Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी - सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकणी विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावरील नेते संबंधित मतदारसंघांचे दौरे करून प्रचार फेऱ्या, प्रचारसभा घेत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज आणि उद्या राज्यात सहा सभा होणार आहेत. आज ते सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा घेणार आहेत.
मोदी यांच्या लातूर इथल्या बिर्ले फार्मवरच्या नियोजित सभेच्या पार्श्वभूमीवर लातूर इथल्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या २५ एकर क्षेत्रावर मोदींची सभा होणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीची आज पुण्यात वारजे इथं सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
****
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच या सर्व मतदार संघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल.
****
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर इथं जाऊन दर्शन घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे देखील आज अर्ज भरत आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी काढलेल्या रॅलीत युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे आज अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी निघालेल्या रॅलीमध्ये खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे सुभाष भामरे हे देखील अर्ज दाखल करत आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडीसा आणि झारखंड या राज्यातल्या एकूण ५७ लोकसभा मतदारसंघामधे निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ६ मे पर्यंत असून, मतदान २५ मे रोजी होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथं आयपीएलच्या सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावण्याच्या अड्ड्यावर अपोलिसांनी छापा टाकून १० जणांना अटक केली. घटनास्थळावरुन चार मोबाईल आणि ९ हजार ४२० रुपये जप्त करण्यात आले.
****
राज्यात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातले आहेत. त्या खालोखाल ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलडाणा १५, सातारा १४, सोलापूर १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० उष्माघाताचे रुग्ण आहेत. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद नाही.
दरम्यान, येत्या दोन दिवसात, कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. याकाळात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
भारताच्या तलवारबाज भवानी देवी आणि तनिक्षा खत्री यांना पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पात्रता मिळू शकली नाही. संयुक्त अरब अमिराती इथं सुरू असलेल्या आशिया ओशनिया झोन ऑलिम्पिक तलवारबाजी पात्रता स्पर्धेत उपान्त्य फेरीत भवानी देवीला हाँगकाँगच्या चु विन कियू हिच्या कडून १२-१५ असा, तर तनिक्षाला सिंगापूरच्या किरिया तिकानाह हिच्याकडून १३-१५ असा पराभव पत्करावा लागला.
****
No comments:
Post a Comment