Saturday, 27 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.04.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 April 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या

·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण ५९ पूर्णांक ६३ टक्के मतदान

·      नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत;यंत्रातला डेटा सुरक्षित

·      चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण;जालन्यात १२, बीडमध्ये १९ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघातले सात अर्ज बाद

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून दोन दिवसीय शेक्सपिअर महोत्सव

 

सविस्तर बातम्या

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. मतदानानंतर सर्व व्हीव्हीपॅट यंत्रांतल्या मतदान पावत्यांची पडताळणी करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली. यासंदर्भात काल निकाल देताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पीठानं, उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्रे सीलबंद करण्यात यावीत, असं सांगितलं. त्याशिवाय, निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण पडताळणी करण्याचा अधिकार असेल, असं या आदेशात म्हटलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघांत काल काही प्रकार वगळता, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोलीसह राज्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या आठ मतदारसंघात एकूण ५९ पूर्णांक ६३ टक्के मतदान झालं. 

नांदेड मतदारसंघात ५९ पूर्णांक ५७ टक्के, परभणी - ६० पूर्णांक नऊ टक्के, हिंगोली - ६० पूर्णांक ७९ शतांश टक्के, वर्धा - ६२ पूर्णांक ६५ टक्के, अमरावती ६० पूर्णांक ७४ टक्के, तर अकोला आणि बुलडाणा मतदारसंघात सरासरी ५८ टक्के मतदान झालं.  

****

हिंगोली लोकसभा मतदार संघात ३९ मतदान केंद्रावरील बॅलेट युनीट, १६ केंद्रांवरील कंट्रोल युनीट आणि २५ व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाला होता, ही यंत्र तत्काळ बदलून देण्यात आल्यावर, मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. अनेक मतदान केंद्रांवर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी लोकसभा मतदार संघातही अनेक केंद्रांवर सायंकाळी उशीरापर्यंत मतदान सुरू होतं. परभणीत २० मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या, या सर्व ठिकाणी मतदान यंत्र त्वरित बदलून देण्यात आली, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.

परभणीजवळच्या बलसा खुर्द गावात असलेल्या समस्यांमुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मतदान  केलं.

नांदेड लोकसभा मतदार संघात बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर, भैय्यासाहेब एडके नावाच्या युवकाने, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलेट युनीट कुऱ्हाडीने फोडल्याचा प्रकार समोर आला. या मतदान यंत्रातला डेटा सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली...

 

त्या व्यक्तीने इव्हीएम व्हीव्हीपॅट मशिन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये बॅलेट युनीटला क्षती झालेली आहे. आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतीग्रस्त झालेला आहे. मात्र कंट्रोल युनीट सेफ आहे. व्हीव्हीपॅटच्या ज्या चिट्स असतात स्लीपस त्या सुद्धा सेफ आहे. तो डेटा पूर्ण रिट्राव्हेबल आहे. तो डेटा आपण सेव्ह करुन ठेवतो. कुठलाही डेटा लॉस झालेला नाही.

****

यवतमाळ इथं मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचं वाटप करून मतदानापासून परावृत्त केलं जात असल्याचा धक्कादायक आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने संबंधित ठिकाणी छापा मारला असता, गैरप्रकार करणारे लोक पसार झाले. मात्र बोटाला लावण्याची शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांची नोंदवही पथकाच्या हाती लागली. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात हिवरी इथल्या एका मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांनी दुपारचं भोजन एकत्रित केल्यानं, मतदारांचा खोळंबा झाला. या ठिकाणी ताटकळत बसलेले अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड लोकसभा मतदार संघातल्या विष्णुपुरी इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. शहरात गुजराथी महाविद्यालयात महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.

नव मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता.

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं युवराज भिसे या नवमतदार युवकाने मुंबईहून येत तर श्रद्धा सूर्यवंशी या नवमतदार युवतीने बंगळुरू इथून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या…

****

वाशिम जिल्ह्यात केकत उमरा इथल्या चेतन सेवांकुर संस्थेतल्या अंध-दिव्यांग तरुणांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. ५ मतदारांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहाय्यकाच्या मदतीने मतदान केलं.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्जप्रक्रियेला कालपासून प्रारंभ झाला. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, नाशिक, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे पी गावित आणि सुभाष चौधरी यांनी तर नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून काल अर्ज दाखल केला.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून ५१ उमेदवारांपैकी सात जणांचे अर्ज बाद झाले, तर ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

जालना लोकसभा मतदारसंघातून ४७ उमेदवारांपैकी १२ अर्ज अवैध तर ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. बीड इथून ७६ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. यापैकी १९ अर्ज बाद ठरले, तर ५५ अर्ज वैध ठरले आहे.

जळगाव २०, रावेर २९, नंदुरबार १६, मावळ ३५, पुणे ४२, शिरूर ३५, अहमदनगर ३६, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.  चौथ्या टप्प्यातल्या या सर्व मतदार संघात २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, १३ मे रोजी मतदान होणार आहे.

****

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

 

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर इथं, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभास्थळाची पाहणी केली.  

दरम्यान, लातूर इथले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांची आज उदगीर इथं सभा होणार आहे. जिल्हा परिषद मैदानावर दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे.

****

जागतिक ग्रंथदिनाच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून दोन दिवसीय शेक्सपिअर महोत्सवाला प्रारंभ होत आहे. टिळक नगर इथल्या बालाजी मंदिराच्या सभागृहात आज सायंकाळी या महोत्सवाचं उद्घाटन होईल. या महोत्सवात आज जागतिक वाङ्गमय आणि मराठी या विषयावर मुंबई इथले ग्रंथमित्र शशिकांत सावंत यांचं व्याख्यान तसंच ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉ सुधीर रसाळ यांच्या ललित लेखनाचं अभिवाचन होणार आहे. उद्या 'सुरात न्हाले शब्द कोवळे' हा काव्य गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात शिरुर इथं दोन विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला मारहाण केल्या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यात श्रीपत वाडी इथं भगवान बाबा महाविद्यालयात बीएससी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु असतांना, हा प्रकार घडल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं गुलमंडी परिसरात अतिक्रमण करणाऱ्या तीन दुकांनांविरुध्द दंडात्मक कारवाई करत, पंधरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सोमवारपर्यंत अतिक्रमण काढून न घेतल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

****

बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २२५ बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाइनला यश आलं. जिल्ह्यात बालविवाह निर्मुलन मोहीम जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनात राबवली जात असून, जिल्ह्यात शून्य बालविवाहपर्यंत आणण्याचं ध्येय असल्याचं सांगत, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पथकांचं अभिनंदन केलं आहे.

****

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने काल भिवंडीतून अटक केली. हे तिघं छत्तीसगड राज्यातले रहिवासी असून, त्यांच्याकडून १२ मोबाईल फोन, एक टॅब आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला.

****

चीनमध्ये शांघाय इथं सुरु असलेल्या जागतिक तीरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या मिश्र जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला. यासोबतचं या स्पर्धेतलं भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. आज सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांचा सामना एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे.

****

नांदेड इथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी तीन वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

****

No comments: