Sunday, 28 April 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 April 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      मणीपूरमधल्या सहा मतदारसंघात फेरमतदान घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

·      लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला

·      चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या अखेरचा दिवस

आणि

·      नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जमीन घोटाळा प्रकरणी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल

****

मणीपूरमधल्या आऊटर मणीपूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा मतदारसंघात फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी झालेलं मतदान रद्दबातल ठरवत, आता ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ४ या वेळात फेरमतदान घेण्याची सूचना आयोगानं केली आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार असून, पुढच्या रविवारी पाच मे पर्यंत राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. या टप्प्यातल्या सर्वच मतदार संघात राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे.

 

काँग्रेस खोट्या गोष्टी पसरवून लोकशाही कमकुवत करत असल्याचा आरोप ज्येष्ठ भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आज कर्नाटकात बेळगावी इथं प्रचारसभेला संबोधित करत होते. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या भारतीय न्याय संहितेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल, असा दावा त्यांनी केला. आपल्या सरकारने केलेल्या कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

दरम्यान, मोदी उद्या महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर येत आहेत. पुणे, सोलापूर तसंच लातूर इथं त्यांच्या सभा होण्याची शक्यता वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे. सोलापूर इथं माळशिरसचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात सोलापूरच्या विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे अशी लढत होत आहे असल्याने, चुरस निर्माण झाली आहे.

 

मोदी यांच्या लातूर इथं बिर्ले फार्म इथं नियोजित सभेच्या पार्श्वभूमीवर लातूर इथल्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सभास्थळाकडे येणारी जड आणि मालवाहू वाहनं तसंच इतर सर्व प्रकारच्या वाहनांना उद्या दुपारी १२ ते ५ या वेळेत, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत.

****

देवेंद्र फडणवीस यांनी आज बार्शी इथं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याला अडचणीत येऊ देणार नाही असा निर्धार असल्याचं त्यांनी सांगितलं.

माढा लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थही फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यात सभा घेतली.

****

धुळे जिल्ह्यात निजामपूर इथं महाविकास आघाडीचे नेते अनंत गीते यांनी प्रचार सभा घेतली. नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश हुकूमशाहीकडे वळत असल्याचा आरोप गीते यांनी यावेळी केला.

****

 

राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात पोहरेगाव इथं लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. शेतीमालाला स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव, मनरेगा मजुरीत वाढ यासह अनेक मुद्यांवर अमित देशमुख यांनी यावेळी भाष्य केलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी माळीवाडा इथं "आपल्या माणसांशी संवाद" कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन केलं. पक्षाने दिलेले प्रचार साहित्य मतदारापर्यंत पोहचवण्यासंदर्भात त्यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

****

चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून ४४, जालना लोकसभा मतदारसंघातून ३५, तर बीड लोकसभा मतदार संघातून ५५ अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात या टप्प्यातल्या अन्य मतदार संघांपैकी जळगाव लोकसभा मतदार संघातून २०, रावेर २९, नंदुरबार १६, मावळ ३५, पुणे ४२, शिरूर ३५, अहमदनगर ३६, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्या अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच या सर्व मतदार संघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट होणार आहे.

****

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण लातूर आणि बीड लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील चटई निर्देशांक अर्थात एफसआय वाटप घोटाळाप्रकरणी समितीचे माजी सभापती, सचिव आणि सर्व संचालक अशा २५ जणांविरोधात आर्थिक फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे, मार्केटमधील प्रसाधनगृह वाटपात घोटाळा केल्याप्रकरणी ए.पी.एम.सी.चे माजी संचालक संजय पानसरे आणि ए.पी.एम.सी.चे कर्मचारी शिवनाथ वाघ यांचा समावेश आहे.

****

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक तयारीचा‌ आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संगणकीय‌ सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

****

निवडणूक आयोगानं ८५ वर्ष वयावरील मतदार तसंच दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातल्या एक हजार ३८४ मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे. यापैकी ६८५ मतदार हे सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण तालुक्यातले असून, ते जालना लोकसभा मतदार संघासाठी आपल्या घरून मतदान करतील. उर्वरित ६९९ मतदार औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी मतदान करणार आहेत.

या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले कर्मचारी, छायाचित्रकार, पोलीस कर्मचारी, यांनी नेमून दिलेल्या वाहनातून रूटमॅप प्रमाणे मतदारांचे गृहमतदान नोंदवून घ्यावं, तसंच मतदान प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड हे विधानसभा मतदार संघ, जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असून, या क्षेत्रातील निवडणूकीच्या तयारीचा आढावा आज निरीक्षक राजेशकुमार यांनी घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी माहितीचं सादरीकरण केलं. विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र, त्यांची तपासणी, त्यात निर्माण करण्यात आलेल्या सुविधा, वाहन व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा अहवाल, गृह मतदानासंदर्भात राबविलेल्या प्रक्रियेची माहिती, निवडणूक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण अशा विविध मुद्यांचा यात समावेश होता.

****

बीड लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी आज सायकल फेरी काढण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, तसंच सायकल संघटनेच्या सदस्यांसह, बीड शहरातल्या नागरिकांनी या सायकल फेरीत सहभाग नोंदवला. ही सायक्लोथॉन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथून सकाळी सात वाजता काढण्यात आली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर लाईनमार्गे शेवटी सामाजिक न्याय भवन इथं या फेरीची सांगता करण्यात आली.

अंबाजोगाई, परळी आणि माजलगावसह विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. निवडणूक शांततेत पार पाडावी आणि सर्वांनी आपला मताधिकार बजावावा, असं आवाहन या फेरीच्या माध्यमातून करण्यात आलं.

****

इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होत आहेत. यात पहिला सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांत सुरू असून, अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे. गुजरात टायटन्स ने प्रथम फलंदाजी निवडत, तीन बाद २०० धावा केल्या, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या एक बाद ६५ धावा झाल्या होत्या.

दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सन रायझर्स हैद्राबाद या संघांत होईल.

****

चीनमधील चेंगडू इथं सुरू असलेल्या उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत, आज भारतीय महिला संघाने सिंगापूरवर ४-१ असा विजय मिळवला आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...