Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 April 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस
· दुसऱ्या टप्प्यात प्रचाराचे अखेरचे काही दिवस शिल्लक;प्रचार सभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग
· प्रचार गीतातून हिंदू धर्म तसंच जय भवानी शब्द वगळण्याची सूचना उद्धव ठाकरेंना अमान्य
आणि
· गेल्या दोन दिवसांत पावसाशी निगडित घटनांमध्ये विभागात पाच जणांचा मृत्यू
सविस्तर बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबादसह राज्यातल्या अकरा मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते. यापैकी ३१७ उमेदवारांचे अर्ज छाननी अंती वैध ठरले आहेत. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सात मे रोजी होणार आहे.
****
दरम्यान, निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणीसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशिम या आठ मतदार संघात, येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व मतदार संघांमध्ये प्रचार सभांना आता वेग आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव यांच्या प्रचारासाठी संग्रामपूर तालुक्यातल्या वरवट बकाल इथं सभा घेतली. मजबूत आणि स्थिर सरकार असल्यामुळे आपण ३७० कलम हटवू शकलो, तीन तलाक रद्द करू शकलो, असं सांगतानाच, २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी काल नांदेडचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी मुखेड इथं तर हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ हिंगोलीत सभा घेतली. विरोधकांकडे मतं मागण्यासाठी मुद्देच नसल्यानं, राज्यघटना बदलण्याबाबतचा अपप्रचार केला जात असल्याचं सांगत, काँग्रेसने आतापर्यंत ८० वेळा घटना बदलल्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं.
****
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव इथं सभा घेतली.
****
एमआयएम पक्षानं महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती तसंच जळगावचे उमेदवार उन्मेष पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे विद्यमान खासदार आणि उमेदवार इम्तियाज जलील यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
उद्या २३ एप्रिल रोजी आपण अमरावती इथं आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारासाठी जाणार असल्याचं, जलील यांनी सांगितलं. आपला पक्ष राज्यात लोकसभेच्या जास्तीत जास्ती पाच ते सहा जागा लढवणार असून, विधानसभा निवडणूक मात्र पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. आपण २४ तारखेला औरंगाबाद इथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही इम्तियाज जलील यांनी यावेळी दिली.
****
जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं काल रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी संबोधित केलं.
****
लातूर लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ काल अहमदपूर तालुक्यात हडोळती इथं जाहीर सभा झाली, या सभेत माजी मंत्री तथा काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी संबोधित केलं. भाजप नेते नरेंद्र मोदी हे परवा नांदेड इथं आले होते, मात्र या सभेत सामान्य माणसाच्या जीवनाबद्दल, तसंच शेतीमालाच्या हमीभावाबद्दल, शेतकरी कर्जमाफी, महागाई याबद्दल काहीही बोलले नसल्याची टीका देशमुख यांनी केली.
****
प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना मान्य नसल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच अमित शहा यांनी यापूर्वी निवडणूक प्रचारात केलेल्या कथित धार्मिक विधानांचा उल्लेख करत, याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे विचारणा तसंच स्मरणपत्र देऊनही आयोगानं यावर उत्तर दिलेलं नाही, असं ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना प्रचार गीतामध्येही 'जय भवानी' हा उल्लेख आला होता, तो देखील वगळण्याची सूचना निवडणूक आयोगाच्या समितीने केली होती. हा उल्लेख आणि इतर धार्मिक उल्लेख वगळून पुन्हा नवीन गीत सादर झाल्यावर त्याला मंजुरी देण्यात आली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा राज ठाकरे यांच्या मनसेने सादर केलेल्या काही जाहिरातींमध्येही विविध प्रकारच्या धार्मिक चिन्हांचा उल्लेख, तसंच चित्र वापरण्यात आले होते, ते देखील वगळण्याची सूचना आयोगाच्या समितीने केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, तसंच भरतनाट्यम नृत्यांगना डॉ पद्मा सुब्रह्मण्यम् यांना पद्मविभूषण, अभिनेता मिथुन चक्रवर्ती तसंच गायिका उषा उत्थुप यांना पद्मभूषण तर माजी राज्यपाल राम नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.
****
जैन धर्मियांचे चोविसावे तिर्थंकर वर्धमान भगवान महावीर यांची जयंती काल देशभरात विविध उपक्रमांनी साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं महावीर जयंतीनिमित्त क्रांती चौक-पैठण गेटमार्गे गुलमंडी अशी मिरवणूक काढण्यात आली. जैन बांधव या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले.
****
बालसाहित्य लिहिणाऱ्यांनी नव्या पिढीच्या संकल्पना समजून घेण्याबाबत जागरुक राहायला हवं, अशी अपेक्षा नामवंत कवी प्राध्यापक दासू वैद्य यांनी व्यक्त केली आहे. पैठण तालुक्यात बिडकीन इथं अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात ते बोलत होते. निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल दिवंगत सामाजिक कार्यकर्ते संजय उबाळे अर्थात बुद्धप्रिय कबीर यांच्या ५५ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित `कॉम्रेड, जयभीम` या काव्यात्मक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. डॉ. श्यामल गरूड यांनी या रचना केलेल्या आहेत. बुद्ध लेणी परिसरातल्या विहारामध्ये झालेल्या या प्रकाशनाला अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
गेल्या दोन दिवसांत विभागात पावसाशी निगडित घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं एका घराच्या पत्र्यावर सोलर हीटरची पाण्याची टाकी कोसळून एक चिमुकली दगावली, तर एका ४८ वर्षीय पुरुषाचा अंगावर शेड कोसळून मृत्यू झाला. नांदेड तसंच लातूर जिल्ह्यातही अंगावर वीज कोसळून तीन जण ठार झाल्याचं वृत्त आहे.
येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी इथं ४०, तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
****
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासकीय स्तरावरून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नांदेडमध्ये काल नवमतदार आणि शाळकरी खेळाडूंनी मतदान जनजागृती फेरी काढली, तसंच इतरही विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते `मतदान करणारचं` या `सेल्फी पॉइंट`चं यावेळी उद्घाटन करण्यात आलं.
****
लातूर जिल्हा प्रशासनातर्फे ‘स्वीप’ उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि लातूरच्या सायकल संघटनेतर्फे मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. ‘सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी’ असा संदेश याद्वारे देण्यात आला.
****
उस्मानाबाद मतदार संघात आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री प्रकरणी १४० गुन्हे दाखल केले आहेत. या अंतर्गत १२९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर धाराशिव शहरातल्या दोन परवानाधारक दारू विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
परभणी इथंही उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत २१ लाख रुपये किंमतीपेक्षा अधिक रकमेचा बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन करणारी नाव महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केली. या पथकाने लिंबाळा हुडी इथं शुक्रवारी रात्री टाकलेल्या छाप्यात रेती उत्खनन करणारी बोट, सेक्शन पाईप, लोखंडी पाईप, ड्रम इत्यादी साहित्य ताब्यात घेत, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेची २०२४ ते २०२९ ही पंचवार्षिक निवडणूक पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बर्दापूरकर यांची तर सचिव पदी कमलाकर चौसाळकर, यांची बिनविरोध निवड झाली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला. अन्य एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अटीतटीच्या सामन्यात एका धावेनं पराभव केला. आज या स्पर्धेत जयपूर इथं राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्स सोबत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment