Sunday, 26 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:26.05.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२६ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

दिल्लीच्या विवेक विहार परिसरातल्या एका नवजात शिशू रुग्णालयाला आग लागून सहा अर्भकांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. काल रात्री साडे अकराच्या सुमारास लागलेली ही आग अग्निशमन विभागानं आज पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणली. या घटनेत १२ अर्भकांना वाचवण्यात यश आलं. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

बंगालच्या उपसागरावर घोंगावत असलेल्या रिमाल चक्रीवादळानं तीव्र रूप घेतलं आहे. हे वादळ सध्या ताशी १३५ किलोमीटर वेगानं उत्तरेकडे सरकत असून, आज बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

****

देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात उष्णतेची लाट सुरू आहे. हवामान विभागानं देशाच्या वेगवेगळ्या भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये  उष्णतेची तीव्र लाट, दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तर येत्या बुधवारपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

फ्रान्समध्ये आयोजित ७७ व्या कान चित्रपट महोत्सवात, भारताच्या महिला कलाकारांनी पहिल्यांदाच घवघवीत यश संपादन केलं आहे.

चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन इज लाईट या चित्रपटास ग्रां प्री पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्यातला हा दुसरा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.

***

राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासह स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आमची मुलगी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागार्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात आलं असून, यावर नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींचं निवारण ७ दिवसात केलं जाणार आहे. गैरप्रकाराची माहिती  देणाऱ्यास खबरी बक्षीस योजनेअंतर्गत एक लाख रूपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यासाठी १८००- ४४४-७५२३३ आणि १०४ हे मोफत दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

****

पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सर्व प्रकारचं जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. बंदर आणि पर्यटन विभागानं याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान, गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि वीजांसह पडत असलेल्या पावसामुळं मोठी हानी झाली आहे.

****

No comments: