Friday, 19 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:19.04.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 19 April 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १९ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला प्रारंभ;राज्यातल्या नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि रामटेक या पाच मतदारसंघाचा समावेश   

·      चौथ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रियेला सुरूवात;औरंगाबाद इथं हर्षवर्धन जाधव यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल;तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

·      नांदेड जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन

आणि

·      छत्रपती संभाजीनगरचा पारा ४२ अंशांवर

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला प्रारंभ झाला आहे. या टप्प्यात १७ राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि रामटेक या पाच मतदारसंघात आज मतदान होत असून, एकूण ९७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आमगाव, आर्मोरी, गडचिरोली आणि अहेरी इथं, तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातल्या मोरगाव अर्जुनी इथं दुपारी तीन वाजेपर्यंत, तर इतर ठिकाणी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल. गडचिरोलीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, ड्रोनद्वारेही देखरेख ठेवली जात आहे.

****

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना काल जारी झाली. यामध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह, नंदूरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या राज्यातल्या एकूण अकरा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये कालपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली. चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारांना २५ एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरता येणार असून, २६ एप्रिलला अर्जांची छाननी होईल. २९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. या सर्व मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी काल ६० उमेदवारांनी ११८ अर्ज घेतले. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी काल अर्ज दाखल केला.

बीड लोकसभा मतदारसंघात ३९ उमेदवारांनी ९२ अर्ज घेतले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी उमेदवारांना अर्ज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

जालना लोकसभा मतदारसंघासाठी काल पहिल्या दिवशी ३४ जणांनी ९७ नामनिर्देशन पत्र घेतली. जालना आणि बीडसह शिर्डी, नंदुरबार, जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात काल एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

****

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात  राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल १७ जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा समावेश आहे.

लातूर इथं महायुतीचे उमेदवार भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यासह ११ जणांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.

****

सांगलीतून महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपचे संजय पाटील यांनी काल अर्ज भरला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काल १२ उमेदवारांनी १६, तर हातकणंगलेसाठी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्यासह १४ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले.

****

सातारा लोकसभा मतदार संघासाठी उदयनराजे भोसले यांनी काल भाजपच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी देखील काल अर्ज भरला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या वतीनं आपला अर्ज काल दाखल केला. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी, पुणे शहर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी, काल अर्ज दाखल केला.

****

महायुतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच लोकसभा मतदारसंघात महायुती-शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी देखील आपला दावा कायम ठेवला होत, मात्र त्यांनी माघार घेत असल्याचं काल जाहीर केलं. राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

वंचित बहुजन आघाडीनं शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते यांना, तर सातारा इथून प्रशांत कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

****


पंतप्रधान तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी वर्धा जिल्ह्यात तळेगाव इथं प्रचार सभा होणार आहे. महायुतीचे खासदार रामदास तडस तिसऱ्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मोदी यांची उद्या २० एप्रिलला नांदेड आणि परभणी इथं प्रचारसभा होणार आहे.

****

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काल पुण्यातल्या आपल्या निवासस्थानी मतदानाचा हक्क बजावला. ८५ वर्षावरील नागरिकांसाठी असलेल्या सुविधेनुसार प्रशासकीय यंत्रणेनं त्यांच्या घरी  मतदान नोंदवून घेतलं.

****

परभणी लोकसभा मतदार संघात दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांचं घरी जाऊन मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात २० आणि २१ एप्रिल रोजी तर जिंतूर, पाथरी, परतूर आणि घनसावंगी मतदार संघात दिलेल्या तारखेनुसार घरी जाऊन मतदान करुन घेण्यात येणार आहेत. या अंतर्गत जिल्ह्यात २३१ दिव्यांग, ८५ वर्षांवरील एक हजार ३९४ तर अत्यावश्यक सेवेतले चार असे एक हजार ६२९ मतदार टपाली मतदान नोंदवणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात पहिल्या दिवशी अनेक मतदारांनी टपाली मतदान प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद दिला. नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा क्षेत्रात काल ही मोहीम राबवण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यात मतदानाच्या जनजागृतीसाठी काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली देगलूर इथल्या इंडियन मेडिकल एसोसिएशन आणि निमा या डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृतीच्या कामात योगदान द्यावं, असं आवाहन करनवाल यांनी यावेळी केलं.

दरम्यान, करनवाल यांनी काल देगलूर महाविद्यालयाला भेट देऊन नवमतदार युवक-युवतींशी संवाद साधला. सुदृढ लोकशाहीसाठी मतदान हा महत्त्वाचा घटक असून नव मतदारांनी याचे साक्षीदार व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.

नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं आज निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.

****

देगलूर इथं स्वीप उपक्रमांतर्गत काल मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. धाराशीव तालुक्यातल्या सांजा गावात मतदार जनजागृती कार्यक्रमादरम्यान, देवदर्शनासाठी आलेल्या वधुवरांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.

****

आचारसंहितेच्या कालावधीत जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांत ९४ गुन्हे दाखल झाले असून, ७६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती जालना इथले उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी दिली.  

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहिता कक्षात गेल्या महिनाभरात १६३ तक्रारी सी- व्हिजिल ॲपद्वारे प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १४३ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आलं असून, या सर्व तक्रारींचं निराकरण करण्यात आलं आहे.

****

परभणी इथं निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल जिंतूर विधानसभा मतदार संघाला प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक विषयक कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिंतूर इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या स्टाँगरूमला भेट देवून पाहणी केली.

****

राज्यात काल मालेगाव इथं सर्वाधिक ४३ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक दोन, परभणी ४२ पूर्णांक पाच, बीड ४१ पूर्णांक सहा तर नांदेड इथं ४१ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व ५७ प्राथमिक शाळेत काल शाळा पूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. नारेगाव इथल्या शाळेत महापालिकाआयुक्त जी श्रीकांत यांनी बालवाडी मधल्या पात्र विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश करून या मेळाव्याचा शुभारंभ केला. पुढच्या वर्षी महानगरपालिकेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या येरमाळा इथल्या श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रा २२ ते २८ एप्रिल या कालावधीत साजरी होणार आहे. या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता २३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत प्रशासनाकडून बदल करण्यात आला आहे.

****

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची  गर्दी  लक्षात  घेवून  दक्षिण  मध्य  रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या ४० फेऱ्या मंजूर केल्या आहेत.

****

No comments: