Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
उद्योजक राज कुंद्राच्या ९८ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालय ईडीनं आज टाच आणली. यात राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेल्या मुंबईतील जुहु परिसरातील सदनिका तसंच पुण्यातील बंगल्याचाही समावेश आहे. मनी लाँड्रींग कायद्यान्वये ईडीनं ही कारवाई केली आहे. मुंबई तसंच दिल्ली पोलिसांनी राज कुंद्रा याच्या विरोधात दाखल केलेल्या अनेक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून अवैध मार्गानं ६ हजार ६०० कोटी रुपये जमवले असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. राज कुंद्रानं युक्रेनहून २८५ बिटकॉईन्स देखील अवैध मार्गानं जमवलं असल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह राज्यातल्या एकूण अकरा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, या मतदारसंघांमध्ये आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज २५ एप्रिलपर्यंत भरता येणार असून २६ एप्रिलला अर्जांची छाननी होईल. २९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. या सर्व मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशातील एकूण १७ राज्यांमधल्या १०२ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. या पाच मतदारसंघांसह देशभरातील १०२ मतदारसंघातील प्रचार काल सायंकाळी पाच वाजता थांबला.
यासोबतच पहिल्या टप्प्यातल्या प्रमुख उमेदवारांमध्ये तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, द्रविड मुनेत्र कळघमचे नेते दयानिधी मारन, माजी केंद्रीय मंत्री ए. राजा, आणि तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह निवडणूक रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आसामच्या दिब्रुगड, तर काँग्रेस नेते गौरव गोगोई जोरहाटमधून निवडणूक लढवत आहेत. राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि काँग्रेसचे गोविंद राम मेघवाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. मतदार संघात २ हजार १३३ मतदान केंद्र असून मतदारांची संख्या १८ लाख २७ हजार आहे. त्यामध्ये नऊ लाख ९७ हजार मतदार भंडारा जिल्ह्यातील तर आठ लाख १० हजार मतदार गोंदिया जिल्ह्यातील आहेत.
****
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज आपली तेरावी यादी जाहीर केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची अकोला शहरात २१ एप्रिल रोजी जाहीर सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या समर्थनार्थ ही सभा होईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात होत असलेली राष्ट्रीय स्तरावरील ही पहिलीच सभा ठरणार आहे.
****
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार सघांतर्गंत येत असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आज आणि उद्या १९ तारखेला अशा दोन दिवशी वयोवृद्ध तसंच दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदान घेण्यात येणार आहे. गृहमतदानासाठी अर्ज केलेल्या अशा मतदारांनी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ८५ वर्षांवरील १९० मतदार आणि १९ दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन या कालावधीत पोस्टल बॅलेट पद्धतीनं मतदान घेतलं जाणार आहे.
****
जळगाव शहरातल्या मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागून दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर २५ हून अधिक कामगार भाजले. काल दुपारी ही घटना घडली. जखमींवर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
No comments:
Post a Comment