आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. या टप्प्यात परवा २६ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.
****
नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करणार नसल्याचं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ स्पष्ट केलं आहे. नाशिक इथं काल झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीकडे निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक पक्षात अनेक उमेदवार आहेत, त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार आपण करू असंही भुजबळ यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने काल चार पिस्तुल, दोन कट्टे, १८ काडतुसे आणि एक मॅगझीन असा तीन लाख ४० हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला. शस्त्र तस्करास अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
****
दिशाभूल करणार्या जाहिरातींबाबत आपण गंभीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. दिशाभूल करणार्या जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल पतंजली आयुर्वेदच्या प्रलंबित अवमान प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, इतर अनेक कंपन्यांच्या दिशाभूल करणार्या जाहिरातींकडे लक्ष वेधलं. न्यायालयानं याचिकाकर्त्या भारतीय वैद्यकीय संघाटनेला सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या अनैतिक पद्धतींच्या तक्रारींबाबतही सावध केलं आहे.
****
मध्यम श्रेणीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराचं काल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या प्रक्षेपणानं कमांडची परिचालन क्षमता सिद्ध केली असून, नवीन तंत्रज्ञानाचं प्रमाणीकरण केल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह गारपिट झाली. यामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. चिखली तालुक्यात शिरपूर इथं वीज अंगावर पडून एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. शेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने शासकीय वाहनांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
****
No comments:
Post a Comment