Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या आठवडाभरात १ लाख ८४ हजार मतदारांची नव्याने नोंद तर १३ हजाराहून अधिक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई
· वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा;पुढची भूमिका २६ तारखेनंतर स्पष्ट होणार
· होळी तसंच धुलिवंदन सोहळ्यासाठी सर्वत्र बाजारपेठा सज्ज
आणि
· नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे विविध पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या आठवडाभरात १ लाख ८४ हजार ८४१ मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येतं. त्यामुळं अधिकाधिक व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावं, मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करावी आणि मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या १३ हजार १४१ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत २३ कोटी रुपयांची रोकड, १७ लाख लीटर मद्य, सुमारे ७०० किलो अंमलीपदार्थ, ४६ किलो सोनं चांदी आणि मोफत वाटायच्या १ लाखांहून अधिक वस्तू जप्त केल्या आहेत. यात मुद्देमालाची तपासणी सुरू असून कायदेशीर असलेला मुद्देमाल संबंधितांना परत केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यात आतापर्यंत १० जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागपूरमध्ये ५, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात प्रत्येकी दोघांनी तर रामटेक मतदार संघातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती चोक्कलिंगम यांनी दिली.
****
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी काल ४६ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. यामध्ये रामटेक इथून रश्मी बर्वे, नागपूरहून विकास ठाकरे, भंडारा-गोंदिया डॉ प्रशांत पडोळे तर गडचिरोली-चिमूर मतदार संघातून डॉ नामदेव किरसन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या मंगळवारी २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी काल मुंबईत अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केला. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना ५८ हजार मतांनी पराभूत केलं होतं.
****
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महाविकास आघाडीसंदर्भात येत्या २६ तारखेनंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असं आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
****
अमरावती लोकसभेची जागा भाजपाचा उमेदवार लढवणार असून लवकरच त्या नावाची घोषणा केली जाईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नागपुरात बोलत होते. रामटेक मध्ये शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडणूक लढवेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अमरावतीच्या जागेवर महायुतीकडून आमचा दावा असायला हवा होता, असं प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते काल अमरावती इथं पत्रकारांशी बोलत होते. या मतदारसंघात आमचे दोन आमदार असून, किमान लाखभर मतांचं पाठबळ आपल्याकडे असल्याचं बच्चू कडू यांनी नमूद केलं.
****
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा स्मृतिदिन- शहीद दिवस काल देशभर पाळण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून या तीन वीरांना आदरांजली वाहिली, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांना काल अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातही काल हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शहिदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
बीड तसंच परभणीसह विभागात सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयात भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना काल अभिवादन करण्यात आलं.
धाराशिव इथं शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष, माथाडी कामगारांचे नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या ४२वा स्मृतिदिनानिमित्त त्यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळा अतिदुर्गम भागात असल्यानं, तिथे दररोज दुध पुरवठा करणं शक्य होत नाही, त्यामुळे या शाळांना सुगंधी दुधाचा टेट्रापॅक द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं विभागानं स्पष्ट केलं आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून उत्पादक निश्चित केला असल्याचं विभागाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीत अनिश्चित काळासाठी वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याआधी ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी लागू करण्यात आली होती.
****
होळी तसंच धुलिवंदन सोहळ्यासाठी सर्वत्र बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. आज सायंकाळी होलिका दहन तर उद्या धुलिवंदनाचा सण साजरा होत आहे. होळीसणासाठी स्थानिक बाजारपेठांमध्ये शेणाच्या गोवऱ्या, साखरगाठ्या आणि इतर साहित्यासह धुळवड खेळण्यासाठी नाना तऱ्हेचे रंग, पिचकाऱ्या आणि इतर साहित्यानं बाजारपेठा सजले आहेत. दरम्यान या सणांच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड न करण्याचं तसंच पाणी जपून वापरण्याचं आवाहन पर्यावरणवादी संस्था संघटनांच्यावतीनं करण्यात येत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी, धुलिवंदनासाठीचे रंग स्वत: तयार केले आहेत. तांदूळ तसंच ज्वारी पिठासोबत फळ-भाज्यांचे रंग मिसळून हे रंग तयार केलेले हे रंग पर्यावरणपूरक तसंच सुरक्षित आहेत. होळीसाठी नैसर्गिकरित्या वाळलेली लाकडंच वापरण्याचा संकल्पही या विद्यार्थिनींनी केला आहे.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही धुळवड तसंच रंगपंचमीसाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक रंग तयार करून त्याची विक्री केली. सामुदायिक विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी बीटरूट, पालक, हळद, पळसाची पाने, निळ पावडर, यापासून हे नैसर्गिक रंग तयार केल्याचं विभाग प्रमुख सुनिता काळे यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या...
आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, की रासायनिक होळीच्या रंगामुळे शरीरावर अनेक अनिष्ट परिणाम होतात. विशेषतः केस, त्वचा, डोळे याचा फार मोठा विपरीत परिणाम रासायनिक रंगामुळे होतो. त्याला एक पर्याय म्हणून विभागाने होळीचे नैसर्गिक रंग तयार केलेले आहेत. आपल्या आजुबाजुला निसर्गामध्ये जे झाडं दिसतात, त्या झाडांच्या विविध भागांचा, फळांचा त्याचप्रमाणे फुलांचा वापर करून या रंगांची निर्मिती केली जाते.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये वस्तू आणि चलनाचं सुयोग्य समीकरण अभ्यासपूर्णरित्या मांडलं असल्याचं, प्राध्यापक समाधान बनसोडे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात द प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथाच्या शतकपूर्तीनिमित्त एका व्याख्यानात बोलत होते. सात प्रकरणाच्या या ग्रंथाला ग्रंथराज असं संबोधलं जातं असंही बनसोडे यांनी नमूद केलं.
****
नांदेड इथं काल, प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांना मातोश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
प्रसाद बन महाराज होटाळेकर स्मृति प्रित्यर्थ दिला जाणारा प्रसाद बन वाङ्गमय पुरस्कार 'वसुंधरेचे शोधयात्री' या संशोधनपर पुस्तकासाठी डॉक्टर अनुराग लव्हेकर यांना, प्रसाद बन राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार 'अंकलचा कुत्रा आणि इतर कथा' या बालकथा संग्रहासाठी स्टॅन्ली गोन्सालविस यांना, 'नयनरम्य नॉर्वे' या प्रवासवर्णन पुस्तकासाठी मंगला असोलेकर देशपांडे यांना ग्रंथगौरव पुरस्कार, 'आंतरभारती' या अंकासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार, तर आप्पासाहेब खोत यांना 'काळीज विकण्याची गोष्ट' या कथासंग्रहासाठी राज्यस्तरीय ग्रंथ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भय निवडणूकीसाठी कर्मचारी- अधिकारी प्रशिक्षित असणं आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामकाज पूर्वतयारी अंतर्गत काल छत्रपती संभाजीनगर इथं ‘एक दिवस अभ्यासाचा’ हा उपक्रम राबवण्यात आला, त्यावेळी स्वामी बोलत होते.
****
स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांत याचा तैवानच्या लिन चुन यी यानं पराभव केला. पहिला गेम २१-१५ असा जिंकलेल्या श्रीकांतचा पुढील दोन गेम्समध्ये ९-२१, १८-२१ असा पराभव झाला.
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव केला. तर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद संघावर चार धावांनी विजय मिळवला.
****
No comments:
Post a Comment