Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात येत्या एक जून रोजी मतदान होणार असून, या टप्प्यासाठीचा प्रचार उद्या संपेल. या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.
भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रचारसभा होत आहेत. आज सकाळी पश्चिम बंगालमधल्या मथुरापुर इथं त्यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज ओदिशात प्रचार करत आहेत.
****
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली. या टप्प्यात ५८ मतदारसंघांमध्ये ६३ पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झालं असून, महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा तीन टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती आयोगानं दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० तारखेला कन्याकुमारी इथं स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. उद्या संध्याकाळपासून एक जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान इथल्या ध्यान मंडपात ध्यानधारणा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्तीसगढमधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवादी मारले गेले. आज सकाळी बद्देपाडाच्या जंगलात ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही हत्यारं जप्त केली आहेत.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामिन सात दिवस वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे केजरीवाल यांना दोन जून रोजी न्यायालयासमोर हजार रहावं लागणार आहे. आरोग्याचं कारण सांगून केजरीवाल यांनी जामिन वाढवून देण्याची मागणी केली होती.
****
मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
****
पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात असून, राज्याच्या गृहखात्याने शहराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या ट्विट संदेशात सुळे यांनी, कल्याणीनगर कार अपघात प्रकरणानंतर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित उपस्थित झाल्याचं म्हटलं आहे.
****
सरकारी योजनांचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा, या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी गावांसाठी अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पांढरकवडा इथल्या आदिवासी विकास प्रकल्पातर्फे सरकारी योजनांची माहिती आणि त्याच्या लाभापासून वंचित असलेल्या ४०० आदिवासी गावांतल्या सरपंचांना क्यूआर कोर्ड असलेलं पोस्टकार्ड पाठवलं आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रकल्प कार्यालयाचं संकेत स्थळ उघडलं जाऊन आदिवासी विकास विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे. या योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत द्यावी आणि त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केलं आहे.
****
नंदूरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात दोन ठिकाणी धडक कारवाईत कृषी विभागानं प्रतिबंधीत तीन लाखांचे बोगस बियाणे जप्त केले. शहादा शहरासह तालुक्यातल्या अनरद इथं, प्रतिबंधित एच टी बी टी बोगस कापुस बियाण्यांची छुप्या पद्धतीनं विक्री होत असल्याची माहीती कृषी विभागाला मिळाल्यानंतर, छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाईत वाहनासह जवळपास तीन लाखांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
देशात अनेक भागात उष्णतेची भीषण लाट कायम आहे. राजस्थानातल्या चुरु इथं काल कमाल तापमान ५० पूर्णांक ५ अंश सेल्सिअस इतकं होतं. ते देशातलं आत्तापर्यंतचं सर्वाधिक तापमान आहे. दिल्लीतल्या मंगेशपूर इथं ४९ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागानं दिल्लीत उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भातही उष्णतेची लाट कायम असून, ब्रम्हपुरी, चंद्रपूर इथं ४५, तर गोंदिया नागपूर इथं सरासरी ४४ अंश सेल्सिअस तापमान आहे.
****
दरम्यान, रेमाल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे मिझोराममध्ये २८, आसाममध्ये तीन आणि मेघालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment