Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
आज होळी अर्थात हुताशनी फाल्गुन पौर्णिमा - शिमगा हा सण साजरा होत आहे.आज संध्याकाळी घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन केलं जणार आहे.वाईट गोष्टींचा नाश करुन चांगल्याचा विजयी प्रकाश यानिमित्तानं सर्वत्र पोहचवणं असा या सणाचा उद्देश आहे. यानंतर उद्या रंगांची उधळण असणारा,वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा सण अर्थात धुलिवंदनाचा उत्सव उद्या देशभरात साजरा होणार आहे.
****
राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलीवंदनानिमित्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. परस्पर प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतिक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो, देशबांधवांमध्ये असलेली बंधुत्वाची भावना अधिक बळकट करो, ही प्रार्थना, असंही राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिनाही सध्या सुरु आहे.या एकंदर संणाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यालगत आलेल्या सुट्ट्यांया अनुषंगानं सर्वच ठिकाणी विविध खरेदीसाठी बाजार फुलला असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
****
प्रभु येशूशी संबंधित आणि ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र अशा आठवड्याला आज पाम संडे या दिवसानं प्रारंभ होत आहे. ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी आणि गुड फ्रायडे आधीचा हा महत्वाचा दिवस आहे. या सप्ताहादरम्यान अंजिराचा सोमवार तसंच मौदी गुरुवार याप्रमाणे दिवस साजरे करण्यात येतात.आज ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थना घेण्यात आली.वाशिम इथं सकाळी नऊ वाजता ख्रिस्ती समाजाच्या नागरीकांनी नारळाच्या झावळ्या घेत चर्चमधून सुरुवात करत शांतता फेरी काढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतीय नौदलानं राबवलेलं विशेष समुद्री अभियान `ऑपरेशन संकल्पनं` काल शंभर दिवस पूर्ण केले. याअंतर्गत संकटकाळी सहाय्य आणि समुद्री क्षेत्रात महत्वपूर्ण सुरक्षा भागिदाराची भूमिका नौदलानं बजावली आहे. यादरम्यान,विविध १८ घटनांमध्ये अदनची खाडी आणि त्या नजिकचं क्षेत्र, अरबी समुद्र आणि सोमालियाच्या पूर्वेकडील क्षेत्रात समुद्री सुरक्षा अभियान चालवलं आणि नौदलानं समस्या आणि संकटाशी सामना करत समुद्री लुटेरे,सागरी सुरक्षा आणि भारताचं हित यासाठी कारवाई केली. नौदलानं हिंद महासागरात सूचनेच्या आदान-प्रदानातही या अंतर्गत सक्षम कार्य केलं.
****
लेबनानमध्ये सुरु असलेल्या विश्व टेबल टेनिस फीडर बैरूत विजेतेपद स्पर्धेत विविध गटात यश मिळवत भारतीय खेळाडूंनी आगेकुच केली असून काही प्रकारातील अंतिम फेरीत भारतीय खेळाडू समोरासमोर असणार आहेत.आज हे सामने खेळले जाणार आहेत. संमिश्र गटाच्या अंतिम फेरीत साथियान ज्ञानशेखरन आणि मनिका बत्रा या जोडीचा सामना आकाश पाल आणि पॉयमंती बैश्य या जोडीसोबत होईल. यासह, पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत मानुष शाह आणि मानव ठक्कर या जोड़ीचा सामना मुदित दानी आणि आकाश पाल या जोडीशी होईल. तर, महिला दुहेरीत भारताच्या श्रीजा अकूला आणि दिया चितळे या जोडीचा सामना हाँगकांगच्या दू होइ केम आणि झू चेंगझू या जोडीसोबत होणार आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या श्रीजा अकूलाचा सामना दक्षिण कोरियाच्या सुह ह्यो वॉन सोबत होईल. तर, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात जी सत्यनचा सामना कजाकिस्तानच्या किरिल गैरासीमेंको याच्याशी होणार आहे.
****
इंडियन मास्टर्स नॅशनल बैडमिंटन विजेतेपद स्पर्धेत, महाराष्ट्राची खेळाडू नाहीद दिवेचा हिनं दोन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. हरीयाणाच्या पंचकुला इथं झालेल्या या स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम लढतीत हरियाणाच्या सुनीता सिंह पंवारला हरवून नाहीद विजेती ठरली. यासोबतच, मिश्र दुहेरीच्या प्रकारात नाहीद दिवेचा आणि किरण मोकाडे या जोडीनं कर्नाटकच्या प्रबागरान सुब्बैयन आणि जयश्री रघू या जोडीला पराभूत करत मिश्र दुहेरीच्या किताबावर शिक्कामोर्तब केलं.
****
काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी काल आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ.नामदेव किरसान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक आणि त्यानंतर उपायुक्त म्हणून १८ वर्षे नोकरी केल्यानंतर २००८ मध्ये स्वेच्छानिवृत्त झालेले किरसान तेंव्हापासून काँग्रेस पक्षात सक्रिय असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंटस दरम्यानचा सामना जयपूर इथं दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. मुंबई इंडीयन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान अहमदाबाद इथं आजचा दुसरा सामना संध्याकाळी साडे सातवाजता होणार आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यांत पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव केला. तर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद संघावर चार धावांनी विजय मिळवला.
****
No comments:
Post a Comment