आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२० मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली. या टप्प्यात १७ राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात राज्यातल्या रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २८ तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. या मतदार संघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
****
माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपालाद्वारे मतदान करण्यास निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. यासाठी मध्यवर्ती अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
****
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं काल पक्षाच्या जाहीरनाम्यावर चर्चा केली. यामध्ये शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी आणि आरक्षण या मुद्द्यांवर भर दिला जाईल, असं राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.
****
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित स्टार्ट अप महाकुंभचा आज समारोप होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयोन्मुख संशोधक, उद्योजक आणि भागधारकांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांनी एका प्रदर्शनाचं लोकार्पण केलं.
****
चालू आर्थिक वर्षात १७ मार्च २०२४ पर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात १९ पूर्णांक ८८ शतांश टक्क्यांनी वाढ झाली आणि ते १८ लाख ९० कोटींहून अधिक झालं आहे. तर सुमारे ३ पूर्णांक ३७ लाख कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. २६ मे रोजी होणारी ही परिक्षा आता १६ जून रोजी होईल.
****
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेननं पाच स्थानांची झेप घेतली असून, तो आता क्रमवारीत १३ व्या स्थानावर आहे. त्याने नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली होती.
****
चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत काल पुण्यात मणिपूरनं उत्तराखंडवर ११ - दोन असा विज्य मिळवलं, अंतिम आठ संघांमध्ये या संघाने धडक मारली. आता बाद फेरीत त्यांचा सामना महाराष्ट्राच्या संघाशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment