Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ एप्रिल २०२४
सायंकाळी ६.१०
****
· लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातल्या प्रचारतोफा थंडावल्या;प्रचार सभांसाठी स्टार प्रचारकांची लगबग
· चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस;औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल तर बीड इथून महायुतीच्या
पंकजा मुंडे यांचा अर्ज दाखल
· राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा
परिषदेत एक दिवसीय कार्यशाळा
आणि
· ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचं सांगली इथं निधन
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा आज थंडावल्या. या टप्प्यात परवा २६ तारखेला राज्यातल्या हिंगोली,
नांदेड, परभणी, बुलडाणा,
अमरावती, अकोला, वर्धा,
यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या
स्टार प्रचारकांची आपापल्या उमेदवारांच्या प्रचार सभा घेण्यासाठी लगबग सुरू असल्याचं
दिसून आलं. अमरावती इथं महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपाचे
ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. देशातून आरक्षण कधीही संपवलं
जाणार नसल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज अमरावती इथं आपल्या पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या
प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी देशात दडपशाहीचे
राजकारण सुरू असल्याची टीका केली.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची वर्धा जिल्ह्यात पुलगाव इथं महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ
सभा झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अमरावती इथं महाविकास आघाडीचे उमेदवार
बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ तर सोलापूर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती
शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ
शिंदे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर
यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री
पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे यांनी आज वाशीम इथं रोड शोमधे सहभाग घेतला. विद्यमान
खासदार भावना गवळी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे हिंगोलीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्यासाठी नांदेड
जिल्ह्यातल्या हदगाव इथं तर नांदेडचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी
भोकर इथं सभा घेतली.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या
उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री
तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना भाषण सुरू असतांना भोवळ आली. त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय
उपचार करण्यात आले, गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं,
त्यांनी ट्विट संदेशातून कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची
छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आज ८ उमेदवारांनी
आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलिल
यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन समाज पार्टीचे संजय उत्तमराव जगताप, रयत शेतकरी संघटनेचे जियाउल्ला अकबर शेख, रिपब्लिकन बहुजन
सेनेच्या पंचशीला बाबुलाल जाधव यांनी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे
वसंत संभाजी भालेराव यांच्यासह जे के जाधव, नितीन कुंडलिक घुगे,
संगीता गणेश जाधव या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
या मतदार संघात आतापर्यंत २८ उमेदवारांनी ४१ नामनिर्देशन पत्रं दाखल केली आहेत. दरम्यान,
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी उद्या अपक्ष म्हणून अर्ज
भरणार असल्याचं, जाहीर केलं आहे.
****
जालना मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार
कल्याण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॉँग्रेस पक्षाचे नेते
माजी मंत्री आमदार अमित देशमुख, कैलाश गोरंट्याल,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री राजेश टोपे आदी
नेते उपस्थित होते
या मतदार संघातून इतर सात उमेदवारांनीही
आज नामनिर्देशन पत्रं दाखल केली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालना
शहरातून प्रचार फेरी काढली. महापालिकेच्या मैदानावर एका सभेत ही फेरी विसर्जित झाली.
दरम्यान, जालना मतदार संघात आज एकूण १४ जणांनी २४ नामनिर्देशन
पत्रं खरेदी केले. आजपर्यंत १०२ जणांनी २३४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
****
बीड लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार
पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
नेते कृषीमंत्री धनंजय मुंडे, बीडच्या विद्यमान खासदार
डॉ प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, बीड इथून आज नऊ उमेदवारांनी १६ अर्ज घेतले आहेत.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण
यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या
आजच्या भागात आपण सांगली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात
वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथं आज भारतीय वायुसेनेचे
प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी भेट दिली. या वायुसेना डेपोला गेल्या ८
मार्च रोजी प्रेसीडेंट कलर्स सन्मान मिळाला आहे, त्याबद्दल
चौधरी यांनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी चौधरी यांनी या डेपोचा इतिहास सांगणाऱ्या आणि
महत्त्वाचे टप्पे दाखवणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी केली, आणि वायु
दलाच्या सैनिकांशी संवाद साधला. वायुसेना परिवार संघटनेच्या अध्यक्षा नीता चौधरी या
देखील यावेळी उपस्थित होत्या. सेना अधिकाऱ्यांच्या कुटूंबियांसाठी राबवण्यात येत असलेल्या
कल्याणकारी योजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आज छत्रपती
संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक
ग्रामपंचायतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळवावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाचं
ध्येय अंतर्गत नऊ संकल्पावर काम करत असणाऱ्या ४१ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसंच विस्तार अधिकारी या या कार्यशाळेला उपस्थित होते.
****
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच ठिकाणी
प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृती
फेरी काढण्यात आली, तसंच मानवी साखळी करण्यात आली. जिल्हाधिकारी
डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या उपक्रमांची सुरुवात केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना
मतदान करण्याबाबत जनजागृती पर शपथ देण्यात आली, तसच भित्तीपत्रक
प्रदर्शनही भरवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवा
होत असलेल्या मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहिमा राबवून मतदानाचा
हक्क बजावण्याच्या आवाहन मतदारांना केलं आहे. उन्हाचा पारा लक्षात घेता मतदान केंद्रावर
मतदारांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनी
आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन पापळकर यांनी केलं आहे.
नांदेड जिल्हा प्रशासनही लोकसभा निवडणुकीसाठी
सज्ज असून, सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी
यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या
पाण्याची, आवश्यकतेनुसार कुलरची तसंच प्रतिक्षालयाची व्यवस्था
करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी चाकाची खुर्ची तसंच रॅम्पची व्यवस्था करण्यात
आली असल्याचं, जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक वसंत
केशव पाटील यांचं आज निधन झालं, ते ७८ वर्षाचे होते त्यांना १९९६ साली 'दशद्वार ते सोपान' या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार
तर 'कंदीलाचा उजेड' या कथासंग्रहास महाराष्ट्र
राज्य उत्कृष्ट वाड:मय निर्मिती पुरस्कार मिळाला. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणी वरून
चिंतन, विविधा, साहित्य सौरभ अशा अनेक कार्यक्रमात
सहभाग घेतला होता. कवी, गझलकार आणि प्रसिद्ध वक्ता म्हणून ते
प्रसिद्ध होते.
****
यवतमाळ इथं एका अप्रिय घटनेप्रकरणी धुळे
इथं आज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आणि समस्त माळी समाज पंच मंडळाच्या वतीने निदर्शनं
करण्यात आली. संबंधित समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी, अशा मागणीचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
****
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये
लेव्ही म्हणजे हमालपट्टी कपात न करताच लिलाव घेण्याच्या वादामुळे येवला, पिंपळगाव बसवंत, नांदगाव आणि मनमाड या चार बाजार समित्यांमध्ये
लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल आणि माथाडी कामगार तसंच व्यापारी यांच्या वादात
शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई इथल्या जव्हेरी बाजार परिसरातून आज
महसूल गुप्तचर विभागाने नऊ किलो सोनं आणि १६ किलो चांदी हस्तगत केली. आफ्रिकेतून अवैध
मार्गानं आणलेल्या या सोनं-चांदी प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.
****
No comments:
Post a Comment