Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 March
2024
Time 18.10 to
18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
· लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची
मुदत संपली;उद्यापासून दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला प्रारंभ
· उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची पहिली यादी जाहीर;औरंगाबाद-चंद्रकांत
खैरे, उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर, परभणी-संजय जाधव तर हिंगोलीतून नागेश पाटील
यांना उमेदवारी
· वंचित बहुजन आघाडीची ओबीसी महासंघाशी युती;उमेदवारांची
पहिली यादीही जाहीर
· तुकाराम बीजेचा सोहळा सर्वत्र भक्तिभावानं साजरा
आणि
· राज्यात बहुतांश ठिकाणचं तापमान चाळिशी पार;मराठवाडाही
चाळिशीच्या उंबरठ्यावर
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी
अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, आणि
गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर मतदारसंघातून महायुतीचे
उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी
अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. रामटेकचे शिवसेना आणि महायुतीचे
उमेदवार राजू पारवे,
भंडारा-गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढे, महाविकास
आघाडी आणि काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनीही आज आपले उमेदवारी अर्ज
दाखल केले.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून
प्रारंभ होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्या याबाबतची अधिसूचना जारी केल्यानंतर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यांमधल्या
८८ लोकसभा मतदार संघांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली
आणि नांदेडसह,
राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम
आणि वर्धा या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या सर्व मतदार संघात उद्यापासून चार
एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज
मागे घेता येणार आहेत.
****
देशातल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर
निवडणूक आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकरता
सूचना जारी केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्याकरता निवडणूक आयोगानं
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितलं
आहे. यानुसार लोकांनी दुपारी विशेषतः १२ ते तीन या वेळेत बाहेर उन्हात जाणं टाळण्याचा
सल्ला देण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी आणि सावलीची सोय यासह इतर किमान
सुविधा पुरवण्याच्या सूचना आयोगानं केल्या आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाची उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उस्मानाबाद मतदार संघातून
विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव यांना
तर हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना हिंगोली मतदार संघातून उमेदवारी घोषित
झाली आहे.
त्याशिवाय दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, दक्षिण
मुंबई - अरविंद सावंत,
उत्तर पूर्व मुंबई - संजय दिना पाटील, उत्तर
पश्विम मुंबई - अमोल किर्तीकर, ठाणे - राजन विचारे, रत्नागिरी-
सिंधुदुर्ग - विनायक राऊत,
बुलडाणा - नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिम-संजय देशमुख, मावळ
- संजय वाघेरे-पाटील,
सांगली - चंद्रहार पाटील, शिर्डी -भाऊसाहेब वाघचौरे, तर
नाशिक इथून राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केली आहे.
****
दरम्यान, ठाकरे गटाच्या या यादीवर
काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये
चर्चा सुरू होती,
तिथलेही उमेदवार ठाकरे गटानं जाहीर केले, असं
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आघाडी धर्माचं पालन
सगळ्यांनीच केलं पाहिजे,
असं आपलं मत असून, ठाकरे गटानं या जागांबाबत फेरविचार
करावा, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूकीत ओबीसी
महासंघाशी युती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी
आज मुंबईत पत्रकार परिषदेत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अकोल्यातून आपण
स्वत: निवडणूक लढवणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. बुलडाणा-वसंत मगर, अमरावती
- प्राजक्ता पिल्लेवान,
चंद्रपूर - राजेश बेले, भंडारा-गोंदिया - संजय केवट, गडचिरोली-चिमूर
- हितेश मडावी,
वर्धा - राजेंद्र साळुंके, तर यवतमाळ-वाशिम इथून
खेमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला
पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीची
चर्चा अद्याप सुरु असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. आज मुंबईत
पक्षाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. मनसेने तीन जागा मागितल्या असून, दोन
जागांवर चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
तुकाराम बीजेचा सोहळा आज सर्वत्र भक्तिभावानं
साजरा करण्यात आला. संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज यात्रेनिमित्त
आज पुणे जिल्ह्यात देहू इथं श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं काकड आरती, श्रींची
महापूजा आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर पूजा आदी कार्यक्रम घेण्यात आले. यानिमित्त
मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे.
धुळे शहरात कुणबी समाज तसंच वारकरी संप्रदायाने
संत तुकाराम महाराज यांना अभिवादन केलं. यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याचं
पूजन करून भजन तसंच पालखीची मिरवणुक काढण्यात आली.
****
राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानानं चाळिशी
पार केली आहे. राज्यात आज सर्वाधिक ४१ पूर्णांक ५ अंश सेल्सियस तापमान अकोला इथं नोंदवलं
गेलं. त्याखालोखाल वाशिम इथं ४१ पूर्णांक चार, मालेगाव ४१ अंश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली. जळगाव,
बुलडाणा, वर्धा, सोलापूर, आदी
शहरातही पारा चाळीस अंशाच्या वर पोहोचला आहे.
मराठवाड्यातही परभणी तसंच बीड शहराच्या तापमानानं
चाळिशी ओलांडली असून,
इतर प्रमुख शहरंही चाळिशीच्या उंबरठ्यावर आहेत. परभणी इथं ४०
पूर्णांक आठ अंश सेल्सियस तर बीड इथं आज ४० पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमानाची नोंद
झाली. नांदेड ३९ पूर्णांक आठ, छत्रपती संभाजीनगर ३९ पूर्णांक पाच तर धाराशिव
इथं आज ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा शिक्षण
प्रसारक मंडळाच्या देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या स्थापत्य
अभियांत्रिकी आणि विद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकी या दोन विद्याशाखांना नुकतेच नॅशनल
बोर्ड ऑफ ऍक्रेडीएशन -एन.बी.ए. मानांकन मिळाले आहे. 'नॅक'चा
'ए' ग्रेड,
‘एन.ए.बी.एल.’चे मानांकन ‘एन.बी.ए.’चे
मानांकन हे तिन्ही मानांकन मिळवणारे देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे मराठवाड्यातले
एकमेव महाविद्यालय ठरले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ.सुभाष लहाने
यांनी दिली.
****
सांगली जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी स्वीप
अंतर्गत सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस
अधीक्षक संदीप घुगे,
यांच्यासह तसंच शालेय विद्यार्थी, महानगरपालिका
अधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.
****
भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात एकवीस हजार
'नमो संवाद'
सभांचं आयोजन केलं जाणार आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत
पाटील यांनी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रदेश
माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित
होते. ग्रामीण भागात 'नमो चौपाल'
तर युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी 'कॉफी
विथ युथ' असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडून महाराष्ट्रातून
अल्पसंख्याक समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावं, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस अनिल पारखे यांनी केली आहे. याबाबतचं पत्र पक्षाध्यक्ष
मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवण्यात आलं आहे. राज्यात इंडिया आघाडीच्या ४८ जागांपैकी
तीन उमेदवार मुसलमान असावेत, असं या पत्रात म्हटलं आहे.
****
अंबाजोगाई नगरपरिषदेकडे पाणी पुरवठा योजनेची
५ कोटी १४ लाख रुपयांची पाणी पट्टी थकल्याने मांजरा धरणावरून अंबाजोगाई शहराला होणारा
पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणी पट्टी भरण्यासंदर्भात सूचना देऊन ही त्याकडे
दुर्लक्ष केल्याने लातूरच्या पाटबंधारे विभाग क्रमांक १ च्या कार्यकारी अभियंत्यांनी
पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यातली सर्व दुय्यम निबंधक, सह
जिल्हा निबंधक कार्यालये २९ ते ३१ मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार
असल्याचं मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र.बोराळकर यांनी कळवलं आहे. नागरिकांनी दस्तऐवज
नोंदणी, आर्थिक वर्षाचा इष्टांक पूर्ण करणे, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय
योजना या संबंधीचं कामकाज वेळेत पूर्ण करावं असं आवाहन बोराळकर यांनी केलं आहे.
****
उन्हाळी सुट्टी दरम्यान प्रवाशांची होणारी
गर्दी लक्षात घेत,
दक्षिण मध्य रेल्वेनं विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय
घेतला आहे. तिरूपती-साईनगर शिर्डी-तिरुपती, हैदराबाद-जयपूर-हैदराबाद, तिरूपती-अकोला-तिरुपती, पूर्णा-तिरूपती-पूर्णा
या गाड्यांचा यात समावेश असून, सर्व गाड्यांना सुमारे दोन महिने मुदतवाढ
देण्यात आली आहे. सर्व गाड्या पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार धावणार असल्याचं, दक्षिण
मध्य रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment