Tuesday, 30 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.04.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 April 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे;भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज उस्मानाबाद आणि लातूर इथं सभा 

·      चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट-जालन्यात २७, बीड ४१ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

·      राष्ट्रीय पात्रता चाचणी-नेट परीक्षा येत्या १६ जूनऐवजी १८ जूनला होणार

आणि

·      वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी झंझावाती प्रचार दौरे करत आहेत. सातारा इथले महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कराड इथं प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत, कलम ३७०, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, आदी मुद्यांवर भाष्य केलं.

विरोधकांकडून आपल्या तसंच आपल्या सहकाऱ्यांच्या बनावट चित्रफिती पसरवल्या जात असल्याचा आरोप करत, नागरिकांनी त्यापासून सावध राहावं, तसंच अशा प्रकारांवर निवडणूक आयोगानं कठोर कारवाई करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं.

सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते तसंच पुण्यातले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी काल सोलापुरात आणि त्यानंतर सायंकाळी पुण्यात सभा घेतली. समृद्धी महामार्ग, वंदे भारत तसंच सेमी हाय स्पीड रेल्वे, मेट्रो रेल्वे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज विमानतळं हे आधुनिक भारताचे पुरावे असल्याचं मोदी यांनी नमूद केलं.

संविधान आणि आरक्षण काढून घेण्याचा अपप्रचार जरी विरोधकांकडून चालू असला तरी त्यास धक्का लागू देणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, माळशिरस, उस्मानाबाद आणि लातूर इथं मोदी यांच्या आज प्रचारसभा होणार आहेत.

लातूर इथं सारोळा रस्त्यावर ४० एकर मैदानावर ही सभा होणार असून, उन्हापासून बचावासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या २५ एकर क्षेत्रावर मोदींची सभा होणार आहे.

****

देशाचं सरकार हुकूमशाहीच्या दिशेनं चाललं असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते काल बारामती लोकसभा मतदार संघात सासवड इथं, महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.महाविकास आघाडीचीही आज संध्याकाळी पुण्यात जाहीर सभा होणार आहे.

दरम्यान, येत्या तीन तारखेला पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होणार असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या देखील पुण्यात रोड शो घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोलापूर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आणि धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर करण्याचा निर्णय संसदेत मंजूर करून का घेतला नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

****

जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी काल सोयगाव तालुक्यातल्या जरांडी इथं सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी देवगाव रंगारी इथं प्रचारसभा घेतली.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी काल नामनिर्देशनपत्रं दाखल केली. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी काल अर्ज दाखल केला. दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनीही काल उमेदवारी अर्ज भरला.

धुळे लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तसंच अपक्ष उमेदवार लहानू महादू साबळे यांनीही काल नामनिर्देशन पत्र दाखल केलं.

****

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अनुक्रमे राजाभाऊ वाजे तसंच भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केले. नाशिक इथून गेल्या शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे शांतिगिरी महाराज यांनी काल शिवसेना उमेदवार नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंतची मुदत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****


लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात राज्यातल्या ११ मतदार संघांमध्ये ३६९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ उमेदवारांनी काल माघार घेतली, त्यामुळे आता या टप्प्यात २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात या टप्प्यात मतदान होणार आहे. जालना लोकसभा मतदार संघातून नऊ उमेदवारांनी, बीड लोकसभा मतदार संघातून १४ उमेदवारांनी तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता जालना मतदार संघातून २७, बीड लोकसभा मतदार संघातून ४१, तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्यातल्या इतर मतदार संघापैकी नंदुरबार मतदार संघात ११, जळगाव १४, रावेर २४, मावळ ३३, पुणे ३५, शिरुर ३२, अहमदनगर २५, तर शिर्डी मतदार संघात २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना चिन्हांचं वाटपही काल करण्यात आलं.

****

मध्यप्रदेशात इंदूर इथले काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत, आपला उमेदवारी अर्ज काल मागे घेतला. त्यानंतर बम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

१३ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी इंदूर मधून १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, मात्र विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतल्या काँग्रेस शिवाय इतर पक्षांनी इथून उमेदवार दिलेला नव्हता.

****

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जालना लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****


विद्यापीठ अनुदान आयोगानं राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्थात नेट परीक्षा दोन दिवस पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा पूर्वनियोजित १६ जूनऐवजी १८ जूनला होणार आहे. दरम्यान, राज्यात दहावी बारावी परीक्षेचा निकाल मे अखेर लागण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून काल ही माहिती देण्यात आली.

****

राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान मालेगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात नांदेड इथं ४२ पूर्णांक आठ, बीड ४२, छत्रपती संभाजीनगर ४१ पूर्णांक चार, तर परभणी इथं ४० पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड इथं काल या हंगामातली उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असं आवाहन, नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे. पुढच्या पाच दिवसामध्ये मराठवाड्यात तापमान वाढ कायम राहण्याचे संकेत आहेत. नागरिकांनी वाढत्या तापमानात कष्टाची कामं टाळावीत, पांढऱ्या रंगांचे सैल कपडे वापरावेत, पाणी तसंच सरबतांचं सेवन करावं, उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, फेटा, उपरणे, यांचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी लातूर इथं जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत काल लातूर शहरात पार पडलेल्या हाके आणि पांढरे परिवाराच्या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींनी येत्या ७ मे रोजी मतदान करण्याची शपथ घेतली.

****

जालना लोकसभा मतदार संघात निवडणूक यंत्रणा सज्ज असून, मतदान यंत्र, मतदान पथके आदी बाबींची पूर्वतयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी भरारी पथके, स्थिर निगराणी पथके स्थापन केली आहेत. तसंच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी 'स्वीप' उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेत असल्याचं, पांचाळ यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ मे पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणं, दाहक स्फोटक पदार्थ बाळगणं, पाच किंवा अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणं, तसंच निदर्शनं करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पूर्वपरवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षकांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

****

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. दा. धों. काचोळे लिखित, ‘मराठा समाज शास्त्रीय वास्तव, या पुस्तकाचं काल प्रसिद्ध विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रम पार पडलं.

****

No comments: