Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date –
18 April 2024
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १८ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
· लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या १७
राज्यं आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ जागांवर मतदान
· चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून
सुरुवात
· रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर, तर बारामती, पुणे, शिरुर, सांगली आणि साताऱ्यात प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
· औरंगाबाद, जालना, बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत एकूण ३०७ अर्जांची
उचल
आणि
· व्हीव्हीपॅटवरील सुनावणी पूर्ण, सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला मतपत्रिकेसंदर्भात
निर्देश
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या
टप्प्यात उद्या १७ राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदारसंघांमध्ये
मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, पुदुच्चेरी, उत्तराखंड आणि तमिळनाडूमधल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये
उद्या मतदान होईल. याशिवाय राजस्थानमधल्या १२, उत्तर प्रदेशातल्या आठ, मध्य प्रदेशातल्या सहा, आसाम आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी पाच, पश्चिम बंगालमधल्या तीन, मणिपूरमधल्या दोन, तसंच छत्तीसगड, त्रिपूरा आणि जम्मू-काश्मीरमधल्या प्रत्येकी एका मतदारसंघाचा यात समावेश आहे. राज्यात
उद्या विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि रामटेक या मतदारसंघात मतदान होत आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या
टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. यामध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह, नंदूरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या राज्यातल्या एकूण अकरा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये
आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारांना २५ एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी
अर्ज भरता येणार असून २६ एप्रिलला अर्जांची छाननी होईल. २९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना
आपले अर्ज मागे घेता येणार आहे. या सर्व मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. तर
तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपेल. या टप्प्यात ९४ मतदारसंघांमध्ये
सात मे रोजी मतदान होणार आहे.
****
सातारा लोकसभा मतदार संघासाठी
उदयनराजे भोसले यांनी आज भाजपच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीमधून
राष्ट्रवादी काँग्रेस क्ष शरदचंद्र पवार गटातर्फे सुप्रिया
सुळे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार
यांनी देखील बारामतीमधून आपला अर्ज दाखल केला.
सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी
प्रणीती शिंदे यांनी काँग्रेच्या वतीनं आपला अर्ज आज दाखल केला. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून
महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे खासदार
अमोल कोल्हे यांनी, पुणे शहर मतदार संघातून काँग्रेसचे आमदार रविंद्र
धंगेकर यांनी, सांगली मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपचे खासदार
संजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा
मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर
केली आहे. याच लोकसभा मतदारसंघात महायुती-शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी देखील
उमेदवारीसाठी आपला दावा कायम ठेवला होता, पण आज किरण सामंत यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राणे यांची उमेदवारी
भाजपनं जाहीर केली. राणे उद्या रत्नागिरी इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघात आज
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी रॅली काढून आपला उमेदवारी
अर्ज दाखल केला. या रॅलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या
नेत्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी भाजप नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लातूरच्या
पाणी टंचाईचा प्रश्न तसंच केंद्रीय विद्यापीठाच्या मागणीचं निवेदन दिलं. हे निवेदन
आपण राज्याचे मुख्यमंत्री, केंद्र सरकार तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी येत्या २० एप्रिल रोजी नांदेड आणि
परभणी इथं प्रचारसभा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनमध्ये
टाकण्यात आलेल्या व्हिव्हीपॅटच्या मतपत्रिकांबाबत शंभर टक्के खातरजमा करण्यासंबंधीच्या
याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मतदारांना व्हिव्हीपॅटमधील मतपत्रिकेची
पडताळणी करता यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार
आणि निवडणूक आयोगाला दिले. यासंदर्भातील निकालही सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला
आहे.
****
परभणी लोकसभा मतदार संघात दिव्यांग
आणि जेष्ठ मतदारांचं घरी जाऊन मतदान घेतलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार
४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांचं मतदान
गंगाखेड तालुक्यातल्या ऐरंडेश्वर गावात घेतलं जात आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात
आज आणि उद्या ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तर २० आणि २१ एप्रिल रोजी परभणी विधानसभा
मतदारसंघात तर जिंतूर, पाथरी, परतूर आणि घनसावंगी मतदार संघात दिलेल्या तारखेनुसार घरी जाऊन मतदान करुन घेण्यात
येणार आहेत. या अंतर्गत जिल्ह्यात २३१ दिव्यांग, ८५ वर्षांवरील विनंती केलेले एक हजार ३९४ तर अत्यावश्यक ४ असे एक हजार ६२९ मतदार
आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी
कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज ६० उमेदवारांनी
११८ अर्ज घेतले. आज अपक्ष उमेदवार हर्षवर्धन रायभान जाधव यांनी एकमेव अर्ज दाखल केला
आहे.
बीड लोकसभा मतदारसंघासाठी आज
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. यामध्ये आज पहिल्याच दिवशी ३९ उमेदवारांनी ९२
अर्ज घेतले आहेत. बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
यांनी बीड लोकसभा निवडणुकीसाठी जे उमेदवार अर्ज घेतील त्यांना उमेदवारी अर्ज मोफत देण्याचा
निर्णय घेतला आहे.
जालना लोकसभा मतदारसंघासाठी
आज पहिल्या दिवशी ३४ जणांनी ९७ नामनिर्देशन पत्र घेतली. या मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन
पत्र दाखल झालं नाही. दरम्यान, आचारसंहितेच्या
कालावधीत जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या वेगवेगळ्या कारवायांत ९४
गुन्हे दाखल केले असून ७६ संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १८ लाखांचा मुद्देमाल
हस्तगत करण्यात आला, अशी माहिती जालना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी दिली.
****
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
च्या अनुशंगानं छत्रपती संभाजीनगरात आचारसंहिता कक्षात गेल्या महिनाभरात १६३ तक्रारी
सी-व्हिजिल ॲपद्वारे प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १४३ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आलं
असून यासह इतर सर्वच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या
टप्प्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. आमगाव, आर्मोरी, गडचिरोली आणि अहेरी
इथं सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत तर चिमूर आणि ब्रम्हपुरी इथं सकाळी सातपासून
सहा वाजेपर्यंत मतदानप्रक्रीया पार पडेल, असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी सांगितलं.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात १८९१ मतदान केंद्रावर १६ लाख १८ हजार मतदार मतदानाचा आपला
हक्क बजावणार आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यातल्या
मतदानासाठी नक्षलग्रस्त गडचिरोलीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मतदानासाठी तैनात
सुरक्षा सैनिकांकडून ड्रोनद्वारेही देखरेख ठेवली जात असल्याचं गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडून सांगण्यात आलं.
****
भंडारा गोंदिया लोकसभा मतदार
संघातही उद्या मतदान होत आहे. या लोकसभा क्षेत्रात एकून दोन हजार १३३ मतदान केंद्र
असून १८ लाख २७ हजार मतदार आहेत.यासाठी
आज मतदान केंद्रांवर ई व्ही एम आणि व्ही व्ही पँट मशीन रवाना करण्यात आल्या. या लोकसभा
मतदारसंघात मोरगाव अर्जूनी विधानसभा क्षेत्र हे नक्षल प्रभावित क्षेत्रात मोडत असल्यानं
इथं सकाळीं ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित
प्रकार घडू नये करीता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकंदरीत १० हजार
कर्मचारी लोकसभा क्षेत्रात कार्यरत असून जर मतदान केंद्रावर ई व्ही एम मशीन बिघडली
तर अधिकाऱ्यांनी ती तात्काळ दुरुस्ती करावी म्हणून सर्वांना प्रशिक्षण
देण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर
इथं स्वीप उपक्रमांतर्गत आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. तसंच धाराशिव तालुक्यातील सांजा गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन
करण्यात आलं होतं. कार्यक्रमादरम्यान, देवदर्शनासाठी आलेल्या वधुवरांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.
****
राज्यात आज मालेगाव आणि बीड
इथं सर्वाधिक ४३ पूर्णांक २ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर
इथं ४० पूर्णांक ५, परभणी इथं ४१ पूर्णांक ७ तर नांदेड इथं ४१ पूर्णांक
४ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment