Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· निवडणूक आयोगाच्या सी व्हिजिल ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या सुमारे ७९ हजार तक्रारी
· प्राप्तिकर विभागाची काँग्रेस पक्षाला सतराशे कोटी रुपये कर वसुलीबाबत नोटीस
· अमरावती इथून प्रहार पक्षाची दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर;रामटेकहून श्यामकुमार बर्वे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
आणि
· दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात ९२४ किलोमीटर रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण
सविस्तर बातम्या
निवडणूक आयोगाच्या सी व्हिजिल या ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या सुमारे ७९ हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, ८९ टक्के तक्रारी तर अवघ्या १०० मिनिटात निकाली निघाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बेकायदेशीर फलक लावल्याच्या सुमारे ५८ हजार ५०० तक्रारी नोंदवल्या गेल्या, तर सुमारे चौदाशे तक्रारींमध्ये पैसे, भेटवस्तू आणि मद्यवाटप केल्याबद्दल आक्षेप आहे. याव्यतिरिक्त धमकी देणं, ध्वनिक्षेपकाचा अनियंत्रित वापर, याबाबतही नागरिकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये कर्नाटक मधल्या तीन तर राजस्थान मधल्या दोन उमेदवारांचा समावेश आहे.
दरम्यान, प्राप्तिकर विभागानं काँग्रेस पक्षाला एक हजार ७०० कोटी रुपये कर वसुलीबाबत नोटीस बजावली आहे. २०१७-१८ ते २०२०-२१ या वर्षातल्या प्राप्तिकरासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसनं या नोटीसचा निषेध केला आहे.
****
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. लातूर इथं स्वीप कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ३०७ शाळांमध्ये पालक मेळावे घेण्यात आले. यावेळी पालकांना मतदान करण्याबाबतचं संकल्पपत्र देवून मतदानाचं महत्त्व सांगण्यात आलं तसंच सात मे रोजी न चुकता मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं.
****
धाराशिव तालुक्यातल्या गोवर्धनवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा विशेष उपक्रम घेतल्याचं मुख्याध्यापक तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सचिन हुलसूरकर यांनी सांगितलं.
****
निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय कामकाजालाही वेग आला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूकीच्या अनुषंगानं काल परभणी, गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघातले मतदान केंद्र अध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आलं. याअंतर्गत मतदान यंत्र, व्ही व्ही पॅट तसंच इतर साहित्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.
****
हिंगोली इथं निवडणूक निरीक्षक अनवर अली यांनी काल जिल्हा संपर्क कार्यालयातल्या तक्रार निवारण कक्षाची पाहणी केली, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाला भेट दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड इथं कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या नियोजित स्ट्रॉंग रूमची जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर ते मतमोजणीपर्यंत म्हणजे चार जूनपर्यंत मतदान यंत्रं या ठिकाणी राहणार आहेत.
****
प्रत्येक मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांनी 'चुनाव का पर्व, देश का गर्व 'या भावनेनं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीनं निवडणूक प्रशिक्षण घेणं आवश्यक असल्याचं, नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं या संर्दभात आढावा बैठकीत बोलत होते.
****
अमरावती लोकसभा मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानं माजी नगरसेवक दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार नवनीत राणा, महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे तर वंचित बहुजन आघाडीनं कुमारी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
****
रामटेक लोकसभा मतदारसंघात जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या ऐवजी त्यांचे पती श्यामकुमार दौलत बर्वे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. या मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २७ मार्च रोजी संपली होती मात्र श्यामकुमार बर्वे यांनी या मुदतीत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
****
साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. इथल्या उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची काल बैठक झाली. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यानंतर बोलताना, साताऱ्याची जागा आपल्या पक्षाची असून ती आपल्याकडेच राहिल, असंही स्पष्ट केलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लंके यांनी राजीनामा दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व लोकसभा मतदार संघातली परिस्थिती आणि एकूण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी, ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम आकाशवाणी घेऊन येत आहे. येत्या सोमवारी एक एप्रिलपासून संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेदरम्यान हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्तविभागांच्या सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनेलवरही हा कार्यक्रम ऐकता येणार आहे.
****
प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस गुड फ्रायडे काल पाळण्यात आला. यानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथं रेल्वेस्थानक मार्गावरून काल शांतता संदेश फेरी काढण्यात आली. दरम्यान येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर संडे उद्या सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिले जाणारे विशेष वाङ्मय पुरस्कार काल छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मुंबई इथले ज्येष्ठ रंगकर्मी राजीव नाईक यांना, नटवर्य लोटू पाटील विशेष वाङ्मय नाट्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आजच्या काळात नाट्यकृती समजून घेणं गरजेचं असल्याचं मत नाईक यांनी व्यक्त केलं. यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार पुणे इथले माधव गाडगीळ यांना दोन दिवसांपूर्वी पुणे इथं त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
****
दिवंगत शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाथ नेरळकर शिष्य परिवारातर्फे काल नाथस्वर हा कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या या कार्यक्रमात गायक कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचं सादरीकरण यावेळी झालं. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या ९२४ किलोमीटर अंतराच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. नुकत्याच मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झालेल्या रेल्वे लाईन्स वगळता, नांदेड विभागातल्या पूर्वीच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईन्सचं संपूर्ण विद्युतीकरण झाल्याची माहिती, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून देण्यात आली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२२ मधल्या नुकसानीपोटी सहा महसूल मंडळातल्या ४५ हजार १० शेतकऱ्यांच्या खात्यात, ४१ कोटी ६२ लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात कळंब तालुक्यातल्या मोहा, धाराशिव तालुक्यातल्या पाडोळी, तुळजापूर तालुक्यातल्या सलगरा आणि सावरगाव तर परंडा तालुक्यातल्या अनाळा आणि सोनारी या महसूल मंडळांचा समावेश आहे.
****
प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ ही येत्या सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत उमेदवारांची प्रवेशपत्र सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहेत.
****
पैठण इथं उद्या होणाऱ्या नाथषष्ठी यात्रोत्सवात सर्व विभागांनी आपापसात समन्वय राखून यात्रेकरुंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल पैठण इथं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणच्या दिंड्या पैठण शहरात दाखल होण्यास प्रारंभ झालं आहे.
****
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काल लातूर इथं काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रचार यंत्रणा गतिमान करण्याची सूचना देशमुख यांनी या बैठकीत दीली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात कवडा इथल्या मातोश्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातले कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती मोहीम राबवली. मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करणारी ही रांगोळी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल पाणी, चारा टंचाई, तसंच मनरेगा अनुषंगाने आढावा बैठक घेतली. निवडणुकीच्या काळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत अपूर्ण कामं पूर्ण केली जाऊ शकतात, त्यामुळे या अंतर्गत येणारी सर्व कामं सुरू ठेवण्याबाबत संबंधितांना त्यांनी निर्देश दिले.
****
धुळे तसंच नाशिक जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये काल अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या भागाचं तापमान काही प्रमाणात कमी झालं. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment