Monday, 27 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.05.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 May 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार

·      शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देण्याची आवश्यकता राज्यपालांकडून व्यक्त

·      राज्यातील सर्व अकृषक वीज ग्राहकांचे वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर लावण्यात येणार

·      बीड जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत ८२ हजारावर कुणबी-मराठा प्रमाणपत्रांचं वाटप

आणि

·      आय पी एल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स अजिंक्य तर आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेत दीपा कर्माकरला सुवर्णपदक 

सविस्तर बातम्या

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणारा हा निकाल, दुपाी एक वाजेनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या सहा अधिकृत संकेतस्‍थळांवर पाहता येईल, असं राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे. गुणपडताळणीसह गुणपत्रिका छायाप्रतींसाठी २८ मे पासून ११ जूनपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावरच ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

****

शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देण्याची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतल्या रामकृष्ण मठ आणि मिशनच्या शताब्दी वर्षाची काल मुंबईत वांद्रे इथं सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते. विविध आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणारे रुग्ण तसंच त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेले 'माँ शारदा भवन' उभारल्याबद्दल मिशनचे कौतुक करून राज्यपाल बैस यांनी समाधान व्यक्त केलं. रामकृष्ण मिशनने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणार असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जे. एम. अभ्यंकर यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे.

****

दिग्दर्शक पायल कापडीया यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट' या चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात ग्रॅण्ड पिक्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावत इतिहास घडवला आहे. हा चित्रपट गेल्या गुरुवारी या महोत्सवात दाखवण्यात आला. गेल्या तीस वर्षाच्या कान चित्रपट महोत्सवात मुख्य स्पर्धेत दाखल झालेला त्याचप्रमाणे कोणत्याही भारतीय महिला दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आहे.

प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर संतोष सिवान यांना या महोत्सवात पिएर अँजेन्यू ट्रिब्यूट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच आशियाई व्यक्ती आहेत. यंदा या महोत्सवात भारतीय कलाकारानं मिळवलेला हा चौथा पुरस्कार आहे. चिदानंद नाईक यांना 'सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटासाठी तसंच अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता यांना द शेमलेस या चित्रपटातल्या भूमिकेसाठी यापूर्वीच पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे..

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

राज्यातील सर्व अकृषक वीज ग्राहकांचे सध्याचे वीजमीटर बदलून लवकरच स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. राज्यात कृषिपंपांच्या वीजजोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील दोन कोटी ४१ लाख वीजग्राहकांकडं हे स्मार्ट मीटर मोफत लावण्यात येणार आहे. यामुळं सध्याच्या पारंपरिक मीटरचे रीडिंग घेणं, वीजबिल तयार करणं आणि ते वितरीत करणं बंद होणार आहे. रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइनचे सर्व पर्याय खुले राहतील. मीटर रिचार्ज केल्यानंतर वीजपुरवठा सुरु होईल. यामुळे ग्राहकसेवा आणखी तत्पर होणार असल्याचं, महावितरणनं कळवलं आहे.

****

बीड जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत ८२ हजार ५४५ कुणबी, मराठा- कुणबी आणि कुणबी-मराठा या जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. या प्रमाणपत्रांसाठी दाखल तीन हजार ६६८ अर्जांवर काम सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

छत्रपती संभाजीनगर इथं भरडधान्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंबा आणि भरड धान्य महोत्सवाचा काल समारोप झाला. छत्रपती संभाजीनगर अथल्या जागरूक नागरिक मंच च्या वतीने महोत्सवात भरड धान्या विषयी जनजागृती करण्यात आली. मंचाचे सदस्य चंद्रकांत वाजपेयी यांनी नागरिकांना दररोजच्या आहारात भरड धान्याचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

मिलेटस्‌ - श्रीअन्न अर्थात भरडधान्य हे भविष्याचं धान्य आहे. कारण पावसाळा, उन्हाळा, तापमान वगैरे हे सगळं सहन करण्याची शक्ती ही गहू-तांदुळाच्या रूपामध्ये नसून ही भरडधान्याच्या ज्वार, बाजरी वगैरे रोग प्रतिरोधक धान्य आहे. संपूर्ण समाजाला देशाला आवाहन करतो आम्ही, की आपण नागरिकांनी दररोज आपल्या आहारात मिलेटस्‌चा उपयोग करावा.

****

इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स अजिंक्य ठरला आहे. काल चेन्नईत झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता संघाने सनरायझर्स हैदराबादचा ८ आठ गडी राखून पराभव केला. हैदराबाद संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं ११४ धावांचं आव्हान कोलकाता संघाने अकराव्या षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज साध्य केलं.

तीन षटकांत चौदा धावा देत, दोन बळी घेणारा मायकल स्टार्क सामनावीर ठरला. वेस्टइंडीजचा सुनील नारायण मालिकावीर पुरस्काराचा, विराट कोहली ऑरेंज कॅपचा तर हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी ठरला.

****

आशियाई अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारताच्या दीपा कर्माकर हिने सुवर्णपदक पटकावलं आहे.  अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे.

****

मलेशियन मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूला चीनच्या वांग-झी-यी हिच्याकडून पराभव पत्करत, उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. क्वालालंपूर इथं काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूनं पहिला गेम २१-१६ अशा फरकानं जिंकला, मात्र वांग हिनं पुढचे दोन्हीही गेम्स ५-२१, १६-२१ अशा फरकानं जिंकत, अजिंक्यपद पटकावलं.

****

लातूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील धानारी इथल्या तावरजा मध्यम प्रकल्पातील गाळ उपसाच्या कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नाम फाऊंडेशनच्या सहकार्यातून हा गाळ उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या जवळपास ५२ जलस्रोतातून गाळ उपसा केला जात असून, पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन तलाव गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.

****

जालना औद्योगिक वसाहतीत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम, गॅस कटरच्या सहाय्यानं कापून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवल्याची घटना काल निदर्शनास आली. या एटीएममधले सुमारे आठ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचा पोलीस सूत्रांचा अंदाज आहे.

****

हिंगोलीचे माजी आमदार दगडूजी गलांडे यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सेनगाव तालुक्यात बाभुळगाव इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी इथं वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले. काल सकाळी ही घटना घडली. मोईन  शेख आणि नवीन संग्राम पवार अशी मृतांची नावं आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल दोन शेतकऱ्यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. चाकूर तालुक्यात महाळंगी इथं काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

****

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तसंच केज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मोठं नुकसान झालं आहे. केज बसस्थानकातील मोठे फलक, तसंच झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, काही घरांवरील पत्रे उडाले तर वीज वाहक तारांचे काही खांबही या वादळात जमीनदोस्त झाले,

अंबाजोगाई तालुक्यात पूस इथं एका मंदिराची सिमेंटची कमान पडून एका चारचाकी गाडीचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

****

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरानजीक धावत्या एसटी बसवर एका हॉटेलचं पत्र्याचं शेड तुटून आदळलं, या अपघातात मात्र एस टी बसचं नुकसान झालं, मात्र सुदैवाने प्रवाशांना काही इजा झाली नाही. जिल्ह्यात वीज कोसळून एका मुलाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

****

नैऋत्य मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरावरून वाटचाल सुरू आहे. या दरम्यान, रेमल चक्रीवादळ काल रात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागात धडकलं, यामुळे कोलकातासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात काल यवतमाळ इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४४, नांदेड ४३ पूर्णांक सहा, बीड ४२, तर छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक आठ तर धाराशिव इथं काल ३९ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

बीड जिल्ह्यात सध्या ४३३ टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. बीड तालुक्यात १४० तर गेवराई तालुक्यात ११५ टँकरनं सुरू आहेत. जिल्ह्यातील ६६५ खासगी विहिरी प्रशासनानं पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित केले आहेत.

****

दिवंगत केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काल लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथं विलास बागेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर इथंही गांधी भवनात देशमुख यांना अभिवादन करण्यात आलं.

****

परभणी इथल्या संबोधी अकादमीच्या वतीनं तेवीसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात ६२ जोडपी विवाहबद्ध झाली. खासदार फौजिया खान यांनी या सोहळ्याला हजेरी लावत नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात रेल्वेचा रोलिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड रायचूर ही गाडी येत्या ३० जूनपर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान, तर रायचूर परभणी ही गाडी  येत्या एक जुलैपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत या दोन्ही गाड्या अनुक्रमे तांडूर ते नांदेड तसंच तांडूर ते परभणी दरम्यान धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...