Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
· लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या राज्यातल्या ८ मतदारसंघांसह देशातल्या ८८ जागांवर मतदान.
· लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज मुदत संपली.
· औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आजपर्यंत ५१ उमेदवारांकडून ७८ नामानिर्देशन पत्र दाखल.
· आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस.
आणि
· राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, महिलांना नोकऱ्यांत ५० टक्के आरक्षणाला प्राधान्य.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात उद्या १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या आठ मतदारसंघात एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्र असून एक कोटी ४९ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, हिंगोली शहरात लिंबाळा इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतदान केंद्रासाठी आवश्यक साहित्याचं आज वाटप करण्यात आलं. कळमनुरी, वसमत या तहसील कार्यालयातही साहित्य वाटपाची लगबग आज दिसून आली.
परभणी मतदार संघात दोन हजार २९० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठीचं सर्व साहित्य आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात दोन हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यवतमाळ वाशिम मतदार संघात दोन हजार २२५ मतदान केंद्र असून एकूण १९ लाख ४० हजार ९१६ मतदार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी सात हजार ७१९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन हजारांवर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७५ हजार ६३७ मतदार आहे. यामध्ये नऊ लाख ७० हजार ६६३ पुरुष मतदार तर नऊ लाख चार हजार ९२४ महिला मतदार आहेत. उद्या जवळपास दोन हजार ५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी पाच हजारांवर पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात राहतील.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या अकरा मतदारसंघाचा समावेश असून १३ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांनी ३७ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तसंच पिपल्स पार्टी ऑफ इंडीयाचे नारायण जाधव, अपक्ष उमेदवार जीवन राजपूत, मनोज घोडके आदींचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांत समावेश आहे.
दरम्यान, जालना लोकसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ८ जणांनी १४ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. आजपर्यंत एकूण १९ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
****
छत्रपती संभाजी नगर इथं महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मतदारांना संबोधित केलं. दरम्यान, भुमरे यांनी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती.
****
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आयोगानं दोन्ही नेत्यांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान, धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप करत आयोगानं ही नोटीस बजावली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला. शपथनामा नावानं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार, याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे. एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवादाविरोधातला युएपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पक्षानं जाहीरनाम्यातून दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचा जाहीरनामा हा हिंदू विरोधी आणि देशविरोधी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं या लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकून दाखवाव्यात, नाहीतर उद्धव ठाकरे यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असं ते यावेळी म्हणाले.
****
देशातली केंद्रीय सत्ता ही हुकूमशाहीकडं वाटचाल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात राहूरी इथं अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलत होते. देशातले ८७ टक्के नागरिक बेरोजगार असून महागाई देखील वाढत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्रात उद्या अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ-वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघात होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम मतदानाचा मागोवा उद्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन ऐकता येईल.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सातारा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील २४ शाळा, महाविद्यालयातील जवळपास दोन हजार ४०० विद्यार्थ्यांसह शिक्षक, मुख्याध्यापक तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला.
****
नांदेडहून उद्या सुटणारी हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेत सकाळी साडेनऊऐवजी दुपारी तीन वाजता सुटेल. तर हुजूर साहिब नांदेड - जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस उद्या सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांऐवजी सायंकाळी सहा वाजता सुटेल. तसंच पनवेलहून आज दुपारी अडीच वाजता सुटणारी पनवेल हुजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस साडेसात तास उशीराने म्हणजेच रात्री दहा वाजता सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ मे पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी सन २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या मुदतीत सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे.
****
नागपुर इथं येत्या २७ ते २९ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना स्वदेशी बियाणांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी या महोत्सवात २० ते २२ राज्यांतील शेतकरी, बियाणे संवर्धन करणारे शेतकरी तसेच संस्था बीजाईची विविधता, शेतमाल, साहित्य आणि आपले ज्ञान यांची देवाणघेवाण करतात.
****
राज्यात आज मालेगाव इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा या ठिकाणी पारा चाळीशीपार पोहचला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक सहा, परभणी इथं ३८ पूर्णांक पाच तर बीड इथं ४० पूर्णांक एक अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment