Friday, 26 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:26.04.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 April 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं सर्वत्र उत्साहात मतदान सुरु आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८ पूर्णांक ८३ टक्के मतदान झालं.

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ पूर्णांक १७, नांदेड - २० पूर्णांक ८५, तर हिंगोली मतदारसंघात ११ वजायेपर्यंत १८ पूर्णांक १९ टक्के मतदान झालं. वर्धा तसंच यवतमाळ - वाशिम मतदारसंघात १८ टक्के, तर अकोला, अमरावती आणि बुलडाणा मतदारसंघात सरासरी साडे सतरा टक्के मतदान झालं.

****

परभणी लोकसभा मतदार संघात २० वेगवेगळ्या ठिकाणच्या इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने त्या बदलण्यात आल्या. नांदेड इथं गुजराथी हायस्कूलमध्ये महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.

****

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मतदान केलं. अमरावती इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, अकोला इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील, नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत, हिंगोली मतदारसंघात खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, तर बुलडाणा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मतदान केलं.

वाशिम जिल्ह्यातल्या उमरा इथं अंध तरुणांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहाय्यकाच्या मदतीने मतदान केलं.

****

राज्यात आज होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होईल.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचाया कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. सर्व व्हीव्हीपॅट यंत्रांची मतदानानंतर चाचपणी करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळली आहे. यासंदर्भात आज निकाल देताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं, उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्रे सीलबंद करण्यात यावीत, असं सांगितलं. त्याशिवाय, निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण चाचपणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल. यानंतर तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकामार्फत ही तपासणी केली जाईल. यासाठी येणारा खर्च संबंधित उमेदवाराला उचलावा लागेल. जर ईव्हीएम मशीनशी छेडछाड केल्याचं निष्पन्न झालं, तर हा खर्च उमेदवाराला परत दिला जाईल, असं न्यायमूर्ती खन्ना यांनी दिलेल्या निर्देशांमध्ये नमूद केलं.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होईल.

दरम्यान, निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू होत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात आजपासून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे.

****

ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीचा एक भाग म्हणून ठाणे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातल्या शाळांमध्ये चुनाव पाठशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांनी रॅली तसंच चित्रकला, निबंधलेखन या सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार  ठिकाणी एअर बलुनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

****

राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातल्या बेलखेड इथल्या शेतकरी कुटुंबातल्या नीलकृष्ण गजरे याने देशातून पहिला क्रमांक मिळवला आहे.

****

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं काचिगुडा-हिसार - काचिगुडा विशेष गाडीच्या ३० जून पर्यंत एकूण १८ फेऱ्या मंजूर केल्या  आहेत. ही गाडी दर गुरुवारी काचिगुडा रेल्वे स्थानकावरून दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल आणि निझामाबाद, मुदखेड, हिंगोली, अकोला, जोधपुर, बिकानेरमार्गे हिसार इथं शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हिसार इथून दर रविवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि मंगळवारी सकाळी साडे सात वाजता काचिगुडा इथं पोहोचेल.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...