आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२९ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडीसा आणि झारखंड या राज्यातल्या एकूण ५७ लोकसभा मतदारसंघामधे निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ६ मे पर्यंत असून, मतदान २५ मे रोजी होणार आहे.
****
चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज आणि उद्या राज्यात सहा सभा होणार आहेत. आज ते सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा घेणार आहेत.
****
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळे एमआयडीसी इथल्या मतमोजणी केंद्राला भेट देऊन पहाणी केली. कुवारबाव इथल्या सामाजिक न्याय भवन इथल्या इव्हीएम वाटप केंद्रालाही त्यांनी काल भेट दिली.
****
शिवसंग्राम संघटनेनं लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी काल संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीनंतर पुण्यात सांगितलं. विधानसभेला मात्र संघटनेच्या वतीनं १२ जागांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं.
****
आम आदमी पक्षानं आपल्या निवडणूक प्रचार गीतात जाहिरातीसंबंधीचे नियम आणि निवडणूक आयोगानं दिलेल्या दिशानिर्देशाबद्दल बदल करावेत आणि सुधारित गीत पुन्हा प्रमाणीकरणासाठी सादर करावं, असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या प्रचार गीतातल्या एका विशिष्ट शब्दाला आणि या गीतामध्ये दाखवलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गजाआड असलेल्या छायाचित्रावर आयोगानं आक्षेप घेतला आहे.
****
भारतीय तटरक्षक दलानं काल गुजरातमधल्या पोरबंदर इथं केलेल्या संयुक्त कारवाईत एका पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटी रुपये किमतीचे ८६ किलो अंमली पदार्थ हस्तगत केले. याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment