Friday, 26 April 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 April 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण.

·      नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत तर परभणी जवळच्या बलसा ग्रामस्थांचा मतदानावरचा बहिष्कार मागे.

·      चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण;जालन्यात १२, बीडमध्ये १९ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले सात अर्ज बाद.

आणि

·      बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघांत आज काही प्रकार वगळता, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोलीसह राज्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या आठ मतदारसंघातल्या २०४ उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड इथं ५२ पूर्णांक ४७ शतांश टक्के, परभणी इथं ५३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिंगोली इथं  ५२ टक्के, यवतमाळ वाशिम ५४ टक्के, तर अकोल्यात ५२ टक्के मतदानाची नोंद झाली.

****

हिंगोली लोकसभा मतदार संघात ३९ मतदान केंद्रावरील बॅलेट युनीट, १६ केंद्रांवरील कंट्रोल युनीट आणि २५ व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये अडथळा निर्माण झाला, मात्र तांत्रिक बिघाड दूर करण्यासह काही यंत्र तत्काळ बदलून देण्यात आल्यावर, मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं.

परभणी लोकसभा मतदार संघातही २० मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या, या सर्व ठिकाणी मतदान यंत्र त्वरीत बदलून देण्यात आली, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.

नांदेड लोकसभा मतदार संघात बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर एका युवकाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलेट युनीट कुऱ्हाडीने फोडल्याचा प्रकार समोर आला. भैय्यासाहेब एडके असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी बॅलेट युनीट तत्काळ बदलून देण्यात आलं. दरम्यान, या युवकाने मतदान केंद्रात कुऱ्हाड कशी नेली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

****

परभणी शहराजवळील बलसा खुर्द गावात असलेल्या समस्यांमुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हिवरी इथल्या मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांनी दुपारचं भोजन एकत्रित केल्यानं, मतदारांचा खोळंबा झाला. या ठिकाणी ताटकळत बसलेले अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड दक्षिण मतदार संघातील विष्णुपुरी इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. या मतदान केंद्रावरील सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केलं. शहरात गुजराथी महाविद्यालयात महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.

परभणी लोकसभा मतदार संघात सखी मतदार केंद्र निर्माण करण्यात आले होते, यात सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला होत्या. या केंद्राला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली. नव मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता.

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं युवराज भिसे या नवमतदार युवकाने मुंबईहून येत तर श्रद्धा सूर्यवंशी या नवमतदार युवतीने बंगळुरू इथून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू झाली. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे.

आज पालघर लोकसभा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून सुशिला कांबळे, राईट टू रिकॉल पक्षाकडून अमित उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात आज तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे पी गावित आणि सुभाष चौधरी यांनी तर नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

धुळे लोकसभा मतदारसंघात आज ४१ अर्जांची विक्री झाली. यात भाजप उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या वतीने चार अर्जांची खरेदी केली.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज झाली. २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होईल.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले होते, यापैकी सात जणांचे अर्ज बाद झाले, तर ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचं, जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून ४७ उमेदवारांनी ६८ अर्ज दाखल केले होते. यापैकी १२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

बीड इथून ७६ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. यापैकी १९ जणांचे अर्ज बाद ठरले, तर ५५ अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली.

****

राज्यात आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन आज रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होईल.

दरम्यान, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचाहा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

                                   ****

बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश आलं आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह निर्मुलन मोहीम जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनात राबवली जात असून जिल्ह्यात शून्य बालविवाहपर्यंत आणण्याचं ध्येय असल्याचं सांगत, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पथकांचं अभिनंदन केलं आहे.

****

नंदुरबार लोकसभा मतदार संघात आज अर्ज छाननी प्रक्रिये दरम्यान, भाजपाच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी, के.सी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. गोवाल पाडवी यांनी मालमत्तेचं विवरण दिलं नसून ९० दिवसाच्या आतील बँकेच्या नोंदी देखील जोडल्या नसल्याचं, तसंच गावित दांम्पत्यांनं चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं, हिना गावीत यांनी म्हटलं होतं. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोवाल पाडवी यांचा अर्ज वैध ठरवला. भारतीय जनता पक्षानं, याविरोधात न्यायालयात अथवा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.

****

बीड इथं येत्या रविवारी २८ एप्रिलला मतदार जागृतीसाठी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून ही फेरी काढण्यात येणार असून या फेरीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथून करण्यात येईल.

****

जनकल्याण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जाहीर करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील गोडेगाव इथं येत्या ३० एप्रिल रोजी आयोजित समारंभात बोरूडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बोरुडे यांनी या संस्थेच्या माध्यमातून, आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना गेल्या ३१ वर्षापासून मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचं काम केलं आहे

****

चीनमध्ये शांघाय इथं सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या मिश्र जोडीनं आज अंतिम फेरीत प्रवेश केला. यासोबतचं या स्पर्धेतलं भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. उद्या सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांचा सामना एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...