Thursday, 25 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:25.04.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 April 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातल्या प्रचारतोफा थंडावल्या, उद्या मतदान

·      चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल, जालना इथून महाविकास आघाडीचे कल्याण काळे तर बीड इथून महायुतीच्या पंकजा मुंडे यांचे अर्ज दाखल

·      इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिकांच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाची असहमती

·      ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवे ग्राहक न जोडण्याचे कोटक महिंद्रा बँकेला रिझर्व्ह बँकेचे आदेश

आणि

·      यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातल्या प्रचारतोफा काल थंडावल्या. या टप्प्यात १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.

या आठ मतदारसंघात एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्र आहेत. अमरावती, हिंगोली आणि परभणीत ३० पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे याठिकाणी मतदान यंत्रासोबत प्रत्येकी तीन बॅलेट युनीट, अकोल्यात एक तर उर्वरित मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनीट वापरले जाणार आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या सर्व मतदार संघात एक कोटी ४९ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली असून, १४ हजार ६१२ मतदारांनी गृह मतदान केलं असल्याची माहिती चोक्कलिंगम् यांनी दिली.

दरम्यान, या सर्व मतदारसंघात काल प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांची आपापल्या उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्यासाठी लगबग दिसून आली. अमरावती इथं महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यात पुलगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सभा झाली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अमरावती इथं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ तर सोलापूर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे हिंगोलीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्यासाठी काल नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं तर नांदेडचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी भोकर इथं सभा घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल माढा इथं माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत आहे. उद्या अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी काल आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलिल यांनी उमेदवारी अर्ज भरला. बहुजन समाज पार्टीचे संजय जगताप, अपक्ष उमेदवार जे के जाधव, यांच्यासह आठ जणांनी काल अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत २८ उमेदवारांनी ४१ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दरम्यान, संदीपान भुमरे यांना महायुतीच्या वतीनं ए बी फार्म देण्यात आला असून, आज ते अर्ज भरणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी, आज अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचं, जाहीर केलं आहे.

****

जालना मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी काल अर्ज दाखल केला. या मतदार संघातून इतर सात उमेदवारांनीही काल नामनिर्देशन पत्रं दाखल केली. जालना मतदार संघात आतापर्यंत १०२ जणांनी २३४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालना शहरातून प्रचार फेरी काढली.

****

बीड लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात काल २९ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत एकूण ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

****

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिकांच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयानं असहमती दर्शवली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रावरची मतमोजणी आणि व्हीव्हीपॅट पावत्या यांची संपूर्ण पडताळणी करण्यासंदर्भातल्या याचिकेवरच्या काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांची कार्यप्रणाली तसंच सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आणि यासंदर्भातला निकाल राखून ठेवला. मतदानयंत्रामध्ये फेरफार करणं शक्य नसल्याचं निवडणूक आयोगानं यावेळी स्पष्ट केलं. प्रत्येक विधानसभा मतदार संघातल्या कोणत्याही पाच व्हीव्हीपॅट यंत्रातल्या मतदान पावत्यांची, संबंधित मतदान यंत्रातल्या नोंदीसोबत पडताळणी केली जात असल्याचं, आयोगानं सांगितलं.

****

भारतीय रिजर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंग पद्धतीनं नवे ग्राहक जोडण्यास मनाई केली आहे. रिजर्व्ह बँकेनं सलग दोन वर्ष कोटक महिंद्रा बँकेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधांचं परीक्षण केलं, आणि त्यात त्रुटी आढळून आल्यानं, हे निर्देश दिले. या बँकेला नवे क्रेडिट कार्ड देण्यासही बँकेनं निर्बंध लादले आहेत. पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध कायम राहणार असून, कोटक महिंद्रा बँक  विद्यमान बँक खातेधारक आणि क्रेडिट कार्ड धारकांना नियमित सेवा देऊ शकणार आहे.

****

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना काल प्रदान करण्यात आला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात गायिका उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते बच्चन यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. संगीत क्षेत्रातल्या प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए. आर. रहमान यांना, दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. चित्रपटसृषटीतल्या प्रदीर्घ सेवेबद्दल अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे यांना, चित्रपट निर्मितीसाठी रणदीप हुडा, गायक रुपकुमार राठोड, पत्रकार भाऊ तोरसेकर यांना देखील यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 

****

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळवावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी यावेळी केलं. ४१ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसंच विस्तार अधिकारी, या कार्यशाळेला उपस्थित होते.

****


मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे.नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावं, तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी करुन घ्यावं, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, तसंच उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

****

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली, तसंच मानवी साखळी करण्यात आली. मतदान करण्याबाबत जनजागृती पर शपथ, आणि भित्तीपत्रक प्रदर्शन आदी उपक्रमही यावेळी घेण्यात आले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८५ वर्ष वयावरील ज्येष्ठ मतदार तसंच दिव्यांग मतदार अशा सुमारे एक हजार ३८४ मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे. यापैकी ६८५ मतदार, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण तालुक्यातले असून, ते जालना लोकसभा मतदार संघासाठी आपल्या घरून मतदान करतील. उर्वरित ६९९ मतदार औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी मतदान करणार असल्याची माहिती जिल्हा माहिती जिल्हा माहिती कार्यालयानं दिली आहे.

****

लोकसभा निवडणुकीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. उन्हाचा पारा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं.

****

No comments: