Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ५७ मतदारसंघांत येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीतल्या सर्व टप्प्यातल्या मतदानाची चार जून रोजी मोजणी होईल.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बिहार आणि पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आज हिमाचल प्रदेशमध्ये, तर प्रियंका गांधी पंजाब आणि चंदीगडमध्ये निवडणूक प्रचार करणार आहेत.
****
उत्तर प्रदेशातल्या शाहजहांपूर जिल्ह्यात बसचा अपघात होऊन ११ यात्रेकरू ठार, तर १० जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. हे सर्व यात्रेकरू सीतापूर इथून उत्तराखंडला जात होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
केदारनाथ, बदरीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या पवित्र चार धाम यात्रेसाठी देशभरातून भाविक उत्तराखंडमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, या वर्षी यात्रा सुरू झाल्यापासून गेल्या १६ दिवसांत ५६ भाविकांचा वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये २७ जणांचं केदारनाथ मार्गावर असताना निधन झालं, तर बदरीनाथ इथं १४, यमुनोत्रीला १२ आणि गंगोत्रीमध्ये तीन यात्रेकरू मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे.
मृतांमध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून, हिमालयाच्या या उंचावरील भागांमध्ये यात्रा किंवा पर्यटनासाठी येणाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन उत्तराखंडच्या आरोग्य विभागानं केलं आहे. राज्यानं यात्रेकरूंसाठी आरोग्य नियमावली जाहीर केली असून, त्यात अपात्र ठरणाऱ्यांना यात्रेसाठी न पाठवण्याचं आवाहन केलं आहे.
****
प्राप्तीकर विभागानं देशभरात २० ते २५ ठिकाणी धडक कारवाई करत छापे टाकले आहेत. यात नाशिकमधल्या एका सराफा व्यावसायिकावर काल टाकलेल्या धाडीत २६ कोटी रूपये रोख रकमेसह ९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याचं वृत्त आहे. ही कारवाई नाशिक, नागपूर आणि जळगाव इथल्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली. जप्त केलेली रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल १४ तास लागले. सलग ३० तास ही कारवाई सुरू होती, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला देशात अग्रेसर बनवणारं ठरेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. संबंधित पुनर्विलोकन समितीचा अहवाल कार्याध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी काल मुनगंटीवार यांना मुंबई इथं सुपूर्द केला, त्यावेळी ते बोलत होते.
****
चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव गणनेची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगानं २३ मे रोजी बुद्धपौर्णिमेला निसर्गानुभव उपक्रम पार पडला. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये देशभरातील निसर्गप्रेमींनी यात उत्साहानं सहभाग घेतला होता.
प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात मिळून ५५ वाघ, १७ बिबटे, ८६ रानकुत्री, ६५ अस्वलं, एक हजार ४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ गवे अशा एकूण ५ हजार ६९ मांसभक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली.
यासाठी बफर क्षेत्रातील एकूण ६ वनपरिक्षेत्रांत ७९ मचाणं उभारली होती आणि या मचाणांवर एकूण १६० निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांच्या सोबत बसून प्राणीगणना केली.
****
राज्य माध्यमिक - उच्च माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. मंडळाच्या विविध संकेतस्थळांवर निकाल बघता येईल. गुणपडताळणीसह गुणपत्रिका छायाप्रतींसाठी परवा २८ मे पासून ११ जूनपर्यंत संकेतस्थळावरच ऑनलाइन पद्धतीनं अर्ज सादर करता येईल. तर यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये आयोजित पुरवणी परीक्षेसाठी ३१ मे पासून संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येईल.
****
जळगाव विमानतळावरून उद्यापासून पुण्यासाठी विमानसेवा सुरू होत आहे. ‘फ्लॉय ९१’ या विमान कंपनीनं ही सेवा सुरू केली आहे. उद्यापासून २६ ऑक्टोबरदरम्यान गोवा-जळगाव-पुणे या विमानसेवेचं वेळापत्रक तयार करून तिकीट आरक्षणाला सुरुवात झाली आहे. यात गोवा-जळगाव-गोवा सेवा दररोज, तर पुणे-जळगाव-पुणे ही सेवा आठवड्यातल्या मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी उपलब्ध राहील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मलेशियाच्या क्वालालंपूर इथं आयोजित मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत, आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधूची चीनच्या झी-यी-वँग सोबत लढत सुरू आहे. दुपारी सव्वाबारा वाजता सामन्याला सुरुवात झाली. ताजं वृत्त हाती आलं, तेव्हा सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधु २०, वँग १६ अशी स्थिती आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या १७ व्या हंगामाचा अंतिम सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांदरम्यान होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment