Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date:
29 April 2024
Time:
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याची अधिसूचना जारी;चौथ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस
·
तिसऱ्या टप्प्यात राजकीय पक्षांच्या सभा आणि नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रचार
शिगेला
·
बीड जिल्ह्याच्या मांजरसुंबा तालुक्यात १६ वर्षीय मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला
यश
·
आणि
·
तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या रिकर्व प्रकारात भारतीय पुरुष संघाचा सुवर्णवेध;स्पर्धेत पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची
कमाई
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज
जारी झाली. या टप्प्यात दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडीसा आणि झारखंड या राज्यातल्या एकूण ५७ लोकसभा मतदारसंघामधे
निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ६ मे पर्यंत असून, मतदान २५ मे रोजी होणार आहे.
****
चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा
दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. गेल्या शुक्रवारी
झालेल्या अर्जांच्या छाननीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून ४४, जालना - ३५, तर बीड लोकसभा मतदार संघातून ५५ अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात
या टप्प्यातल्या अन्य मतदार संघांपैकी जळगाव लोकसभा मतदार संघातून २०, रावेर २९, नंदुरबार १६, मावळ ३५, पुणे ४२, शिरूर ३५, अहमदनगर ३६, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांचे अर्ज वैध
ठरले आहेत. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच या सर्व मतदार संघातल्या लढतींचं
चित्र स्पष्ट होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान
होणार असून, पुढच्या
रविवारी पाच मे पर्यंत राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. या टप्प्यातल्या
सर्वच मतदार संघात राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे प्रचार शिगेला
पोहोचला आहे.
या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज आणि उद्या महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मोदी
यांच्या आज सोलापूर, कराड आणि पुणे इथं तर उद्या माळशिरस, उस्मानाबाद आणि लातूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
मोदी यांच्या लातूर इथल्या बिर्ले फार्मवरच्या नियोजित
सभेच्या पार्श्वभूमीवर लातूर इथल्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सभास्थळाकडे
येणारी जड आणि मालवाहू वाहनं तसंच इतर सर्व प्रकारच्या वाहनांना उद्या दुपारी १२ ते
५ या वेळेत, पर्यायी
मार्गाचा वापर करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांनी केली आहे.
धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या
२५ एकर क्षेत्रावर मोदींची सभा होणार आहे.
****
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या
उत्पादनाला न्याय देत नसल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद
पवार यांनी केला आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव इथं, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेत
बोलत होते.
****
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे
उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरी इथं सभा झाली.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपवर कडाडून टीका केली.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार
अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल बार्शी इथं
सभा घेतली. या कार्यक्रमात धाराशिव इथल्या काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे
यांच्यासह माजी नगरसेवक तथा युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दर्शन कोळगे यांनी भाजपात
प्रवेश केला.
माढा लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार रणजितसिंह
नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थही फडणवीस यांनी काल सोलापूर मतदार संघात सभा घेतली.
****
राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या
प्रमुख उपस्थितीत काल लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात पोहरेगाव इथं, लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार
डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. शेतीमालाला स्वामीनाथन
आयोगानुसार हमीभाव, मनरेगा मजुरीत वाढ यासह अनेक मुद्यांवर देशमुख यांनी यावेळी
भाष्य केलं.
****
बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे
यांच्यासोबत आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर
यांनी मतदार संघात काल अनेक ठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांना भेटी देत मतदारांशी संवाद
साधला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान
परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे महाविकास
आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ वैजापूर परिसरातल्या गावकऱ्यांशी
संवाद साधला.
****
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा ‘ लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा
कार्यक्रम, आकाशवाणीनं
सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा आढावा
घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
बीड जिल्ह्यात मांजरसुंबा तालुक्यात एका १६ वर्षीय मुलीचा
विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. बीड चाईल्ड हेल्पलाइनला, या विवाहाबाबत मिळालेल्या माहितीवरून संबंधित यंत्रणेनं
वधूच्या वयाची शहानिशा केली. आणि तत्काळ कार्यवाही करत, हा बालविवाह थांबवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
निवडणूक आयोगानं ८५ वर्ष वयावरील मतदार तसंच दिव्यांग
मतदारांना गृहमतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
एक हजार ३८४ मतदारांनी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त
केलेले कर्मचारी, छायाचित्रकार, पोलीस कर्मचारी, यांनी नेमून दिलेल्या वाहनातून रूटमॅप प्रमाणे मतदारांचं
गृहमतदान नोंदवून घ्यावं, तसंच विहित मुदतीत मतदान प्रक्रिया पूर्ण करून त्याचा
अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातके पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड हे विधानसभा मतदार संघ, जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत. या क्षेत्रातल्या
निवडणुकीच्या तयारीबाबत निरीक्षक राजेशकुमार यांनी काल आढावा घेतला. उपजिल्हा निवडणूक
अधिकारी देवेंद्र कटके यांनी माहितीचं सादरीकरण केलं.
****
बीड लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी काल सायकल फेरी
काढण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह, सायकल संघटनेचे सदस्य आणि बीड शहरातल्या नागरिकांनी
या सायकल फेरीत सहभाग नोंदवला. अंबाजोगाई, परळी आणि माजलगावसह जिल्ह्यात विविध ठिकाणी काल मतदार
जागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली.
****
चीनमधल्या शांघाय इथं सुरु असलेल्या तीरंदाजी विश्वचषक
स्पर्धेत भारतीय पुरुष रिकर्व संघानं सुवर्ण पदक पटकावलं. धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्या संघानं काल
अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव केला. महिला रिकर्व वैयक्तिक प्रकारात
दीपिका कुमारीनं रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकांसह एकूण आठ पदक जिंकली
आहेत.
****
बांग्लादेशात सिल्हट इथं भारत आणि बांग्लादेश महिला क्रिकेट
संघात झालेला पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं ४४ धावांनी जिंकला. भारतानं निर्धारीत
२० षटकात ७ बाद १४५ धावा केल्या. मात्र बांग्लादेशचा संघ २० षटकांत ८ बाद १०१ धावाच
करू शकला. पाच सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं
झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सचा ८ गडी राखून पराभव केला.
गुजरातनं दिलेलं २०१ धावांचं आव्हान बंगळुरु संघानं विल जॅक्सच्या नाबाद शतकी खेळीच्या
जोरावर केवळ १६ षटकांतच पार केलं.
अन्य एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनराईजर्स हैदराबादचा
७८ धावांनी पराभव केला. चेन्नईच्या संघाने दिलेल्या २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग
करताना हैदराबादचा संघ १३४ धावांवरच सर्वबाद झाला.
आज या स्पर्धेत कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि
दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान होणार आहे.
****
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर-
मसिआ या संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन राऊत यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेच्या काल
झालेल्या सर्वसाधारण सभेत चालू आर्थिक वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, यामध्ये अध्यक्षपदी राऊत यांच्यासह मनीष अग्रवाल
उपाध्यक्ष, राजेंद्र
चौधरी सचिव तर सचिन अर्जुनराव गायके यांची सहसचिव पदी निवड झाल्याचं, संघटनेच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती संचालित योगशिक्षक पदविका अभ्यास
केंद्रातर्फे आजपासून नि:शुल्क योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सातारा परिसरात
एमआयटी महाविद्यालयात होणारं हे पाच दिवसीय शिबीर सकाळी ६ ते ७ या वेळेत होणार असून, ते सर्व वयोगटासाठी खुलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल रात्री विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे काढणी झालेली हळद, ज्वारी पिकांसह आंबा आणि टरबूज पिकांचं नुकसान झालं.
****
नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस च्या मार्गात आजपासून
चार दिवस तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या दरम्यान ही गाडी पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र, अंबाला कँट, राजपुरा, सरहिंद आणि खन्ना या रेल्वे स्थानकांवरून धावणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment