Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपासपथक एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ही याचिका दाखल केली आहे.
सक्तवसुली संचालनालय तसंच गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु असलेल्या ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी दिला, अशा कंपन्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असं या याचिकेत म्हटलं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी देण्याची पद्धत घटनाबाह्य असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या योजनेवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात बंदी घातली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यामुळं त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून चौकशी व्हावी, असं याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयास सांगितलं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली. गुजरात राज्यात दाखल असलेल्या गुन्हामध्ये मध्यस्थी म्हणून पोलिस निरीक्षक वारे याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील एक लाख रुपये आधीच स्विकारले होते. दरम्यान, ज्ञानेश्वर वारे याच्यावर झालेल्या कारवाईनंतर रात्री उशिरा नवापूरमधील संतप्त नागरीकांनी नवापूर पोलिस ठाण्याबाहेर जमत त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन रोष व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर रात्री नवापूरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
छत्रपती संभाजी नगर इथं शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, भुमरे यांनी काही वेळापुर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत.
****
मतदारांमध्ये मतदान जागृती होण्याकरता सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी' हा सायक्लोथॉन उपक्रम बीड जिल्ह्यात, येत्या रविवारी २८ तारखेला राबवण्यात येणार आहे. या सायकल फेरीमध्ये बीडमधील मतदार नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊ शकतात. या मॅरेथॉनचा हिस्सा होऊन 'मी मतदान करणार असा संदेश मतदारांनी द्यावा', असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं औरंगाबाद पूर्व विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांसाठी स्वीपच्या माध्यमातून सेंट फ्रान्सिस माध्यमिक शाळेत काल मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आलं. या कार्यक्रमात महिला मतदारांनी ‘आम्ही मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला’. यावेळी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आदिती निलंगेकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, शासकीय, निमशासकीय कार्यालयं तसंच शासकीय, खासगी शाळेतील महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हैदराबाद इथं सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, काल या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सवर चार धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतला हा चौथा विजय तर गुजरात टायटन्सचा पाचवा पराभव ठरला आहे.
****
मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आज या भागात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment