Saturday, 25 May 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.05.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 May 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ मे २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर होणार

·      लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवरांचं भवितव्य मतयंत्रात बंद

·      दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह दिग्गजांनी बजावलं मतदानाचं कर्तव्य

आणि

·      मलेशिया मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पी.व्ही सिंधूचा प्रवेश

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर, लातुर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांनी मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल जाहीर केलेल्या अधिकृत सहा संकेतस्‍थळावर पाहता येईल असं राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्‍प्‍यातील ८ राज्यांमध्ये ५८ जागांसाठी आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झालं. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार आणि जम्मू काश्मीरमधील एका मतदारसंघाचा समावेश आहे. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठीही आज मतदान पार पडलं. हरयाणातील कर्नाल आणि उत्तरप्रदेशातल्या गैनसरी या विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक घेण्यात आली.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहर लाल खट्टर, संबित पात्रा, मनोज तिवारी आणि काँग्रेसचे दीपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर, कन्हैय्या कुमार, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्यासह अनेकांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.

सहाव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५७.७० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुमारे ७७.९९ टक्के, उत्तर प्रदेश ५२.०२, झारखंड ६१.४१, बिहार ५२.२४, जम्मू काश्मिर ५१.३५, दिल्ली ५३.७३, हरियाणा ५५.९३ तर ओडिशामध्ये ५०.६० टक्‍के मतदान झालं आहे.

****

राजधानी दिल्लीमध्ये अनेक मान्यवरांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्ली राज्य सरकारमधल्या मंत्री आतिशी यांनी आज मतदान केलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मंत्री हरदीप पुरी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, गृह सचिव अजय भल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी, काँग्रेसचे उदित राज, कन्हैय्या कुमार यांनीही मतदानाचा अधिकार बजावला.

****

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातही आज मतदान होत आहे. दरम्यान, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी बिजबेहरामध्ये धरणे दिले. पीडीपी कार्यकर्त्यांच्या आणि पोलिंग एजंटच्या अटकेविरोधात त्यांनी हे आंदोलन केलं आहे. मेहबुबा या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात आहेत. अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमधील इतर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री कोणतेही कारण नसताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिंग एजंटना अटक करण्यात आल्याचा आरोप पीडीपी अध्यक्षांनी केला.

****

मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईची आज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ड. आशिष शेलार यांनी पाहणी केली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातली नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

छत्तीसगडच्या बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं असून, प्रशासनाकडून मृतांची अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. या स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असून, त्‍यांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचं दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. असे व्हिडिओ राज्यातील लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.

****

बीड लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजे १३ मे रोजी पार पडली. याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने मतमोजणीच्या कामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, याचा आढावा दररोज घेतला जात आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे. सकाळी ८ पासून पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या कामी जवळपास हजारो कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.

****

विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव पेंढारकर यांच्या पार्थिवावर नागपूर इंथल्या अंबाझरी घाट येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विको समूहाचे कर्मचारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांसह नागपूरमधील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल ८५ व्या वर्षी त्यांचं नागपुरात निधन झालं होतं.

****

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफण-२०२४ या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूनर्लागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेचे उद्घाटन आज भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी.आर. मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं. तिफण या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नविन स्वयंचलीत यंत्रांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत आहे. ही स्पर्धा म्हणजे देशामधील कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन मेहता यांनी केले.

****

अहमदनगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी आणि सुपा परिसरात आज प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं राबविण्यात येत असू, छोट्या व्यावसायिकांना जाणीपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप माजी आमदार निलेश लंके यांनी केला आहे. तसेच आदर्श आचारसंहिता असताना पालकमंत्र्यांनी प्रशासनाची बेकायदेशीररित्या बैठक घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

****

केदारनाथमध्ये काल झालेल्या हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर केस्ट्रेल एव्हिएशन कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक विभागानं तपास पूर्ण होईपर्यंत केदारनाथ घाटीमध्ये कंपनीच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण होणार नसल्याचं बंदी आदेशात म्हटलं आहे.

****

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकत्ता हायकोर्टाचा अवमान केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलतर्फे आज निषेध करण्यात आला. कोलकत्ता उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दिलेले हजारो दाखले रद्द करण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान करत या निर्णयाचा विरोध केला, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला.

****

धुळे जिल्हा पोलिसांनी १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या वाईन शॉपवर कारवाई सुरु केली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धुळे शहरातील परवाना धारक मद्य विक्रेत्यांवर लक्ष ठेवून अल्पवयीन मुलांना दारु विक्री करणाऱ्या दोन वाईन शॉपवर आज गुन्हे दाखल केले आहेत.

****

भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ४ पूर्णांक ५४९ अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवत ६४८ पूर्णांक ७ अब्ज डॉलर्सच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर झेप घेतली आहे. परकीय चलनातल्या वाढीचा हा सलग तिसरा आठवडा आहे.

****

क्‍वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिटन स्पर्धेत भारताची ऑलिंपिक विजेती खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा १३-२१, २१-१६, २१-१२ अशा फरकानं पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तिचा सामना चीनच्या झी-यी -यांग हिच्याशी उद्या होणार आहे.

****

आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर उद्या सायंकाळी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात हा सामना होणार आहे.

****

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर यवतमाळ शहरात वाहतूक पोलिसांनी सुसाट गाड्या चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दररोज दोन ड्राईव्ह पोलिस घेत आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात दुचाकी, चारचाकी वाहने देण्याचे प्रमाण वाढले आहे.

****

No comments: