Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
· राजधानी दिल्लीत आज देशभरातल्या सर्वोच्च ५२ पूर्णांक तीन दशांश
सेल्सियस तापमानाची नोंद
· रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतल्या २० विद्यार्थ्यांची अमेरिकेत
नासा अभ्याससहलीसाठी निवड
· काँग्रेसकडून राज्याचा दुष्काळ पाहणी दौरा जाहीर-३१ मे रोजी
छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ
आणि
· वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं
शेतीसाठी ड्रोन द्वारे फवारणी अभियान
****
राजधानी दिल्लीत आज देशभरातल्या सर्वोच्च
५२ पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिल्लीतल्या मुंगेशपूर भागात
आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान हे तापमान नोंदवलं गेल्याचं, वृत्त
आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना
यांनी, उष्णतेची लाट लक्षात घेता बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दुपारी
१२ ते ३ या वेळेत,
पगारी रजा देण्याचे आदेश दिले आहेत. बस स्थानक, बस
थांबे, आणि सार्वजनिक ठिकाणी,
पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी तसंच रस्त्यावरील उष्णता
कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात यावेत, असे निर्देश ही सक्सेना यांनी
दिले आहेत.
दरम्यान, वाढत्या तापमानाच्या
पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नागरिकांना उष्माघातापासून
बचावासाठी पाणी तसंच द्रवपदार्थांचं अधिक सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. आवश्यक नसल्यास
नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहनही मांडवीय यांनी केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा
प्रचार उद्या संपेल. या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ मतदारसंघांसाठी
येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला
आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या
शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर
केली. या टप्प्यात ५८ मतदारसंघांमध्ये ६३ पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झाल्याची माहिती
आयोगानं दिली आहे.
****
चालू लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्य
निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी मतदारांना चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास
न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. "लोकांच्या विविध शंकांचं समर्थन
करण्यासाठी,
निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात
आली आहेत. त्या तपशीलाचा तसंच आयोगानं वेळोवेळी जारी केलेल्या पत्रकांचा आढावा घेवून
मतदारांनी नि:संशय रहावं",
असं त्यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० तारखेला
कन्याकुमारी इथं स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. उद्या संध्याकाळपासून
एक जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान इथल्या ध्यान मंडपात ध्यानधारणा करणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची
अंतरिम जामीन सात दिवस वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका
सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना दोन जून रोजी न्यायालयासमोर
हजार रहावं लागणार आहे. आरोग्याचं कारण सांगून केजरीवाल यांनी जामीन वाढवून देण्याची मागणी केली होती.
****
छत्तीसगढमधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा
बलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवादी मारले गेले. आज सकाळी बद्देपाडाच्या
जंगलात ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं.
पोलिसांनी घटनास्थळावरुन काही हत्यारं जप्त केली आहेत.
****
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या
२० विद्यार्थ्यांची अमेरिकेतल्या नासा या संस्थेच्या अभ्याससहलीसाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेने तीन परीक्षांच्या माध्यमातून २३ हजार विद्यार्थ्यांमधून या विद्यार्थ्यांची
निवड केली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य
कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज या
विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला आणि शुभेच्छा देऊन मार्गदर्शन
केलं.
****
काँग्रेस पक्षानं राज्याचा दुष्काळ पाहणी
दौरा जाहीर केला असून,
परवा ३१ मे पासून या दौऱ्याला सुरुवात होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दौऱ्यात प्रत्येक विभागाची
पाहणी करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं जाईल, अशी
माहिती पटोले यांनी दिली. ३१ तारखेपासून छत्रपती संभाजीनगरपासून या दौऱ्याला प्रारंभ
होणार आहे. दरम्यान,
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी चौकशीसाठी स्थापन विशेष तपास
अधिकारी डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याची टीका पटोले
यांनी केली. या प्रकरणातील डॉक्टर, पोलीस तसंच राजकीय नेत्यांना
वाचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, सीबीआय चौकशीच्या मागणीचा पटोले
यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या दोन जागा लढवणार असून, दोन
जूनला उमेदवारांची घोषणा केली जाईल असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
****
मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं
शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या
संसदीय मंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
****
धाराशिव जिल्हा परिषदेचे कामकाज आता ई-ऑफिस
प्रणाली द्वारे सुरू झालं असून कागदविरहित कामकाज करणारी धाराशिव ही मराठवाड्यातली
पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मैनक घोष यांच्या संकल्पनेतून
ई-ऑफिस प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचं कामकाज
सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे फाइल्स प्रलंबित राहण्याचं प्रमाण शून्यावर
येणार असून, चालू तारखेतच काम होणार असल्यामुळे
जिल्हा परिषदेच्या कामात गतीमानता येणार
आहे. ई-ऑफिस प्रणाली मुळे कागदांचा अपव्यय कमी होऊन अभिलेखे वर्गीकरण आणि जतन करण्याचा
भार देखील कमी होणार आहे. या ई-ऑफिस प्रणाली कामकाजामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची
काम जलदरीत्या पूर्ण होऊन गतीमान प्रशासनाचा सुखद अनुभव जिल्हावासियांना मिळणार आहे.
- देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव
****
अल्पवयीन मुलांकडून होणारे अपघात रोखण्यासाठी
कडक उपाययोजना करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी
दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त
बैठक झाली,
त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, सहायक
प्रादेशिक परिवहन अधिकारी एम.व्ही. दौंड यांच्यासह अनेक अधिकारी
यावेळी उपस्थित होते. अल्पवयीन मुलांकडून होणारं मद्यप्राशन तसंच वाहन चालवण्यासारख्या
प्रकारांना आळा घालण्यासाठी संयुक्त पथकं स्थापन करुन परमिट रुम, बियरबार, मद्यविक्री
दुकाने, तसंच वाहनांची तपासणी करावी, यासोबतच पालक आणि मुलांचंही प्रबोधन करावं, असे
निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि वाव गो ग्रीन, या
कंपनीच्या संयुक्त विद्यमाने 'ड्रोन तंत्रज्ञान आपल्या दारी' या
अभिनव उपक्रमांतर्गत,
शेतीसाठी ड्रोन द्वारे फवारणी अभियान राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना
अत्यंत अल्प दरात,
भाडेतत्त्वावर फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येत असून, अनेक
गावांमध्ये ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. तसंच खरीप पेरणी करताना बीबीएफ
पद्धतीने पेरणी करावी,
आणि विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध यंत्रांचा वापर करण्याचं
आवाहन, प्राध्यापक डॉ. स्मिता सोळंकी यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून,
जिल्ह्यात बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी,
तालुका आणि जिल्हास्तरावर भरारी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत.
अहमदपूर आणि जळकोट तालुक्यामध्ये कापूस पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.
शेतकऱ्यांनी कोणत्याही एकाच उत्पादकांच्या, विशिष्ट कापूस बियाण्यांचा आग्रह
न धरता, उपलब्ध चांगल्या कापूस बियाण्यांचाही वापर करावा, असं
आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केलं आहे. कापूस
बियाण्यांचा विशिष्ट वाणांची वाढीव दराने विक्री केल्यास, संबंधित
कृषि सेवा केंद्रांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं ही त्यांनी सूचित केलं आहे.
****
धाराशिव तालुक्यातील पोलीस पाटील नूतनीकरणाच्या
एका प्रकरणात,
अधिकारी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांविरोधात बेकायदेशीरपणे गुन्हे
दाखल केल्याचा आरोप करत,
उपविभागीय अधिकारी, महसूल कर्मचारी संघटना, तहसीलदार
संघटना, तलाठी मंडळ अधिकारी आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीने धाराशिव तहसील कार्यालयासमोर
धरणे आंदोलन करण्यात आलं. कोणतीही शहानिशा न करता तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना केलेली
अटक ही चुकीची असून,
संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करावेत, या
आशयाचं निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन तसंच तंबाखू विरोधी
सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यात भोकर पंचायत समिती कार्यालयात मौखिक आरोग्य तपासणी
शिबिर आणि समुपदेशन सत्र घेण्यात आलं. दंत शल्य चिकित्सक डॉ.मायादेवी नरवाडे यांनी
मौखिक तपासणी केली. तसंच रेणूका भिसे यांनी संसर्गजन्य रोगाबद्दल समुपदेशन केलं.
****
No comments:
Post a Comment