Tuesday, 28 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:28.05.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 May 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पुणे कार अपघात प्रकरणी ससून रूग्णालयात झालेल्या गैरप्रकारचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वाखालील ही समिती संपूर्ण घटनेचा तपास करणार आहे.

दरम्यान, या समितीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. डॉ. सापळे यांची जेजे रुग्णालयातल्या सामान खरेदी-विक्री प्रकरणात चौकशी सुरु असून, त्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करणं मंजूर नसल्याचं दानवे ट्विट संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत असून, या रुग्णालयाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर एक पोस्ट केली आहे. रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणं चांगलं लक्षण नाही, म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर  कामकाजाची समिक्षा होणं आवश्यक असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. 

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली आहे. वीर सावरकर यांनी आपलं आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांचं जीवन देशवासियांना सतत देशसेवेची प्रेरणा देणारं आहे, असं मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातले अधिकारी,  कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी नगर शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला आज विविध संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं.

धुळे इथं जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचं पूजन करुन अभिवादन केलं.

****

राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली. या आरोपींना वडोदरा, गोपालगंज, दिल्ली, गुरुग्राम आणि चंदीगढ इथून अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय युवकांना नोकरीचं आमिष दाखवून परदेशात नेऊन त्यांना कंबोडिया आणि लाओस सारख्या ठिकाणी अवैध कामांसाठी प्रवृत्त करण्याच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. या कारवाईत कागदपत्रं, डिजिटल उपकरणं, एकाधिक पासपोर्ट, आदी साहित्य जप्त करण्यात आल्याचं एनआयएनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

गुजरातच्या राजकोट इथल्या गेमिंग झोन आग प्रकरणी विशेष तपास पथकाचा अहवाल तीन दिवसांत येणं अपेक्षित असल्याचं, गुजरात सरकारनं काल गुजरात उच्च न्यायालयाला सांगितलं. अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र आणि इतर अत्यावश्यक परवानग्या नसतानाही गेल्या दोन वर्षांपासून राजकोट शहरात सुरू असलेल्या दोन गेमिंग झोन्सवरून गुजरात उच्च न्यायालयानं राजकोट महापालिका आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले. या प्रकरणाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती.

दरम्यान, या प्रकरणी गुजरात सरकारनं सात अधिकाऱ्यांवर कामात दुर्लक्ष आणि विलंब केल्याबद्दल काल निलंबनाची कारवाई केली. शनिवारी झालेल्या या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

****


एफ आय एच हॉकी प्रो लीग युरोपीय स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारतानं हरमनप्रीत सिंहच्या हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाचा पाच - चार असा पराभव केला. भारतासाठी अरैजीत सिंह हुंदल आणि गुरजंत सिंह यांनी प्रत्येकी एक आणि हरमनप्रीत सिंहनं तीन गोल नोंदवले. भारताचा पुढचा सामना एक जूनला जर्मनीसोबत होणार आहे.

****

पॅरिस ऑलिम्पिकमधल्या प्रवेशासाठी बँकॉकमध्ये सुरु असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध पात्रता स्पर्धेत भारताच्या अंकुशिता बोरो हीनं महिलांच्या ६० किलो वजनी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. अंकुशिता हिनं मंगोलीयाच्या नमुन मोनखोर हिच्यावर ४-१ अशी मात केली. पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात मात्र भारताच्या अभिमन्यू लॉरा याचं आव्हान संपुष्टात आलं.

****

रेमाल चक्रीवादळामुळे आसाम मध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातल्या अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सावधानता म्हणून आसाममधल्या अनेक जिल्हा प्रशासनांनी आज शाळा बंद ठेवल्या असून, रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये रेमाल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. चक्रीवादळामुळे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातला अनेक भाग पाण्याखाली आला आहे. कोलकाता आणि आसपासच्या परिसरात वादळी वारे थांबले असून, मदत आणि बचावकार्य सुरु आहे. 

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...