Wednesday, 20 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:20.03.2024रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 20 March 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २० मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

देशाच्या युवा शक्तीच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे भारताची स्टार्टअप इकोसिस्टम वेगाने भरभराटीला येत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं, स्टार्ट अप महाकुंभ मेळाव्यात ते आज बोलत होते. स्टार्टअप इंडिया उपक्रमाने नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देण्याबरोबरच त्यांना निधी उपलब्ध करुन दिला, आज देशात सुमारे सव्वा लाख नोंदणीकृत स्टार्ट अप असल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्टार्ट अप चळवळ आता सामाजिक संस्कृती बनली असून, ती देशातल्या छोट्या शहारत देखील पोहोचली आहे. ही अभिमानाची बाब असल्याचं, त्यांनी नमूद केलं. आज या स्टार्ट अप महाकुंभचा समारोप होत आहे. या मेळाव्यात आघाडीचे गुंतवणूकदार, नव प्रवर्तक, आणि महत्त्वाकांक्षी नव उद्योजकांनी लक्षणीय सहभागाचा विक्रम प्रस्थापित केला.

****

केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पारस यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला. लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये जागावाटप करारातून वगळून भाजपने राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षावर अन्याय केल्याचा आरोप करत, पारस यांनी राजीनामा दिला.

****

प्रलंबित विभागीय काम पूर्ण करण्याच्या सुविधेसाठी, देशातली सर्व प्राप्तिकर कार्यालयं येत्या २९, ३० आणि ३१ मार्च या सुटीच्या दिवशीही सुरु राहतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आज हे निर्देश जारी केले.

****

लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली. या टप्प्यात १७ राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदारसंघांचा समावेश आहे. यात राज्यातल्या रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि चंद्रपूर ही पाच मतदारसंघं आहेत. २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २८ तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. या मतदार संघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

****

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी न दिल्यास रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणार नाहीत आणि रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार अपक्ष म्हणून देण्यात येईल, असा इशारा या पक्षानं दिला आहे. याबाबत लवकरच अहमदनगर दक्षिण मतदार संघात मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी काल दिली.

****

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या फोंडाघाट इथल्या तपासणी नाक्यावर सुरु असलेल्या तपासणी दरम्यान एका वाहनात आढळलेली १० लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी काल जप्त केली. आयकर विभागाकडून या रकमेची तपासणी करून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

राज्य संरक्षित स्मारक परिसरात कोणतीही जाहीरात करण्यासाठी, तसंच चित्रीकरण आणि कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, राज्य पुरातत्व संचालनालयाची लेखी परवानगी घेणं आवश्यक करण्यात आलं आहे. संचालयालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी यासंदर्भातलं पत्रक जारी करुन ही माहिती दिली. अशी परवानगी न घेतल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिली आहे. एका शितपेयाच्या कंपनीनं विनापरवानगी आपली जाहीरात मुंबईत अशा स्मारकावर झळकावल्याच्या पार्श्वभूमीवर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे.    

****

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात आता प्राथमिक शिक्षणाच्या कार्यकक्षेत आठवीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश केला जाणार आहे. यापूर्वी इयत्ता पाचवीपर्यंत प्राथमिक शिक्षण मानलं जात होतं. राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. प्राथमिक शाळांसाठीचे सर्व निकष आता इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळांना लागू केले जाणार असून, शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं योजना आखल्या जाणार आहेत.

****

रायगड जिल्ह्यात महाड इथल्या चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९७ वा वर्धापन दिन आहे. यानिमितत देशभरातून भीम सैनिक महाडमध्ये दाखल झाले आहेत. २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता.

****

स्वित्झर्लंड मध्ये सुरु असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली यांनी उप - उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात त्यांनी अमेरिकन जोडीचा २१ - १५, २१ - १२ असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या पात्रता फेरीत हरिहरन करुणन आणि रुबन कुमार या जोडीनं फ्रान्सच्या जोडीचा, तर मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी यांनी ब्राझीलच्या जोडीचा पराभव केला.

****

No comments: