आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२२ एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक वसुंधरा दिवस आज साजरा होत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. 'प्लॅनेट व्हर्सेस प्लॅस्टिक' ही या वर्षीची संकल्पना असून, प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या आणि त्याचे निसर्गावर होणारे हानिकारक परिणाम यावर केंद्रीभूत आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबादसह राज्यातल्या अकरा मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते यापैकी ३१७ उमेदवारांचे अर्ज छाननी अंती वैध ठरले आहेत. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सात मे रोजी होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये आंध्र प्रदेशमधल्या नऊ तर झारखंड मधल्या दोन उमेदवारांचा समावेश आहे.
****
राष्ट्रीय परीक्षा संस्था - एनटीएनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात, राष्ट्रीय पात्रता चाचणी, २०२४ साठीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. १० मे पर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे.
****
छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. जिल्ह्यातल्या भैरमगड भागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यावर जिल्हा राखीव रक्षक दलाने शोध मोहीम सुरू केली होती.
****
असम राइफल्सच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या सेवा सुलभ रीतीनं मिळाव्या यासाठी देशातलया ३५ व्या आणि राज्यातल्या पहिल्या माजी सैनिक संघ केंद्राचं उद्घाटन आसाम रायफलचे महानिर्देशक लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्र नायर यांच्या हस्ते नाशिक इथं करण्यात आलं. यावेळी आसाम रायफल्स च्या माजी सैनिक आणि कुटुंबीयांच्या मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर केली.
****
भारताचा युवा बुद्धिबळपटू डी.गुकेश यानं कँडीडेट बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे.
****
No comments:
Post a Comment