Sunday, 28 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:28.04.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 April 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय इतिहासात होऊन गेलेले राजे अत्याचारी होते. गरीबांचे शोषण करत होते, असे म्हणून काँग्रेसच्या राजपुत्राने छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूरची राणी चन्नम्मा आणि म्हैसूरच्या राजघराण्याचा अपमान केला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. कर्नाटकातील प्रचार दौऱ्यात आज मोदींची सभा बेळगाव इथं झाली. यावेळी काँग्रेसचे नेते तुष्टीकरणासाठी जाणीवपूर्वक अशी विधाने करतात आणि औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या पक्षांशी युती करतात, असेही ते यावेळी म्हणाले.

****

भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आरक्षण संपवायचे आहे, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनीही समाचार घेतला. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. राहुल गांधी खोटे बोलत आहेत. दलित, मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, संविधानाने दिलेल्या सर्व प्रकारच्या आरक्षणांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीपासून समर्थनच केले आहे. मात्र तरीही काही लोक खोटे व्हिडिओ पसरवून जनतेची दिशाभूल करतात, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथं विद्या भारती प्रशालेचं उद्घाटन आज भागवत यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

****

आघाडी सरकारमध्ये आम्ही कोणालाही पंतप्रधान बनवू, पण देश हुकूमशाहीच्या वाटेवर जाऊ देणार नाही, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. आज सकाळी पुणे इथं माध्यमांशी बोलताना त्यांनी विद्यमान सरकारवर टीका केली. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.

****

उत्तर प्रदेशातील प्रलंबित जागांसाठी लोकसभा उमेदवारांच्या नावांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचं, काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं काल केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसनं सात टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकांसाठी आतापर्यंत ३०८ उमेदवारांची घोषणा केली आहे.

दरम्यान, तेलंगणामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला समर्थन जाहीर केलं आहे. या संदर्भात काल दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी चर्चा करून, भोंगीर लोकसभा क्षेत्र वगळता, बाकी सर्व जागी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. 

****

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्व मतदार संघांतली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूममध्ये सीलबंद करण्यात आली आहेत. नांदेड इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात, तर परभणी इथं कृषी महाविद्यालयात या स्ट्राँग रूम उभारण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी आज सायकल फेरी काढण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, ंच सायकल संघटनेच्या सदस्यांसह, बीड शहरातल्या नागरिकांनी या सायकल फेरीत सहभाग नोंदवला. ही सायक्लोथॉन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथून सकाळी सात वाजता काढण्यात आली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर लाईनमार्गे शेवटी सामाजिक न्याय भवन इथं या फेरीची सांगता करण्यात आली.

****

अकोला लोकसभा मतदार संघात यंदा सरासरी ६१ पूर्णांक ७९ टक्के मतदान झालं. यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं. मतदानाच्या टक्केवारीत यंदा पुरुषांचं सरासरी प्रमाण ६४ पूर्णांक ८७ टक्के, तर महिलांचं सरासरी प्रमाण ५८ पूर्णांक ५० टक्के एवढं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज यानं काल मलेशियात झालेल्या १६ वर्षाखालील वयोगटासाठीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवलं. शंभर मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात त्यानं ५४ पूर्णांक ७१ शतांश सेकंदात हे अंतर पार करत सुवर्णपदक पटकावलं.

****

इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. यात पहिला सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांत होईल. अहमदाबाद इथं दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सन रायझर्स हैद्राबाद या संघांत होईल. संध्याकाळी साडे सात वाजता, चेन्नईच्या एम.. चिदंबरम क्रीडा संकुलात हा सामना खेळवला जाईल.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...