ आठ पूर्णांक २६ टक्के इतकाच पाणीसाठा असून, येत्या काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १८५ धावा केल्या, प्रत्यूत्तरादाखल आलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ १७३ धावाच करु शकला. या स्पर्धेत आज रॉयज चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना होणार आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वाधिक ४२ पूर्णांक ८ अंश सेल्सियस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं सर्वाधिक ४१ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नांदेड इथं ४० पूर्णांक दोन, बीड इथं ४० पूर्णांक एक तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...