Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 April 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थांबणार;परवा मतदान
· महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांकडून प्रचाराला वेग
· चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस;जालना मतदार संघातून महायुतीचे रावसाहेब दानवे यांचा अर्ज दाखल
आणि
· मराठवाड्यात काल अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात परवा २६ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये सर्वच पक्षांचे दिग्गज नेते आणि स्टार प्रचारक प्रचारसभा घेत आहेत.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अकोला इथं महायुतीचे उमेदवार अनूप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. देशातील अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गाचं आरक्षण कुणीही हटवू शकणार नाही, असं त्यांनी नमूद केलं. शहा यांची आज अमरावती मध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. आपण जात, पात, धर्म न बघता विकास करण्यासाठी रस्त्यावर उतरून कामं करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. भाजप नेते केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी काल परभणी शहरातून पदयात्रा काढून जानकर यांचा प्रचार केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नांदेड इथं महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी नाळेश्वर इथं जाहीर सभा घेतली.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल परभणीत सभा घेतली. भाजपकडे बोलण्यासाठी काही मुद्दे शिल्लक नसल्यानं, ते आमच्या घराणेशाहीवर बोलत असल्याची टीका त्यांनी केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
****
जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात आत्तापर्यंत १० उमेदवारांनी १६ नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत. काल एकूण ११ जणांनी २४ नामनिर्देशन पत्रांची उचल केली तर आजपर्यंत ८८ जणांनी २१० उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काल अकरा उमेदवारांनी अर्ज सादर केले. यामध्ये भारतीय युवा जन एकता पार्टीचे रवींद्र बोडखे, बहुजन महा पार्टीच्या उमेदवार मनीषा उर्फ मंदा खरात, आणि इतर अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत या मतदार संघात १९ जणांचे २७ अर्ज दाखल झाले आहेत.
बीड इथून काल पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यासह १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, या मतदार संघातून काल चौदा उमेदवारांनी पस्तीस अर्ज घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नागपूर मतदार संघातले महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारफेरीत शालेय विद्यार्थ्यांना सहभागी केल्याप्रकरणी, संबंधित शाळा संचालकांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भात नागपूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे. दरम्यान, या प्रकरणात गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
****
बारामती लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला 'तुतारी' हे चिन्ह दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघात या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना याच चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, याच मतदार संघात दुसऱ्या एका उमेदवाराला आयोगाने 'तुतारी' हे चिन्ह दिल्यामुळे पक्षानं नाराजी व्यक्त केली. मात्र आयोगानं हा आक्षेप फेटाळून लावला आहे.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना हिंगोली जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. वीज पडल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोघांचा, तर नांदेड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातल्या रिठ्ठी इथं रावसाहेब नीळ या तरुण मजुराचा, तर अजिंठा इथं वादळी पावसात झाडाखाली थांबलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या इरेगाव इथंही अंगावर वीड पडून एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या अनेक भागात सोमवारी रात्री देखील गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला.
****
कोल्हापूर जिल्ह्यात दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबाची यात्रा काल उत्साहात साजरी झाली. सासनकाठ्या नाचवून आणि गुलाल, खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी जोतिबाच्या नावानं चांगभलं चा गजर केला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीची पूजा करण्यात आली. सुमारे आठ लाख भाविक दर्शनासाठी आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची चैत्र पौर्णिमा यात्रा गेल्या रविवारपासून सुरू आहे. या यात्रेदरम्यान देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
येरमाळा इथं येडेश्वरी देवीच्या यात्रेत आज देवीची पालखी निघणार असून, आमराई मंदिरात पारंपरिक चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम होणार आहे.
हनुमान जन्मोत्सवही काल सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये काल पहाटे भक्तांनी गर्दी केली होती.
****
दरम्यान, विविध यात्रांच्या ठिकाणी होत असलेल्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. काल या मोहिमेत नाशिक जिल्ह्यातलं प्रसिद्ध शक्तिपीठ वणी इथं दोन हजार किलो भेसळयुक्त पेढे जप्त करण्यात आले. या पेढ्यांची किंमत सुमारे पाच लाख त्र्याऐंशी हजार रुपये असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बीडच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची मुलाखत आज सकाळी अकरा वाजता बीड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासनानं केलेली तयारी, तसंच मतदानाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी राबवले जात असलेले विविध जागृतीपर उपक्रम याबाबतची माहिती या मुलाखतीत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी देणार आहेत.
****
धाराशिव इथं काल मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली तसंच आणि पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आलं. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन केलं. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सायकल फेरीनं संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यातल्या मतदारांना जागृत करण्यासाठी प्रत्येक शाळांमधून विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिलेलं भावनिक पत्र, तसंच विद्यार्थ्यांची मानवी साखळी, पथनाट्य, आदी उपक्रमांमधून जनजागृती केली जात आहे.
****
लोकसभा निवडणूक पारदर्शक, शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन, निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी केलं आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात काल उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते. उमेदवारांनी आपला प्रत्येक खर्च नोंदवहीत नमूद करावा, अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी यावेळी केली.
****
मानवी विश्व ग्रंथामुळे समोर आलं, असं मत ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केलं आहे. काल जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठी ग्रंथांचा इतिहास विशद केला. यानंतर प्राध्यापक महेश खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनात पंधरा कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
****
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांना बी-बियाणं, खते, कृषी निविष्ठा वेळेत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकांमार्फत कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी पंचायत समितीत कार्यरत असलेला कंत्राटी अभियंता मोहम्मद अखीब मोहम्मद वाजिद फारुकी याला, अठरा हजार रुपये लाच घेताना, काल हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. घरकुलाच्या संचिकेवर स्वाक्षरी करून उर्वरित १ लाख ५ हजारांची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment