Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये दोन हजार पाचशे पंन्नासाव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आणि टपाल तिकीटासह नाण्याचं अनावरण करण्यात आलं. जागतिक स्तरावर सध्याच्या युध्द्जन्य परिस्थितीत भारताच्या तिर्थंकरांची शिकवण अधिकच महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. विश्वशांतीसाठी जग भारताकडे अपेक्षेनं बघत आहे तसंच महावीर यांच्याविषयी युवा पीढीचं समर्पण बघता देश योग्य दिशेनं मार्गस्थ असल्याचा विश्वास वाटतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.
****
महावीर जयंती निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज जन्मकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
****
विद्यापीठ अनुदान आयोग-यु.जी.सी.च्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नेटच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. संस्थेच्या संकेतस्थळावर येत्या दहा मे पर्यंत ही नोंदणी आणि बारा मे पर्यंत शुल्क जमा करता येईल, असं युजीसीनं म्हटलं आहे. येत्या १६ जुन रोजी ही परीक्षा होणार असून संशोधन गौरववृत्ती, सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीसह विविध विषयांत विद्यावाचस्पती -पी.एच.डीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्वपुर्ण बैठक नवी दिल्ली इथं सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,कॉंग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांसह अन्य वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या, १८००-२२१-९५० या मतदार सहाय्यता खुल्या दूरध्वनी क्रमांकावर १८ एप्रिलपर्यंत ७ हजार ३१२ लोकांनी संपर्क केल्याची आणि त्यांना आवश्यक ती माहिती आणि मदत देण्यात आली आहे. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात यापैकी सर्वाधिक, म्हणजे १ हजार ५७५ दूरध्वनीची नोंद मुंबई उपनगरातून झाली आहे. या माध्यमातून मतदारांना हवी ती माहिती देण्यासाठी २४ तास मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड, हिंगोली लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेची युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. या मतदार संघामध्ये येत्या २६ तारखेला मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २ हजार ६२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कर्मचाऱ्यांचं दोन फेऱ्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यात आलं. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १०८ बस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचंही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितलं.
****
गुंतवणूकदारांची पाचशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत शोधमोहीम राबवली. ऑक्टा एफएक्स ट्रेडिंग अॅप आणि वेबसाइटवरून बेकायदा ऑनलाइन ट्रेडिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विविध कागदपत्रं, डिजीटल उपकरणं यात जप्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे पावणे तीन कोटी रुपये असलेली बँकखाती गोठवण्यात आली असून यामध्ये क्रिप्टोकरंसी तसंच सोन्याच्या नाण्यांसह ३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने रंगणार असून यातला पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चैलेंजर्स बंगळूरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. तर, दुसरा सामना पंजाब किंग्स आंणि गुजरात टायटन्स दरम्यान चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जणार आहे.
****
महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचं थकीत मानधन देण्याची मागणी कर्मचारी सभेतर्फे करण्यात आलं आहे. या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांसह महिला बालकल्याण मंत्र्यांकडे करण्यात आल्याचं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा विधिज्ञ निशा शिवूरकर यांनी एका निवेदनाद्वारे नमुद केलं आहे.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तसंच वीजा आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment