Friday, 29 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:29.03.2024रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 March 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज असून, सरकार सर्व गावांना डिजिटल सुविधा पुरवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानानं क्रांती होऊ शकते, असं त्यांनी नमूद केलं. लोकांमध्ये तंत्रज्ञानावरील विश्वास वाढवण्यासाठी आणि त्याची मूल्यं वाढवण्यासाठी सरकार सतत योगदान देत असून, डेटा सुरक्षा ही चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय बद्दल देखील चिंता व्यक्त करत पंतप्रधानानी, योग्य प्रशिक्षणाशिवाय एआय कोणालाही दिलं गेलं, तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त केली.

****

प्रभू येशू ख्रिस्तांचा बलिदानाचा दिवस गुड फ्रायडे आज पाळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात, प्रभू येशुंचं बलिदान प्रत्येकाला दया आणि क्षमा वृत्ती वाढवण्याची सतत प्रेरणा देईल, असं म्हटलं आहे. गुड फ्रायडे निमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनेसह मानवतेचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

रामटेक लोकसभा मतदारसंघात जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार दौलत बर्वे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. रश्मी बर्वे यांनी काल रात्री उशीरा पत्रकार परिषद घेत, विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक काल दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, नाशिक, बीड, अहमदनगर, बुलडाणा, धाराशिव या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक, संलग्नित तालुक्यांचे तहसिलदार या बैठकीत सहभागी झाले होते. निवडणूक कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करुन आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थे संदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचं नियोजन करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

****

राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातल्या निवडणुकीसाठी ३७ प्रमुख प्रचारकांची यादी काल जाहीर केली. यात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम आदींचा समावेश आहे.

****

शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं आज पहाटे निधन झालं. मीनाक्षी पाटील या अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या तीन वेळा आमदार होत्या. १९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज रायगड जिल्ह्यातल्या पेझारी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या ९२४ किलोमीटर अंतराच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. नुकत्याच मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झालेल्या रेल्वे लाईन्स वगळता, नांदेड विभागातल्या पूर्वीच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईन्सचं संपूर्ण विद्युतीकरण झाल्याची माहिती, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून देण्यात आली.

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात ताडगाव-दामरंचा रस्त्यावर पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. अशोक तलांडे असं मृत व्यक्तीचं नाव असून, आज पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकलं असून, हत्येचं कारण त्यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, अशोक हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता, असं पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं.

****

मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात या जोडीने स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरेसियो जेबालोस या जोडीचा सहा - एक, सहा - चार असा पराभव केला. अंतिम सामन्यात उद्या शनिवारी बोपन्ना - एब्डेन जोडीचा सामना अमरीकेच्या ऑस्टिन क्राजिसेक और क्रोएशियाच्या इवान डोडिग यांच्याशी होणार आहे.

****

माद्रिद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुनं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात तीने तैवानच्या खेळाडुचा २१ - १४, २१ - १२ असा पराभव केला. पुरुष दुहेरीतही ध्रूव कपिला आणि एम आर अर्जुन, महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रिस्टो तर मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी अणि बी सुमित यांच्या जोडीने पुढील फेरीत प्रवेश केला.   

****

धुळे शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांच या पावसामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

No comments: