Monday, 29 April 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 April 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे.

·      शांतिगिरी महाराज यांचा नाशिकमधून शिवसेना उमेदवार म्हणून दुसरा अर्ज;ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंत मुदत.

·      चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट-जालन्यात २७, बीड ४१ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

आणि

·      आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या १० जणांना गडचिरोली इथं अटक.

****

लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी झंझावाती प्रचार दौरे करत आहेत. सातारा इथले महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कराड इथं प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत, कलम ३७०, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, आदी मुद्यांवर भाष्य केलं.

विरोधकांकडून बनावट चित्रफिती पसरवल्या जात असल्याचा आरोप करत, नागरिकांनी त्यापासून सावध राहावं, तसंच अशा प्रकारांवर निवडणूक आयोगानं कठोर कारवाई करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं.

सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी आज सोलापुरात सभा घेतली. संविधान आणि आरक्षण काढून घेण्याचा अपप्रचार जरी विरोधकांकडून चालू असेल तरी त्यास धक्का लागू देणार नसल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला.

पुण्यातले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मोदी यांची आज सभा होत आहे.

तर उद्या माळशिरस, उस्मानाबाद आणि लातूर इथं मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

लातूर इथं सारोळा रस्त्यावर ४० एकर मैदानावर ही सभा होणार असून, उन्हापासून बचावासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून पोलिस अधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांनीही या पूर्वतयारीचा आज आढावा घेतला.

****

ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरातमधून ठरणार असल्याची टीका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज ठाणे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार फेरीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर या फेरीत सहभागी झाले होते. 

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्रं दाखल केली. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज अर्ज दाखल केला.

****

दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

इतर मागास वर्ग जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

धुळे लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तसंच अपक्ष उमेदवार लहानू महादू साबळे यांनीही आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं.

****

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अनुक्रमे राजभाऊ वाजे तसंच भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केले. नाशिक इथून गेल्या शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे शांतिगिरी महाराज यांनी आज शिवसेना उमेदवार नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंतची मुदत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात या टप्प्यात मतदान होणार आहे.

 

जालना लोकसभा मतदार संघातून आज नऊ उमेदवारांनी माघार घेतली, आता या मतदार संघातून २७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

बीड लोकसभा मतदार संघातून आज १४ उमेदवारांनी माघार घेतली, आता ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून आज सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता या मतदार संघातून ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना चिन्हांचं वाटपही आज करण्यात आलं.

****

इंदूर इथले काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत, आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. बम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं वृत्त आहे.

****

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचाहा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

हंगामी फ्लूच्या प्रार्दुभावावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांबरोबर आज आढावा बैठक घेतली. कोणत्याही राज्यात फ्ल्यूच्या साथीची परिस्थिती आढळून आलेली नाही. मात्र अमेरिकेत विविध राज्यांमधून दुधाळ पशू आणि दुधामध्ये एविअन फ्ल्यूचे विषाणू आढळल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी दूध व्यवस्थित उकळावं आणि मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजवावेत असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदार संघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांनी नाशिकमधील सहाही विधानसभा मतदार संघातल्या वाहतूक तपासणी नाक्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली. एखाद्या वाहनात ५० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास सहायक खर्च निरीक्षकांना तातडीनं माहिती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

****

लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदासंघांकरीता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी आज मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदारसंघाचा खर्च विषयक आढावा घेतला. धुळे लोकसभा मतदार संघात येत्या २० मे ला निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी ही पाहणी केली. बैठे आणि फिरत्या पथकांनी आयोगाच्या निर्देशानुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, खर्च विषयक नोंदणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावं तसंच येणाऱ्या वाहनांची दक्षतेनं तपासणी करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय जलतरण पटू शुभम वनमाळी यांनी पालघरकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान इथं निवडणूक भरारी पथकानं १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वात पथकानं ही कारवाई केली. नियमित तपासणी दरम्यान नेवासा - श्रीरामपूर रोडवर येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते. 

****

यवतमाळ शहरालगतच्या जामवाडी घाटात डिझेल वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं लागलेल्या भीषण आगीत सहचालक गोपाल पवार यांचा होरपळून मृत्यू झाला. तर चालकानं वेळेप्रसंगी उडी मारल्यानं तो बचावला. पुलगाव इथून हरसूलकडं जाणारा डीझल चा टँकर वळणावर पलटला, त्यानंतर त्यातील डीझल ने पेट घेतला. त्यामुळं दारव्हा मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

****

गडचिरोलीमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यांवर अहेरी पोलिसांनी आज छापा टाकला. याप्रकरणी १० जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून ४ मोबाईल फोन आणि सुमारे साडे नऊ हजार रुपयांची रोकड जप्त केली.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स चा सामना दिल्ली कॅप्टिल्स बरोबर कोलकाता ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता वाजता सुरु होईल.

****

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. दा.धों.काचोळे लिखित 'मराठा समाज शास्त्रीय वास्तव या पुस्तकाचं आज प्रसिद्ध विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात, डॉ कांबळे यांनी बोलतांना, हे पुस्तक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक परिवर्तनाच्या मार्गावर टाकलेलं पहिलं यशस्वी पाऊल असल्याचं नमूद केलं. काचोळे यांचं हे प्रकाशित झालेलं सत्तरावं पुस्तक आहे.

****

राज्यात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातले आहेत. त्या खालोखाल ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलडाणा १५, सातारा १४, सोलापूर १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० उष्माघाताचे रुग्ण आहेत.

****

 

No comments: