Sunday, 28 April 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक 28.04.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 April 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग-ज्येष्ठ भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची उदगीर इथं प्रचार सभा

·      ्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपची उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून उमेदवारी

·      कांद्यावरची निर्यातबंदी केंद्र सरकारकडून काही प्रमाणात शिथिल

·      न्यायव्यवस्थेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावं- सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती प्रसन्न वराळेांचं आवाहन

      आणि

·      तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत इटलीला हरवत भारताच्या महिला संघाचा सुवर्णवेध

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोल्हापूर इथं महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक तसंच हातकणंगले मतदार संघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. देशाला स्थिर सरकार देण्याची विरोधकांची क्षमता नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कलम ३७०, राममंदि, मुस्लीमांना ओबीसीतून आरक्षण आणि इतर विविध मुद्यांवरून त्यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर टीका केली. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लीकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनीही या सभेला संबोधित केलं.

काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी काल लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर इथं सभा घेतली. बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ आदी मुद्यांवरून त्यांनी भाजपवर टीका केली. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून भाजपने जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.

****

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय घेण्याचं धोरण अवलंबल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे. ते काल महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला इथं जाहीर सभेत बोलत होते. साखर निर्यात बंदी, इथेनॉल निर्मितीवर बंदी, आदी मुद्यांचा त्यांनी उल्लेख केला.

****

सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल सभा झाली. भाजप नेते विनोद तावडे यांनी काल लातूर इथं बुद्धिवंतांशी संवाद उपक्रमात सहभाग घेत संवाद साधला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबई इथं आंबेडकरवादी, साहित्यिक आणि विचारवंतांची बैठक झाली.

****

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी धुळे तालुक्यातल्या मुकटी आणि विंचूर इथं महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी काल मेळावा घेतला.

****

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे, या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन   विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीने या मतदार संघातून माजी मंत्री काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केलेली आहे.

****

जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल राजूर इथल्या श्री राजुरेश्वर गणपतीची पूजा करून प्रचाराला सुरुवात केली. भारतीय जनता पक्ष ही लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्यांवर लढत असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं.

****

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्व मतदार संघातली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम मध्ये सीलबंद करण्यात आली आहेत. नांदेड इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तर परभणी इथं कृषी महाविद्यालयात या स्ट्राँग रूम उभारण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारालोकनिर्णय महाराष्ट्राचाहा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण लातूर आणि बीड लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

कांद्यावरची निर्यातबंदी केंद्र सरकारने काही प्रमाणात शिथिल केली आहे. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमधे ९९ हजार १५० मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३-२४ या वर्षात खरीप आणि रब्बी पिकांचं उत्पादन कमी असल्याच्या अंदाजाच्या, तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती शासनानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

दरम्यान, कांदा निर्यातीवरील बंदी उठविलेला निर्णय स्वागतार्थ असून सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

****

मराठी रंगभूमीवरील प्रख्यात पार्श्वसंगीतकार दादा पारसनाईक यांचं काल मुंबईत राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेपासून आजतागायत ते कार्यरत होते. तीनशेहून अधिक दूरचित्रवाणी मालिका, तसंच शेकडो व्यावसायिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिलं होतं.

****

न्यायव्यवस्थेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या व्यवस्थेचा एक घटक म्हणून कटिबद्ध होण्याचं आवाहन सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथं नव्याने बांधण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीचं काल उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी उपस्थितांना ते संबोधित करत होते. संविधान हा आपल्यासाठी मूलग्रंथ असून संविधान तत्वांचं पालन करणं हा आमचा मूलधर्म असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर, न्यायमूर्ती रवींद्र घुगे, प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विधिज्ञ मिलिंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी संविधान दिंडी काढण्यात आली, तसंच संविधानातील मूलमंत्र या पुस्तिकांचं वाटप करण्यात आलं.

****

तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेख वेन्नम, अदिती गोपीचंद स्वामी आणि परमीत कौर यांनी महिलांच्या अंतिम फेरीत सहाव्या मानांकित इटली संघाला २३६ विरुद्ध २२५ असं हरवत सुवर्णपदक पटकावलं. शांघाय इथं झालेल्या या स्पर्धेतलं भारतीय संघाचं हे तिसरं सुवर्णपदक मिळवलं आहे. याआधी ज्योती सुरेख वेन्नम आणि अभिषेक वर्मा या जोडीनं मिश्र दुहेरीत इस्टोनियाच्या संघाला १५८ विरुद्ध १५७ अशा गुणफरकानं हरवलं तर भारताच्या अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश या पुरुष संघानं नेदरलँड्सचा २३८ विरुद्ध २३१ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली इथं दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई  इंडियन्स संघाचा दहा धावांनी पराभव केला.

तर लखनऊ इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं लखनौ सुपर जायंटस्वर सात गडी राखत विजय मिळवला. ा स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघात तसंच चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघात सामना होणार आहे.

****

खरीपाच्या पेरण्या सुरु होण्याआधी शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे आणि खतांचा पुरवठ्याचं  नियोजन करावं, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना पिक विमा साक्षर केलं पाहिजे तसंच वेळेत पीक कर्ज उपलब्धता करण्यासाठी अर्ज द्या, कर्ज घ्यामोहीम राबवावी, असेही निर्देश स्वामी यांनी दिले. या हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३९ हजार २६४ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. तर २ लाख ८८ हजार मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी इथल्या क्षेत्रावरील आंबा विक्रीतून विद्यापीठाला एक कोटी ६३ लाख रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी ही माहिती दिली.

****

बीड जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काल  बीड आणि  गेवराई विधानसभा मतदार संघांची तसंच मतदान केंद्रांवरच्या मुलभूत सुविधा व्यवस्थेचीही पाहणी केली. उमेदवारांच्या प्रचार साहित्याच्या पूर्वपरवानगी कार्यवाहीचाही त्यांनी गेवराई इथल्या नगरपरिषद कार्यालयात आढावा घेतला.

दरम्यान, बीड इथं आज मतदार जागृतीसाठी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातून या फेरीला सुरुवात करण्यात येईल.

****

नांदेड इथल्या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महासंघाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज २८ एप्रिल रोजी वैशालीनगर इथं सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.

****

No comments: