Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date:
22 March 2024
Time:
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·
आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी मतदारांना थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार
·
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी तर काँग्रेसची ५७ उमेदवारांची यादी जाहीर;लातूरहून डॉ शिवाजी काळगे तर नांदेडहून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी
·
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना
अटक
·
एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल;सुधारित तारखा लवकरच जाहीर
होणार
आणि
·
राष्ट्रीय वरीष्ठ गट कबड्डी स्पर्धेला अहमदनगर इथं प्रारंभ
सविस्तर बातम्या
निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य
मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी आयोगाने
सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केलं आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १००
मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.
****
केंद्र सरकारचे विकसित भारत योजनांसंदर्भातले संदेश देशातल्या
नागरिकांच्या मोबाईलवर येत असून, हा आचारसंहितेचा भंग असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं केंद्र
सरकारला नोटीस बजावली आहे. हे संदेश बंद करण्याबाबतही आयोगाने सूचित केलं आहे. याशिवाय
निवडणूक आयोगानं केंद्र, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना रेल्वे तसंच विमानतळांसारख्या
सरकारी मालमत्तांवरील सर्व अनधिकृत राजकीय भित्तिपत्रकं काढून टाकण्याच्या सूचना देखील
दिल्या आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबत नवीन कायद्याला
स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर
या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं
आहे.
****
निवडणूक रोखे प्रकरणी भारतीय स्टेट बँकेनं अनुक्रमांकासह
सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर केली. यासंदर्भात बँकेनं काल सर्वोच्च न्यायालयात
प्रतिज्ञापत्र सादर केलं. स्टेट बँकेनं दिलेली माहिती २ फाइलमध्ये निवडणूक आयोगानं
संकेतस्थळावर जाहीर केली आहे. एका फाइलमध्ये खरेदीदाराचं नाव, दिनांक, रोख्याचा अनुक्रमांक ही माहिती आहे तर दुसऱ्या फाइलमध्ये राजकीय पक्षाचं नाव, रोख्याचा अनुक्रमांक, रोखीकरणाचा दिनांक आदी माहिती आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल उमेदवारांची
तिसरी यादी जाहीर केली. तामिळनाडुमधल्या लोकसभा मतदारसंघांसाठी ही यादी असून, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन
यांना निलगिरीस इथून उमेदवारी जाहीर झाली आहे.
****
काँग्रेस पक्षानेही राज्यातल्या सात जागांसह एकूण ५७ जागांसाठीचे
उमेदवार काल जाहीर केले. लातूर इथून डॉ. शिवाजी काळगे यांना, तर नांदेड इथून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना
उमेदवारी जाहीर केली आहे. नंदूरबारमधून गोवाल पाडवी, अमरावती बलवंत वानखेडे, पुणे रविंद्र धंगेकर, सोलापूर प्रणिती शिंदे, तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती
यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
वसंतराव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसने २००२ मध्ये
पहिल्यांदा विधानपरिषदेवर संधी दिली होती. त्यानंतर ते २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर
नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता.
लातूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आहेत.
लातूर शहरात लक्ष्मी नेत्रालयाच्या माध्यमातून गेल्या २५ हून अधिक वर्षांपासून ते काम
करत आहेत.
दरम्यान, अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं
साजिद पठाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप आणि उमेदवार
दोन-तीन दिवसात जाहीर होतील, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना
पटोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल मुंबईत शिवसेना पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली
असून, लवकरच
योग्य निर्णय होईल, असं सांगितलं.
****
दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल सक्तवसुली संचालनालयानं अटक केली. त्यापूर्वी
ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घराची झडती घेतली. मद्य धोरणाशी संबंधित आर्थिक
गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना हजार राहण्यासंदर्भात नऊ समन्स बजावले होते.
दिल्ली उच्च न्यायालयानं काल केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर
ईडीनं ही कारवाई केली. याविरोधार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं आम आदमी पक्षाच्या
नेत्या आतिशी यांनी सांगितलं.
****
पतंजली कंपनीच्या औषधांबाबत खोटे दावे करणाऱ्या जाहिरातीच्या
संदर्भात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांनी काल सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त
माफी मागितली. गेल्या २७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला, रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवरील औषधांबाबत खोटे
दावे करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करण्यास मनाई केल्यानंतरही त्या दाखवण्यात येत होत्या.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना २ एप्रिल रोजी
न्यायालयापुढे प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
देशातल्या सर्व बँकांनी सरकारी कामकाजाकरता आपल्या सर्व
शाखा येत्या ३१ मार्च रोजी खुल्या ठेवाव्यात, असे निर्देश, भारतीय रिझर्व बँकेनं दिले आहेत. या दिवशी सुरू राहणार
असलेल्या बँकिंग सेवांबद्दल योग्य ती प्रसिद्धी द्यावी, असं आरबीआयनं बँकांना कळवलं आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोग - एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा, समाज कल्याण अधिकारी गट - ब, आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट - ब, या सरळसेवा चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
२८ एप्रिल आणि १९ मे रोजी या परीक्षा नियोजित होत्या. परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच
जाहीर करण्यात येतील, असं आयोगानं कळवलं आहे.
****
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ या परीक्षेतून, गट-अ आणि गट-ब राजपत्रित पदाच्या, एकूण २३ संवर्गांसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांच्या
तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आयोगानं
प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प
२७ मार्च २०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यांनंतर शिफारस यादी गुणवत्ता यादीसह संकेतस्थळावर प्रसिद्ध
करण्यात येईल असं, आयोगानं कळवलं आहे.
****
हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यात काल सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या कुरुंदा तसंच रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात
भूकंपांचा केंद्रबिंदू होता.
दरम्यान, या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत
राऊत यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची काल ऑनलाईन बैठक घेतली. भूकंपाचे
धक्के सौम्य स्वरूपाचे होते, नागरिकांनी सावधानता बाळगावी, घाबरून जाऊ नये, असं त्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात सध्या पाणी टंचाई स्थिती निर्माण झाली असून, काही प्रकल्पात पाणीपातळी मृतसाठ्यात गेली आहे. बीड
तालुक्यात २०, गेवराई
तालुक्यात २१ तर शिरूर तालुक्यात दोन अशा एकूण ४३ गावात टँकर सुरु करायला उपविभागीय
अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
****
मतदार जनजागृतीचा भाग म्हणून औरंगाबाद मध्य या विधानसभा
मतदार संघात काल एक अनोखा प्रयोग करण्यात आला. जवळपास १२६ शाळांमधल्या इयत्ता ५ वी
ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं.
****
राष्ट्रीय वरीष्ठ गट कबड्डी स्पर्धांना कालपासून अहमदनगरच्या
वाडिया पार्क मैदानावर प्रारंभ झाला. अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू अशोक शिंदे, आतंरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार आरोटे यांच्या
हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातले ३० संघ
सहभागी झाले आहेत. काल सलामीच्या सामन्यात ब गटात यजमान महाराष्ट्राने गुजरातला ४८-३१
असं पराभूत केलं. अन्य सामन्यांमध्ये भारतीय रेल्वेने बीएसएनएलचा ४०-०७ असा, गोव्याने बंगालचा ४६-१६ असा, तर हरियाणाने उत्तराखंडचा ४२-२२ असा पराभव केला.
****
स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या
किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज आणि प्रियांशू राजावत यांनी उपान्त्यपूर्व
फेरीत प्रवेश केला आहे. महिला दुहेरीत गायत्री
गोपिचंद आणि ट्रिसा जॉली यांची जोडीने देखील उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून
सुरुवात होत आहे. आज सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
यांच्यात होणार आहे. रात्री आठ वाजता चेन्नईतल्या एम ए चिदंबरम मैदानावर हा सामना सुरु
होईल.
दरम्यान, आयपीएल मधल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार म्हणून
महेंद्रसिंह धोनी ऐवजी फलंदाज ऋतुराज गायकवाड याची निवड करण्यात आली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातली २५ गावं गुन्हेगारी पासून मुक्त करण्यासाठी
काल पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या गावांमध्ये
पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह, विविध विषयांपर पोलिस अधिक्षकांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या विभागीय नाट्य स्पर्धेचं
उद्घाटन आज होणार आहे. शहरातल्या तापडिया नाट्य मंदिरात होणाऱ्या या स्पर्धेत आज संध्याकाळी साडेसात वाजता छत्रपती संभाजीनगर
विभागाचे ‘उत्तरदायित्व’, या नाटकाचं प्रयोग होणार आहे.
****
No comments:
Post a Comment