आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२७ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
उत्तर काश्मीरमधल्या बारामुला जिल्ह्यात नौपाडा क्षेत्रात सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. काल रात्री ही चकमक झाली. या ठिकाणाहून हत्यारं, दारुगोळा आणि काही संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर इथं, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत.
दरम्यान, लातूर इथले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांची आज उदगीर इथं सभा होणार आहे. जिल्हा परिषद मैदानावर दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरु झाली. ईशान्य मुंबईतले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
****
पालघर जिल्ह्यात वाडा इथं वाडा - भिवंडी महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले. टेम्पो चालक हा मद्यधुंद अवस्थेत, बोईसरहून भिवंडीच्या दिशेने रिकामा टेम्पो घेऊन जात असतांना, त्यानं तीन मोटारसायकल स्वार आणि रस्त्याने जाणाऱ्या पादचा-यांना चिरडलं. आनंद मेढेकर असं या टेम्पो चालकाचं नावं असून तो नांदेडचा रहिवासी आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लिंबेजवळगाव इथं काल गुन्हे शाखेनं ३७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. परराज्यातून एका कारमधून गुटखा शहरात आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेनं सापळा रचून गुटख्यासह नऊ वाहने जप्त केली.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज दुपारी तीन वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
चीनमध्ये शांघाय इथं सुरु असलेल्या जागतिक तीरंदाजी स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या जोडीचा अंतिम फेरीचा सामना आज एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे. यासोबतचं या स्पर्धेतलं भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे.
****
No comments:
Post a Comment