Thursday, 23 May 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 May 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना 

·      २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख १० हजार ८७४ कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्यास रिझर्व्ह बँकेची मंजुरी

·      कोरोना विषाणूच्या केपी २ या नवीन उपप्रकाराचे पुण्यात सर्वाधिक ५१ रुग्ण

      आणि

·      बीड जिल्ह्याच्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई तालुक्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर

****

लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची सूचना, केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षानं परस्परांविरोधात दाखल केलेल्या तक्रारींच्या संदर्भात आयोगानं दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आचारसंहिता भंग होईल, अशी विधानं कोणी करू नयेत, यासाठी आपल्या पक्षांच्या प्रचारकांसाठी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश, आयोगानं या पत्रात दिले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी परवा २५ मे रोजी देशभरातल्या आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५८ मतदार संघात मतदान होत आहे. या सर्व मतदार संघातला प्रचार आज सायंकाळी संपणार आहे.

****

२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख १० हजार ८७४ कोटी रुपये अतिरिक्त निधी द्यायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय राखीव निधी साडेसहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णयही बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेतला आहे.

****

पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला काल बालहक्क न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्याच्यावर दारू पिऊन कार चालवल्या बद्दल कलम १८५ अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, संबंधित बारचे चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर अशा तिघांना काल सत्र न्यायालयानं २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, गंभीर गुन्ह्यातून अल्पवयीन आरोपींची सुटका होण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी, ही वयोमर्यादा १६ वर्षे करावी अशी मागणी, महाराष्ट्र पोलीस मित्र सघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

****

कोरोना विषाणूच्या केपी टू या नवीन उपप्रकाराचे सर्वाधिक ५१ रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. हा जे एन वन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. सध्याच्या रूग्णांच्या नमुन्याचं जिनोम सिक्वेन्सिकग केलं असता, ७० टक्के नमुने केपी टू पॉझिटिव्ह आढळून आले ओहत. कोरोना विषाणूच्या संसंर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाही या नव्या उपप्रकाराचा संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती या विभागाचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे दोन नवे रुग्ण आढळून आले असून, त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

****

बुद्ध पौर्णिमा आज साजरी होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांची अहिंसा, शांती आणि करुणेची शिकवण पूर्वीइतकीच आजही प्रासंगिक असल्याचं, राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

नागपूर इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमानं दीक्षाभूमीवर आयोजित तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यात शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा दिली जाईल, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष  भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली आहे.

****

मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले.  यंदाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार', कर्नल सचिन अण्णाराव निंबाळकर यांना घोषित झाला आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कारासाठी, भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीचे डॉ. सुहास जोशी यांची निवड झाली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार' अभिनेता रणदीप हुड्डा यांना, तर 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार' यंदा विद्याधर जयराम नारगोळकर यांना घोषित झाला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत विकास कामांच्या प्रकरणात फौजदारी कारवाईसंदर्भात, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निर्देश दिले आहेत. अशा प्रकारात सामील विकासक, त्यांना मदत करणारे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही आवश्यक असल्याचं, त्यांनी याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ, तर बीड, गेवराई, शिरुर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातल्या महसुली मंडळांमध्ये, दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या भागांना विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली.

****

 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४३ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली. पाणी तसंच चारा टंचाई भासणाऱ्या गावांनी संबंधित तहसीलदार कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एकूण ६७८ टँकरद्वारे जवळजवळ ४१२ गावं आणि ६१ वाड्या यांना ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरु आहे. जवळजवळ २८५ गावांसाठी ३४६ विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे. या सर्व सुविधेनंतरही काही गावांमध्ये पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसांमध्ये तहसीलदाराकडे एक रितसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा. वस्तुस्थितीदर्शक तो अहवाल किंवा मागणी असली पाहिजे. कुठलाही नागरिक, कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्यावाचून वंचीत राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतो आहोत.

****

उजनी जलाशयात पाणीसाठा नसल्यानं धाराशिव शहराला पुढील काही दिवस नऊ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्याच्या पावसाळी वातवरणामुळे शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरण मार्फत होणारा विद्युतपुरवठा खंडित होत असल्यानं देखील, नियमित पाणी पुरवठा करण्यास अडचण येत असल्याचं, प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन, उजनी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यामध्ये टंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकार दिले असून, कुठेही टंचाई असेल तर नागरिकांनी थेट संपर्क साधण्याचं  आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभगानं काल केलेल्या दोन कारवायांमध्ये एका कार्यकारी अभियंत्यासह २ खाजगी अभियंत्यांना लाच घेताना जेरबंद केलं, तर एक नगर रचनाकार फरार झाला.

बीड जिल्ह्यात अकृषिक परवान्याच्या पोर्टलवर आलेल्या ऑनलाईन प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी प्रभारी नगर रचनाकार प्रशांत डोंगरे यानं ३० हजार रुपयाची लाच मागितली होती. मदतनीस शेख निहाल शेख अब्दुल गनी आणि खासगी अभियंता निलेश पवार यांना ही लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आलं. मात्र डोंगरे हा फरार झाला.

अन्य एका कारवाईत परळी वैजनाथ पाटबंधारे विभाग वर्ग एक चा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याला २८ हजार रुपयांची लाच घेताना काल सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली. चिंचोटी तलावातला गाळ आणि माती काढून सात शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याची परवानगी मिळण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती.

****

जालना जिल्ह्यातल्या मंठा इथल्या पंचायत समितीमधल्या एका कंत्राटी अभियंत्याला गाय गोठ्याच्या बांधकाम अनुदानाची रक्कम देण्याकरता पाच हजार रुपये लाच घेताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. महेश बोराडे असं या अभियंत्याचं नाव आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात रॉजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा चार गडी राखून पराभव केला. या स्पर्धेचा दुसरा क्वालिफायर सामना उद्या शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि सनाराईजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत खेळेल.

****

जपानच्या कोबे इथं सुरु असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक प्रकारात भारताच्या सचिन खिलारीनं सुवर्ण पदक पटकावलं. सचिननं पुरुषांच्या एफ ४६ प्रकारात १६ पूर्णांक ३० मीटर गोळा फेकत, नवीन विक्रम प्रस्थापित केला.

****

 

 

 

 

हवामान

विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड ४३ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथं ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments: