Wednesday, 27 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.03.2024रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 March 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या   

·      लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस; विदर्भात अर्ज प्रक्रियेला वेग

·      अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द

·      मराठवाड्यात सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

आणि

·      लातूरच्या सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेची फटाक्यांच्या आतिषबाजीनं सांगता

 

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. यामुळे विदर्भात अर्ज प्रक्रियेला वेग आला आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, आणि गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या पाचही लोकसभा मतदासंघात आतापर्यंत एकूण ४० नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीतले महायुतीचे उमेदवार अशोक नेते, नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

****

महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, असं आवाहन, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही मान्य करावा, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

****

गडचिरोलीचे माजी आमदार आणि आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काल गडचिरोली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, असं उसेंडी यांनी स्पष्ट केलं.

****

महायुतीची उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अंतिम जागावाटप जाहीर केलं जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल पुणे इथं पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर सुनेत्रा पवार याच लढणार, असे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा, पवार यांनी यावेळी केली. परभणीचा उमेदवारही दोन दिवसात ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, परभणी लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. जानकर यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांची सदिच्छा भेट घेऊन परभणी लोकसभा मतदार संघात प्रचारासाठी जात असल्याचं जाहीर केलं.

****

शिवसेनेच्या शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिरुर लोकसभा मतदार संघातून ते महायुतीचे उमेदवार असतील. मात्र या पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलतांना आढळराव पाटील यांनी, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही आपल्या हातात शिवबंधन कायम बांधलेलं असेल, असं सूचक विधान केलं.

****

अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्दबातल ठरवली आहे. स्थानिक नागरिक अनिल दुबे यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. नवीन सदस्याला निवडून आल्यावर फक्त चार महिन्याचा कालावधी मिळणार होता, नियमानं तो कमीतकमी सहा महिने असायला हवा, त्यामुळे खंडपीठाने हा निर्णय दिला.

****

लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचं परिपत्रक राज्य शासनानं जारी केलं. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.

****

विद्यापीठ अनुदान आयोगानं CUET-UG - २०२४ या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. अनेक विद्यार्थी आणि इतरांकडून विनंती आल्यानं हा निर्णय घेतल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

****

रामकृष्ण मठ तसंच रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचं काल रात्री कोलकाता इथं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. कोलकात्याच्या बेलूर मठात आज दिवसभर त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, रात्री बेलूर मठात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

नांदेड इथले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते विधीज्ञ माणिकराव माधवराव उर्फ मामा येवले यांचं काल सकाळी वार्धक्यानं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं पूर्णा मुख्य कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या सुनीता दराडे या १३ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला. अन्य एका घटनेत कळमनुरीजवळ असलेल्या देवदारी तलावात बुडून स्वप्निल सोनुने या युवकाचा मृत्यू झाला.

जालना तालुक्यातल्या कडवंची शिवारात जनावरांसाठी पाणी काढताना शेततळ्यात बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाला सुमित्रा आणि समाधान वानखेडे अशी त्यांची नावं आहेत.

अंबड तालुक्यातल्या गोंदी इथल्या वैतागवाडी शिवारात बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अरसिन शेख आणि कमल भालेराव या दोन मुलींचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या वाघुंडी शिवारात जायकवाडी धरणात पोहायला गेलेल्या सोपान शेळके यांचा, पाण्यात बुडून मृत्यू झाला. अन्य एका घटनेत फुलंब्री तालुक्यातल्या जातवा इथं शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या विष्णु रावते या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.  

****

गेल्या १७ दिवसांपासून सुरू असणाऱ्या लातूरच्या सिद्धेश्वर-रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची, मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीनं काल उत्साहात सांगता झाली. उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे आणि देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वराची महाआरती करण्यात आली. यावेळी वृंदावन इथल्या हरि भक्त परायण जनार्दन महाराज यांचं काल्याचं कीर्तन होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.

****

होळीनिमित्त नांदेड इथं काल शीख बांधवांच्या वतीनं होला महल्ला मिरवणूक काढण्यात आली. श्री सचखंड गुरुद्वारामधून निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्यावतीनं काल एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. उपयोजित संशोधन पद्धती आणि लोकप्रशासन, या विषयावर मुंबई विद्यापीठाचे प्राधाप्यक डॉ.मृदुल निळे, नागपूर इथल्या राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे डॉ. जितेंद्र वासनिक यांचं व्याख्यान झालं. माजी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

****

पुण्याच्या यशदा इथले अधिकारी आणि नांदेडचे भूमिपुत्र डॉ. बबन जोगदंड यांची बालभारती अभ्यासक्रम मंडळाच्या, समाजशास्त्र विषयाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचं सर्वत्र स्वागत होत आहे.

****

लोकशाही बळकट आणि सुदृढ करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, महात्मा गांधी मिशन विद्यापीठात स्वीप जनजागृती कार्यक्रमांतर्गत बोलत होते.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मतदान जनजागृतीसाठी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. हर्सुल इथल्या मनपा केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातच्या विद्यार्थ्यांच्या 'मतदारा जागा हो' या पथनाट्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

****

नांदेड इथं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवारांना प्रचार विषयक विविध परवानग्या देण्यासाठी, एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर वापरासाठीची परवानगी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येईल. उमेदवारांनी तसंच राजकीय पक्षांनी कोणत्याही परवानगीसाठी ४८ तास आधी अर्ज करणं आवश्यक राहील.

****

जागतिक क्षयरोग दिनानिमित लातूर इथं काल जनजागृती फेरी काढण्यात आली. शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत या फेरीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं समारोप झाला. बाभळगाव परिचर्या महाविद्यालय तसंच विलासराव देशमुख परिचर्या महाविद्यालयातले विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते.

****

नांदेड - लातूर महामार्गावर काल भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती पत्नी जागीच ठार झाले. काल दुपारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानजिक ही घटना घडली. अपघातानंतर जीपचालक फरार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहे.

****

No comments: