Thursday, 28 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.03.2024, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 March 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं म्हणणं मांडू शकणारा आणि ते ऐकलं जात असणारा भारत हा आपला महत्वाचा भागीदार देश असल्याचे गौरवोद्गगार युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी काल काढले. दिमित्रो कुलेबा हे परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाच्या निमंत्रणावरुन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत येत आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार यांची ते भेट घेतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे प्रादेशिक आणि जागतिक प्रश्न तसंच द्विपक्षीय सहभाग आणि सहकार्य यावर चर्चा होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा गेल्या सात वर्षातील हा पहिलाच भारत दौरा आहे.

****

भारत आणि चीननं आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सैनिकांना हटवणं आणि इतर मुद्द्यांवर तोडग्यासाठी विचार विनिमय केला आहे. काल या संदर्भात पेचिंग इथं एकोणीसावी बैठक झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. राजनैतिक आणि लष्कराच्या माध्यमातून नियमित संपर्क ठेवणं तसंच सीमावर्ती भागात शांतता अबाधित ठेवण्यासंबंधींच्या उपायांवर उभय देशांनी या बैठकीदरम्यान चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाचे आशिया खंडातील प्रकरणाचे माजी संयुक्त सचिव भारतीय शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते.

****

सर्व विद्यापीठांनी २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षापासून, पीएचडीसाठी प्रवेश परीक्षा घेण्याऐवजी नेट परिक्षेतील गुणांचा उपयोग करावा असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. आयोगाचे अध्यक्ष मामीडाला जगदीश कुमार यांनी काल समाज माध्यमावर सामाईक केलेल्या संदेशाद्वारे ही माहिती दिली. जून २०२४ सत्रासाठी नेट अर्ज प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरु होण्याची अपेक्षा असून, राष्ट्रीय चाचणी संस्था त्यावर काम करत असल्याचंही जगदीश कुमार म्हणाले.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

राष्ट्रीय मानवअधिकार आयोगातर्फे आयोजित, नवव्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत "ऱ्हास" या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील एकूण १३९ लघुपटातून "ऱ्हास" या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.

****

अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयापासून १०० मीटरच्या आत प्रचाराचा मजकूर असलेली वाहनं उभी केल्याबद्दल दोघांविरूद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील भरारी पथक क्रमांक ५ चे प्रमुख नीलेश बायस्कर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या वाहनांना परवानगी प्राप्त नसल्यानं तसंच प्रचार मजकूर असलेलं वाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरात आणल्यानं आचारसंहितेचा भंग झाला असून, भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा नोंदवावा, अशी लेखी तक्रार पथकप्रमुख बायस्कर यांनी छायाचित्रणाची सीडी, वाहनचालकांचे आधारपत्र आणि माहितीसह दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.

****

फ्लोरिडातल्या मायामी इथं सुरु असलेल्या मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एबडेन यांचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत स्पेनच्या मार्सेल ग्रॅनॉलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबॉलोस यांच्याशी सामना होणार आहे. कालच्या उपांत्यपूर्व फेरीत बोपन्ना आणि मॅथ्यूनं - सेम व्हर्बीक आणि ऑसी जॉन-पॅट्रिक स्मिथ यांचा ३-६, ७-५, १०-७ असा पराभव केला. या विजयामुळं आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये दुहेरी गटातल्या जागतिक क्रमवारीत बोपण्णाचं स्थान पहिल्या दहामध्ये आलं आहे.

****

माद्रिद ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिनं पहिल्या फेरीत कॅनडाच्या वेन यू झांगचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला. आज उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना तैवानच्या व्हांग यू सनशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या कृष्णाप्रसाद गरगा आणि साई प्रतीक यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी कॅनडाच्या ॲडम डांग आणि नाईल याकुरा यांचा पराभव केला. महिला दुहेरीत आज भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा कॅस्ट्रो यांचा सामना ऑस्ट्रेलियाच्या टिफनी हो आणि ग्रॉनिया सोमर व्हील यांच्याशी होईल.

****

No comments: