Tuesday, 30 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.04.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 April 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

छत्तीसगढमधल्या नारायणपूर जिल्ह्यात जिल्हा राखीव दल, विशेष कृती दलासोबत झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह सात नक्षलवादी मारले गेले. अबूझमाडच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलानं शोधमोहिम सुरु केल्यानंतर ही चकमक झाली. या ठिकाणाहून एक ए के -47 आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा तसंच दारुगोळा जप्त करण्यात आला.     

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या सात तारखेला मतदान होणार आहे. या टप्प्यात उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक रॅली, बैठका, प्रचारसभा घेत आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस इथं सभा घेतली. गेल्या दहा वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेल्या कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा होणार आहेत. लातूर इथं सारोळा रस्त्यावर ४० एकर मैदानावर ही सभा होणार असून, उन्हापासून बचावासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या २५ एकर क्षेत्रावर मोदींची सभा होणार आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी आज अर्ज दाखल केला. उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड, ईशान्य मुंबईतून संजय पाटील, धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा बच्छाव, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर आज अर्ज दाखल करणार आहेत.

****

शिवसेनेनं उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षानं आज यासंदर्भातलं पत्रक जारी करुन ही माहिती दिली.  

****

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचाया कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जालना लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आज धुळे शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी वोट कर धुळेकरअसं आवाहन करत पथनाट्य सादर करण्यात आलं. धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन केलं.

****

नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गावात गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे, गंगापूर धरणाची तब्बल दोन कोटी १५ लाख ८८ हजार लिटरने पाणी क्षमता वाढली आहे. आतापर्यंत एक हजार ७५० मोठे ट्रक आणि १९९ ट्रॅक्टर च्या माध्यमातून २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला. जलसमृद्ध नाशिक अभियानाअंतर्गत भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थांच्या पाठबळाच्या आधारे ही मोहिम राबवली जात आहे. धरणातून काढलेला गाळ आजुबाजुच्या शेतकऱ्यांना मोफत दिला जात आहे.

****

नाशिक जिल्ह्यात चांदवड जवळ आज सकाळी बस आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बसचं टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात भोकरहून नांदेडकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने आठ दुचाकींना उडवल्याची घटना आज सकाळी बारडजवळ घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.

****

चीन मध्ये सुरु असलेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने इंग्लंडचा पाच - शून्य असा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपान्त्यपूर्व फेरीत भारतीय संघाचा सामचा उद्या थायलंड सोबत होणार आहे.

दरम्यान, पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत होणाऱ्या बॅडमिटन सामन्यांच्या सर्व चारही प्रकारासाठी भारतीय बॅडमिंटनपटू पात्र ठरले आहेत. पुरूष एकेरीत एच एस प्रणॉय आणि लक्ष्य सेन, महिला एकेरीत पी व्ही सिंधु, पुरूष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तर महिला दुहेरीत अश्विनी पोन्नपा आणि तनिषा क्रास्टो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

****

भारत आणि बांग्लादेशच्या महिला क्रिकेट संघादरम्यान बांग्लादेशात सुरु असलेल्या पाच टी - ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments: